
गुढी पाडवा आणि संभाजीराजेंची हत्या समज गैरसमज, एकदा वाचा म्हणजे समजेल
छ्त्रपती संभाजीराजांच्या मृत्यूपुर्वी किमान 500 वर्षे अगोदरपासून गुढीपाडवा साजरा केला जातोय.
गुढी पाडवा आला की, कधीही संभाजीराजांची जयंती पुण्यतिथी साजरा न करणारा एक वर्ग उठतो आणि राजांचा गुढीशी संदर्भ जोडून हिंदूच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक पाहता गुढीपाडवा हा शालिवाहन शकाचा वर्षातील पहिला दिवस आणि संभाजीराजांची पुण्यतिथि 11 मार्च मराठी महिन्यांनुसार फाल्गुन कृ. 15 म्हणजेच आमवस्या. याचे मूळ माहीत नसल्याने नवीन पिढीही यांच्या अपप्रचाराला बळी पडताना दिसून येते. इतिहासाच्या कुठल्याही पुस्तकात राजांच्या हत्येनंतर गुढी उभी करण्याचा प्रघात सुरू झाला असा कुठलाही संदर्भ नाही. यासाठी खुले आवाहन दिलेतरी ते वावगे ठरणार नाही. संभाजीराजेंच्या हत्तेपुर्वी किमान 500 वर्षे अगोदरपासून गुढीपाडवा साजरा केला जातो.
वाद घालण्यापेक्षा गुढी पाडव्याचे पुढील संदर्भ वाचल्यास यामागची सत्यता ध्यानात येऊ शकेल.
1. गुढी आणि शंकरपार्वती- डॉ. आ.ह. साळुंके
कानडी भाषेतील गुढीचा उल्लेख
महात्मा बसवेश्वर ( कालखंड 1105 ते 1167 )
ओडेयरू बंदडे गुडी तोरणव कट्टी | याचा अर्थ जेष्ठांचे म्हणजेच शरणाचे आगमन होता गुढ्या उभारून तोरणे बांधा.
2. चोखामेळा ( कालखंड 1270 – 1350 )
टाळी वाजवावी, गुढी उभरावी |
वाट ही चालावी पंढरीची ||
3 संत ज्ञानेश्वर( 1275-1296 ) अध्याय 4, 6 आणि 14
अवधर्माची अवधि तोडी | दोषांची लिहिली फाडी |
सज्जनाकरवी गुढी | सुखाची उभवि |
4. लिळा चरित्र - म्हाइंभट (1278- 1300 )
चौक रंगमाळीका भरविलिया, गुढी उभविली ||
5. संत एकनाथ ( 1333 – 1599 )
उभावूणी सायुज्याची गुडी | परापरथडी पावले ||
6. संत जनाबाई( 1258 -1350 )
राया प्राप्ती जाला पट | गुडी उभवि वाशिष्ठ ||
7. तुकाराम (1608- 1650 )
पुढे पाठविले गोविंदा गोपाळा | देऊनी चपळा, हाती गुढी ||
या संतांच्या अभंगाबरोबरच शिवकालीन संदर्भातही गुढी पाडव्याचा उल्लेख अनेकवेळा आलेला आहे.
1. शिवपुत्र संभाजी – कमल गोखले, पृष्ठ कृमांक 74
छ्त्रपती शिवरायांच्या निधनानंतर ( 3 एप्रिल 1680 ) 19 दिवसांनी म्हणजेच 21 एप्रिल 1680 या दिवशी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राजाराम महाराजांचे मंचकारोहन करण्यात आले. अशा प्रकारे विविध मुहूर्त साधले जात होते
2. शिवकालीन पत्रसार संग्रह खंड कृ. 2 – केळकर आणि आपटे द.वि. शिवचरित्र कार्यालय पुणे, लेखांक 1625 , पृष्ठ कृ.477
“ चैत्र शु. 8, शके 1596, 4 एप्रिल 1674
इंग्रजांचा दुभाषी व वकील नारायण शेणवी मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरला पत्र लिहितो की, मंगळवार दि. 24 मार्च रोजी रायरी ( रायगड ) ला पोहोचलो. त्याचदिवशी निराजी पंडिताची भेट घेण्याकरिता पाचाड गावी गेलो. तेव्हा निराजी गडावर होता असे समजले. मध्यंतरी निराजी पंडित पाडव्याकरिता ( 28मार्च 1674 ) आपल्या घरी आला. दुसर्यादिवशी त्याने मला आपल्या बरोबर नेऊन एका प्रशस्त घरात माझी सरबराई केली. तेथे आणखी पाच दिवस राहिलो.”
3.मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध – डॉ. जयसिंगराव पवार, पृष्ठ कृमांक 135
2 मार्च 1700 ला छ्त्रपती राजारामाचे निधन झाल्यानंतर महाराणी ताराबाईनी मुद्दामहून मुहूर्त काढून आपले चिरंजीव दुसरे शिवाजी यांना 10 मार्च 1700 ला चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवशी मंचकरोहन केले.
४. मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड कृमांक 20 – वि. का. राजवाडे, लेखांक 176, पृष्ठ कृमांक 239
प्रा || वाई येथील कौल, एकूण कलम १
१.शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमे ग्रामस्त कसबे वाई यांनी ग्रहणकाली कडत जोसी को | मा|र ( मजकूर ) यास प्रतिवर्षी पासोडी एक व गहू गुढीयाचे पाडव्यास कुडव एक देऊ म्हनोन पत्र लेहून दिलहे यास वर्षे आज ता || १४८ होतात कलम१.
५.शिवचरित्र साहित्य खंड १ - पोतदार द.वा. व इतर , लेखांक ४१, पृष्ठ कृमांक ५९ ते ६
मार्गशीष शुद्ध १ विरोधीनाम सवंस्तर शके १५७१ अथवा सुहूर सन खसेन अलफ
म्हणजे २४ नोव्हेंबर १६४९ , सोमवार दिवसी राजेश्री नीलकंठराऊ यासी
कासाराचे घरी गुढीयाचा पाडवा व चैत्री पुनीव व स्रावणी पिणीव व कुलधर्म करील
तेथे हाक उतपन फळावर येईल तो तिघी जणी वाटोण घेणे
6.गुढी आणि शिवपार्वती- डॉ. आ.ह. साळुंके
नवीन वर्ष साजरा करण्याचा त्या त्या भागातील विविध पद्धती आहेत. कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणात याला उगादि, राजस्थान व हरियानात याला थपना, हिमाचलमध्ये चैत्ती तर कश्मीरमध्ये नववर्षाला नवरेह म्हणतात. तर याचदिवशी शालिवाहन शक नावाने कालगणना सुरू झाली. चैत्र म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गुढी उभा करण्याची पद्धत रूढ झाली. फार पूर्वी कुठल्याही फार मोठ्या यशप्राप्तीनंतर गुढी उभी केली जाऊ लागली.गुढी हा शब्द स्त्रीलिंगी असून पर्वतीच्यारूपातील तो संपूर्ण देह आहे.
2. तारीखे दिल्कुशा - भीमसेन सक्सेना पृष्ठ क्र. 99
"बादशहाने प्रार्थना करुन परमेश्वराचे आभार मानले. संभाजीच्या डोळ्यात सळई फिरविण्यात आली. दोन तीन दिवसानंतर संभाजी आणि कविकलस यांचा शिरच्छेद करण्यात आला." ( 11 मार्च 1689 )
3. श्री छ्त्रपती संभाजी महाराज - वा. सी. बेंद्रे पृ. 668
"11 मार्चला संभाजी राजांना हाल हाल करून ठार मारण्यात आले. शिर कापून त्याचे प्रदर्शन करून हिंदूत घबराट उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला असावा."
4. औरंगजेबनामा - खेमराज श्रीकृष्ण दास, पृ. 66
"संभा सन 1100 हिजरी , सवंत 1746, सन 1689 ई.
उस बेदिन का फसाद करना और मुसलमानोके शहरोंको लुटना उसके जिंदा रखने से बढा हूआ था, इसलीये शरीयतवालो काजीओ और मुफतियो के फतवा ( व्यवस्था ) और दिनदौलतवालो ( अमीर वजिरो ) की सलाहसे उनको मारना वाजिब ठ्हरा इसलीये 21 जमादिउलअव्वल सन 32 को कोरागाव ( फतहाबाद ) मे मुकामहोने के पिछे ( चैतसुदि 1 / 12 मार्च ) को वह कविकलशसमेत, जो सब जगह उसके साथ रहा था , काफरों की मारनेवाली तलवार से मारा गया."
5. औरंगजेब का इतिहास- जदूनाथ सरकार पृ. 652
"मराठ्यांच्या राजाचे अपराध आता क्षमेच्या पलीकडे गेले होते. त्याचदिवशी संभाजीचे डोळे काढण्यात आले. आणि दुसर्यादिवशी कविकलस याची जीभ छटण्यात आली. मुसलमानांना ठार मारणे, कैद करणे आणि त्यांची अब्रू घेणे (हा शब्द बेइज्जत करणे या अर्थाने वापरला असावा.) व त्याचप्रमाणे इस्लामची शहरे लुटून फस्त करणे, या अपराधाबद्दल संभाजीला मृत्युची शिक्षा देण्यात यावी असा फतवा मुसलमान धर्ममार्तंडानी काढला. संभाजीला ठार करण्याच्या सुचनेला बादशहाणे समती दिली. पंधरवडाभर कैदयाचे हाल हाल करण्यात आले. आणि त्यांचा वाटेल तसा अपमान करण्यात आला. त्यानंतर 11 मार्चला अतिशय क्रूररीतीने आणि भयंकर हाल करून ठार मारण्यात आले. त्यांचे एक एक अवयव कुर्हाडीने तोडण्यात आले. आणि त्यांचे मास कुत्र्यापुढे फेकण्यात आले."
एकंदरीतच औरंगजेबाने राजेंची कशाप्रकारे हत्या केली हे स्पष्ट होते.दुसरे हत्या झाली तो दिवस अमावस्येचा असुन दुसऱ्यादिवशी गुढीपाडवा होता हे खरे असलेतरी हिंदु परंपरेनुसार एकच वर्ष दुखवटा म्हणून सण साजरा केला जात नाही. माञ दुसऱ्या वर्षापासून साजरा केला जातो. शिवाय राजेंच्या हत्तेनंतर कुणाच्यातरी सांगण्यावरुन गुढी उभा करण्याची प्रथा सुरु झाली हे साफ खोटे आहे.
महाराष्ट्रातील देशपरदेशात विखुरलेले मराठी बांधव त्या त्याठिकाणी कित्येक वर्षापासून गुढीपाडवा साजरा करतात. त्यामुळे छञपती संभाजीराजेंची हत्या आणि गुढीपाडवा या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत.
विशेष म्हणजे छञपतींच्या सातारा आणि कोल्हापूर येथील दोन्ही गाद्या व संभाजीराजेंच्या मामाचे गाव फलटणचे निंबाळकर घराणे दरवर्षी गुढी उभी करतात.
जाता जाता एकच अशाचप्रकारे सेनापति संताजी घोरपडेची हत्या झाल्यानंतर औरंगजेबाने संताजीचे शिर भाल्यावर लटकाऊन सर्वत्र फिरविले होते. त्यावेळी कुठला सन साजरा केला ? येवढे वाचल्यानंतर प्रत्येकाने ठरवावे गुढी पाडव्याचा सण कसं साजरा करावा.
टिप - साडी वर उलटा तांब्या, लिंबाचा फांदी हे कृषीप्रधान संस्कृतीचे प्रतिक आहेत. तरीपण अशा निरर्थक प्रश्नाच्या उत्तरासाठी मा. आ.ह. साळुंकेसरांचे गुढी आणि शंकरपार्वती हे पुस्तक पहावे.
प्रा. डॉ. सतीश कदम, तुळजापूर जि.उस्मानाबाद 9422650044)
[ लेखक अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष ,इतिहासाचे अभ्यासक व प्राध्यापक आहेत.]
Share your comments