डॉ.आदिनाथ ताकटे, राहुल पाटील
आंबा लागवड सर्वसाधारणपणे कोणत्याही जमिनीमध्ये होऊ शकते, मात्र पाण्याचा निचरा होणारी जमिन असावी. सर्वसाधारणपणे जमिनीचा सामू ५.५ ते ७.५ पर्यंतच्या जमिनीमध्ये आंबा लागवड यशस्वी होते.
•आंब्याला लालसर जमिनीपासून ते नदीकाठच्या गाळाच्या, पोयट्याची जमिन उत्तम असते.
•जमिनीची खोली २ ते २.५ मी. असावी. आंब्याच्या योग्य वाढीसाठी जमिन मध्यम प्रकारची, पाण्याचा निचरा होणारी व पाण्याची पातळी २ मीटरच्या खाली असणारी असावी.चुनखडीचे प्रमाण १० टक्क्या पेक्षा कमी असावे.
•चोपण जमिन, खूप हलकी, कठीण मुरूम,पाषण असणारी जमिन आंब्यासाठी अयोग्य असते.
•डोगर उताराच्या जमिनीवर आंब्याचे उत्पादन कमी येते.
•खूप खोल, काळ्या भारी जमिनीत आंबा उत्पादन चांगले येत नाही.
•जमिनीचा उतार माफक असावा व पावसाचे पाणी साठवून राहू नये.
•खूप उताराच्या जमिनीत पाणी वाहून जाण्याचे प्रमाण अधिक असल्याने आंबा पिकास वारवार पाणी दयावे लागते. आंब्याची मुळे खोलवर जातील या दृष्टीने फुटणारा मुरूम असणारी जमिन आंब्यास मानवते.
फळबागेची आखणी आणि लागवड :
•जमिनीची चांगल्या पद्धतीने मशागत केल्यानंतर चौकोन पद्धतीने १० x १० x १० मीटर अंतरावर आंब्याची लागवड करावी.
•एप्रिल किंवा मे महिन्यात शिफारस केलेल्या अंतरावर १ x १ x १ मीटर, आकाराचे खड्डे खोदताना मातीचा वरचा व खालचा थर वेगवेगळा ठेवावा.
•खड्डा खोदताना वरच्या व खालच्या थरातील माती वेगवेगळी टाकावी.खड्डे तीन आठवडे तापू द्यावे,जेणेकरून प्रखर सूर्यप्रकाशामुळे खड्ड्याचे निर्जंतुकीकरण होईल.
•मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात खड्डे परत भरावे. खड्डे मातीने भरताना ते निर्जंतुकीकरण करून वाळलेला पालापाचोळा १५ से.मी. थरात भरावा.
•मातीमध्ये २०-२५ किलो चांगले कुजलेले शेणखत + २ ते ३ किलो गांडूळखत + २ ते ३ किलो लिंबोळी पेंड २५ ग्रॅम टायकोडर्मा जीवाणू + १५ ग्रॅम स्फुरद विरघळवणारे जीवाणू + २५ ग्रॅम अॅझोटोबॅकटर हे मिश्रण मिसळून घ्यावे.
•खड्डा जमिनीच्या वर ५ ते ७ से.मी उंच भरून ठेवावा.म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीबरोबर लागवड करता येईल.( आकृती ).
•वाळवी आणि इतर किडी पासून संरक्षण करण्यासाठी खड्ड्यात ५० ते ६० ग्रॅम लिंडेन किंवा फॉलीडॉल पावडर टाकावी.
•सधन लागवड ५ x ५ मीटर अंतर ठवून चौकोनी पद्धतीने लागवड केल्यास १ हेक्टर क्षेत्रात ४०० झाडे बसतात.
आंबा कलमांची निवड
फळबागांपासून काही वर्षाच्या मेहनतीनंतर उत्पन्न देणारे झाड न मिळाल्यास ते तोडून दुसरे लावणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.फळझाडांची कलमे,रोपांच्या निवडीवर फळांची गुणवत्ता आणि फळबागेचे एकूण यश अवलंबून असते म्हणून बागेकरिता उत्कृष्ट आणि गुणवत्ता माहित असलेली दर्जेदार आणि खात्रीशीर कलमे रोपे आणावी.
आंबा लागवडीसाठी एक वर्ष वयाचे खात्रीशीर रोपवाटिकेतील जातीवत कलमाची निवड करावी,
कृषि विद्यापीठ किंवा शासकीय रोपवाटिकेमधून शक्यतो रोपे आणावीत.शक्य नसल्यास आपल्या माहितीतील शासकीय परवानाधारक रोपवाटिकेतून कलमे /रोपे घ्यावीत.
कलमांची निवड करताना ती किती उंच आहेत,यापेक्षा ती योग्य त्या जातीच्या मातृवृक्षापासून केलेली आहेत कि नाहीत याबाबींकडे अधिक लक्ष द्यावे.
रोपे घेताना कलम बांधलेली आहेत व जोड पूर्णपणे जुळलेले आहेत याची खात्री करून घ्यावी. त्याच बरोबर ती वाढीला जोमदार आहेत,निरोगी आहेत आपणास पाहिजे त्याच जातीची आहेत याची खात्री करूनच घेतली पाहिजे.
आंबा रोपांची/कलमांची लागवड
•प्रथम लागवड करण्यापूर्वी अगोदरच भरून ठेवलेल्या खड्ड्याच्या मध्यभागी कलमाच्या पिशवीच्या दोन्ही बाजूंवर उभा काप द्यावा व मुळाभोवती असलेला मातीचा गोळा न फुटता पॉलिथीन बॅग काढावी.
•मोकळा झालेला गोळा दोन्ही हातात धरून खड्ड्याच्या मधोमध ठेऊन हलकेच दाबावा व मोकळ्या हाताने माती भरून गोळ्याभोवती माती टाकावी.अगोदर हाताने व नंतर पायांनी दाबावी,हे करताना मातीच्या गोळ्यावर पाय पडणार नाही याची काळजी घ्यावी.
•आवशकता वाटल्यास हलकेसे पाणी द्यावे.आधारासाठी पश्चिम बाजूस ६ इंच अंतरावर ४ ते ५ फुट बांबूची काठी रोऊन त्यात कलम बांधावी.
आंब्याच्या प्रमूख जाती: हापूस,केशर,रत्ना ,लंगडा ,पायरी.वनराज ,तोतापुरी,निलम, सिंधू
केसर आंबा
मऊ, रसाळ पोत असलेले मोठे, पिवळे-केशरी फळ आहेत. केसर आंबे हे भारतातून सर्वाधिक निर्यात होणाऱ्या जातींपैकी आहेत
फळाला आंबटपणाचा इशारा देऊन गोड चव असते. 'केसर' या शब्दाचा हिंदीत अर्थ भगवा असा आहे आणि हे फळ भगव्या रंगासारखे आहे.
केसर आंब्याचे वेगळेपण त्याच्या चव आणि सुगंधात आहे. हे फळ त्याच्या गोड चवीसाठी ओळखले जाते, जे समृद्ध आणि रसाळ आहे.
केसर आंबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "गिर केसर"चा उगम गुजरातमध्ये झाल्याचे मानले जाते. केसर आंब्याची लागवड प्रामुख्याने गुजरातमधील गीर भागात केली जाते.
केसर आंब्याला 2011 मध्ये GI टॅग मिळाला. उत्तर प्रदेशातील दसऱ्यानंतर GI टॅग मिळवणारा हा आंब्याचा दुसरा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे.
केसर आंबे गुळगुळीत, लांबलचक आकाराचे आणि सोनेरी पिवळ्या त्वचेचे अनेकदा हिरव्या रंगाचे असतात. त्यांचे मांस अपवादात्मकपणे रसाळ आहे
कलमांची निगा:
•पहिली तीन वर्ष आंबा कलमांना येणारा मोहोर काढून टाकावा.त्यामुळे झाडांची वाढ चांगली होते. चौथ्या वर्षापासून उत्पन्न घेण्यास सुरुवात करावी.कलमांचे
•बुरशीजन्य रोग व उन्हापासून सरंक्षण करण्यासाठी पावसाळ्यानंतर कलमांच्या बुंध्यावर बोर्डो पेस्ट लावावी.
•पहिले दोन - तीन वर्ष नियमित पाणी दयावे.
खतांचे व्यवस्थापन:
आंबा कलम जोमाने वाढण्यासाठी व भरपूर फळे येण्यासाठी दरवर्षी कलमाच्या वयोमानानुसार तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे खते देणे आवश्यक आहे.
•सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यात संपूर्ण शेणखत, संपूर्ण स्फूरद व पालाशची मात्रा द्यावी व नत्राची मात्रा एक किंवा दोन हप्त्यात विभागून द्यावी.
•खताची मात्रा देताना बांगडी पद्धतीने द्यावीत. मध्यान्ही झाडाची सावली जेवढ्या भागावर पडेल त्या क्षेत्राच्या मधोमध १ ते १.५ मीटर दूर,१५ से. मी. खोल आणि ३० ते ४५ से.मी. रुंद चर घेऊन गोलाकार पद्धतीने द्यावीत.
•प्रथम चरात पालापाचोळा व शेणखत टाकून नंतर रासायनिक खते सर्व बाजूनी सारखी टाकावी नंतर चर मातीने बुजवावा.
•पहिल्या वर्षी ३०० ग्रॅम युरिया + ३०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट + २०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश दयावे.
•कलमाचे वय वाढत जाईल तसे हे प्रमाण प्रतिवर्षी १ घमेले शेणखत +३०० ग्रॅम युरिया + ३०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट + २०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश या प्रमाणात वाढवावे.
•पूर्ण वाढलेल्या आंब्याच्या झाडास ५० किलो शेणखत/कंपोस्ट , दीड किलो नत्र, अर्धा किलो स्फूरद व अर्धा किलो पालाश प्रती झाड जून- जुलै महिन्यात व नत्र दोन समान हप्त्यात द्यावे. म्हणजेच ३ किलो युरिया, ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट + २ किलो म्युरेट ऑफ पोटॅश दयावे. युरिया विभागून द्यावा
लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे, मृद शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, मो.९४०४०३२३८९
राहुल पाटील, उद्यान विद्या विभाग महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी
Share your comments