डॉ.आदिनाथ ताकटे, राहुल पाटील
फळझाडांच्या लागवडीचे यशापयश हे जमीन, हवामान, खत व्यवस्थापन आणि पाणी पुरवठा यावर विशेष अवलंबून आहे.यापैकी खत व्यवस्थापनास अन्यन साधारण महत्व आहे. फळझाडांची लागवड केल्यानंतर नियमित आणि भरपूर उत्तम दर्जाची फळे येण्यासाठी जमीन सुपीक ठेवणे जरुरीचे आहे.
फळझाडांची वाढ आणि त्यावर होणारी फलधारणा जमिनीतून मिळणाऱ्या पोषक अन्नद्रव्यांवर आणि स्थानिक हवामानावर अवलंबून असते.त्यामुळे या दोन महत्वाच्या बाबीपैकी जमिनीच्या सुपिकतेकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. जमिनीच्या सुपिकतेकडे दुर्लक्ष झाल्यास झाडांची वाढ कमी होते आणि झाडे किडी व रोगास बळी पडतात.झाडांची वाढ निकोप व्हावी म्हणून योग्य मशागत, तणांचा बंदोबस्त, खतांचा संतुलित पुरवठा, सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन म्हणून वापर,आच्छादनाची पिके, आंतरपिके इत्यादी मार्गांनी जमिनीची सुपिकता चांगली ठेवणे फायदेशीर ठरते.
फळ झाडांना खते देण्याची योग्य वेळ :
सर्वसाधारणपणे फळझाडांना जून-जुलै, सप्टेबर-ऑक्टोबर व जानेवारी–फेब्रुवारी या महिन्यात खते द्यावीत. परंतू खते देताना प्रत्येक फळझाडाचा बहार येण्याचा व फळे पक्व होण्याचा कालावधी लक्षात घेऊन खते द्यावीत.सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यात संपूर्ण शेणखत अथवा कंपोस्ट खत,संपूर्ण स्फुरद व पालाश ची मात्रा द्यावी. नत्राची मात्रा एक ते दोन हप्त्यात विभागून द्यावी. खते देण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
फळझाडांना खते देण्याची पद्धत :
खताची मात्रा देताना मोठ्या विस्ताराखाली खोडापासून एक मीटर लांब ४० ते ५० से.मी. रुंद आणि १५ से. मी. खोल वर्तुळाकार चर काढावा.प्रथम चरात पालापाचोळा आणि शेणखत नंतर रासायनिक खते सर्व बाजूनी टाकावी नंतर चर मातीने बुजवावा.
आंबा: पूर्ण वाढलेल्या झाडास (१० वर्ष व अधिक) जून-जुलै महिन्यात ५० किलो शेणखत, शिफारशीत खत मात्रा (१५००:५००:५०० ग्रॅम/झाड नत्र:स्फुरद:पालाश) दीड किलो युरिया, तीन किलो एसएसपी व एक किलो एमओपी द्यावे. सप्टेबर व फेब्रुवारी महिन्यात पाऊण किलो युरिया प्रत्येकी द्यावा.
चिकू: पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडास १०० किलो शेणखत,शिफारशीत खत मात्रा (३:२:२ किलो/झाड नत्र:स्फुरद: पालाश) तीन किलो नत्र (६.५ किलो युरिया),दोन किलो स्फुरद (१२.५ किलो एसएसपी) व दोन किलो पालाश (३.५ किलो एमओपी) जुन-जुलै महिन्यात द्यावे. उर्वरित निम्मा नत्राचा हफ्ता सप्टेंबर मध्ये द्यावा.
पेरू: पूर्ण वाढलेल्या पेरूच्या झाडास ५० किलो शेणखत, शिफारशीत खत मात्रा (९००:३००:३०० ग्रॅम/झाड नत्र:स्फुरद: पालाश) म्हणजेच दोन किलो युरिया,दोन किलो एसएसपी व अर्धा किलो एमओपी द्यावे. यापैकी निम्मे नत्र ( एक किलो युरिया) बहारच्या वेळी व उरलेला नत्र फलधारणेनंतर द्यावा. तर स्फुरद व पालाश एकाच हफ्त्यात बहारच्या वेळी द्यावे.
अंजीर: पूर्ण वाढलेल्या अंजिराच्या झाडास, अंजिराची झाडे सुप्तावस्थेत असताना बागेत खोल खादंणी करावी. प्रत्येक झाडास ५० किलो शेणखत, शिफारशीत खत मात्रा (९००:२५०:२७५ ग्रॅम/झाड नत्र:स्फुरद: पालाश) दोन किलो युरिया, दीड किलो एसएसपी व एक किलो एमओपी छाटणी नंतर द्यावे. फळधारणेनुसार नत्र(युरिया ) दोन वेळा विभागून एक महिन्याच्या अंतराने द्यावे.
लिंबू: पूर्ण वाढलेल्या चार वर्षाच्या लिंबूच्या झाडास जून-जुलै महिन्यात १५ किलो शेणखत,१५ किलो निबोळीपेंड शिफारशीत खत मात्रा (६००:३००:६०० ग्रॅम/झाड नत्र:स्फुरद:पालाश) सुफला (१५:१५:१५) एक किलो, अर्धा किलो एमओपी द्यावे. सप्टेबर महिन्यात ३०० ग्रॅम युरिया व जानेवारी महिन्यात ३०० ग्रॅम युरिया द्यावा. वरील खतांशिवाय ५०० ग्रॅम व्हॅम+ १०० ग्रॅम पीएसबी + १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम+ १०० ग्रॅम अॅझोस्पिरिलम द्यावे.सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळल्यास ०.५ % झिंक सल्फेट, ०.५% मॅग्नेशियम सल्फेट,०.३% फेरस सल्फेट व कॉपर सल्फेट या सूक्ष्म अन्न्द्र्य्व्यांची एकत्रित फवारणी करावी.
मोसंबी:पूर्ण वाढलेल्या पाच वर्षाच्या प्रत्येक झाडास २० किलो शेणखत,१५ किलो निबोली पेंड,शिफारशीत खत मात्रा ( ८००:३००:६०० ग्रॅम/झाड नत्र:स्फुरद:पालाश) पुढील प्रमाणे विभागून द्यावे. जानेवारी महिन्यात ७०० ग्रॅम युरिया + ९०० ग्रॅम एसएसपी,मार्च महिन्यात ७०० ग्रॅम युरिया + ९०० ग्रॅम एसएसपी,मे महिन्यात ३५० ग्रॅम युरिया + ५०० ग्रॅम एमओपी,जुलै महिन्यात २५० ग्रॅम एमओपी, आणि सप्टेंबर महिन्यात २५० ग्रॅम एमओपी द्यावे. बहार घेताना याखतांशिवाय ५०० ग्रॅम व्हॅम + १०० ग्रॅम पीएसबी + १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम + १०० ग्रॅम अॅझोस्पिरिलम द्यावे.
डाळिंब: पूर्ण वाढलेल्या झाडास शेणखत ४० ते ५० किलो (६२५:२५०:२५० ग्रॅम/झाड नत्र:स्फुरद:पालाश) प्रती वर्ष, नत्र दोन समान हप्त्यात विभागून द्यावे.म्हणजेच बहार धरतेवेळी ७०० ग्रॅम युरिया,संपूर्ण एसएसपी १५५० ग्रॅम व एमओपी ४०० ग्रॅम उरलेले अर्धे नत्र(युरिया ७०० ग्रॅम) फळांच्या गाठी धरल्यानंतर २-३ वेळा विभागून द्यावे
नारळ: ५ ते ६ वर्षाच्या नारळाच्या झाडास ५० किलो शेणखत, शिफारशीत खत मात्रा (१०००:५००:१००० ग्रॅम/झाड नत्र:स्फुरद: पालाश) म्हणजेच दोन किलो युरिया,तीन किलो सिंगल सुपर फॉसपेट आणि साडेतीन किलो म्यूरेट ऑफ पोटॅश तीन समान हफ्त्यात द्यावे.(जून-सप्टेंबर व फेब्रुवारी) पैकी संपूर्ण शेणखत व सिंगल सुपर फॉसपेट जून महिन्यातच एकाच वेळी द्यावीत.रोपे लावल्यानंतर पहिल्या वर्षी रोपांची मुळे ३० से.मी.अंतरापर्यंत सभोवती विखरून टाकावीत आणि खुरप्याच्या सहाय्याने मातीत मिसळावी.त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी खते देताना ३० से.मी.अंतर वाढवत जावे व पाचव्या वर्षी व त्या पुढे १.५ ते १.८० मीटरपर्यंतच्या अंतराने ती पसरून टाकावीत आणि ती मातीत मिसळावी.
लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे, मृद शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, मो.९४०४०३२३८९
राहुल पाटील, उद्यान विद्या विभाग महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी
Share your comments