कपाशीवरील मित्र कीटक व सूक्ष्मजंतू

30 January 2020 04:45 PM


'जीवो जीवश्च: जीवम्' या युक्ती प्रमाणे एक सजीव दुसऱ्या सजीवावर उपजीविका करतो. निसर्गात किडींनादेखील शत्रू असतात. काही कीटक दुसऱ्या किटकाच्या अंडी, अळी व कोष यांच्या आत राहून उपजीविका करतात. त्यांना परोपजीवी कीटक म्हणतात. प्रौढ परोपजीवी कीटक यजमानाच्या शरीरात किंवा शरीरावर अंडी घालतात. त्या अंड्यातून निघालेल्या अळ्या यजमान किडीचा विनाश करतात. काही कीटक दुसऱ्या किडींचे भक्षण करून उपजीविका करतात.

त्यांना भक्षक कीटक म्हणतात. भक्षक कीटक बहुधा भक्षाच्या शोधात भटकत असतात. भक्ष सापडल्यास घट्ट पकडून मारतात व खातात. तसेच काही सूक्ष्मजंतू जसे जीवाणू, विषाणू, बुरशी इत्यादी कीटकांना रोगग्रस्त करतात, त्यामुळे ते कीटक मारतात. जैविक नियंत्रणासाठी उपयोगी असणारे निवडक परोपजीवी, भक्षक कीटक, जीवाणू आणि विषाणू प्रयोगशाळेत वाढविता येतात. क्रायसोपा व लेडीबर्ड बीटल या भक्षक कीटकांचा, एच.ए.एन.पी.व्ही विषाणूचा व बीटी या जीवाणूचा वापर करता येईल.

भक्षक कीटक

1) लेडीबर्ड बीटल (ढाल किडा):
लेडीबर्ड बीटल या किटकाचे प्रौढ भुंगे व त्यांच्या अळ्या प्रामुख्याने मावा किडीवर जगतात. लेडीबर्ड बीटलची अंडी रंगाने पिवळसर व आकाराने लांबुळकी असून, समूहामध्ये पण उभी घातलेली असतात. याची अळी 6 ते 7 मि. मी. लांब असून, रंगाने करडी व त्यावर पांढुरके ठिपके असतात. प्रौढ तुरीच्या दाण्यासारखे, पण खालून चपटे व वरून फुगीर असतात. प्रौढ रंगाने पिवळसर, बदामी किंवा लालसर असून त्यांच्या समोरच्या पंखावर काळ्या रेषा किंवा ठिपके असतात. काही प्रजातीमध्ये ते नसतात. अळी प्रती दिवशी 25 मावा, तर प्रौढ भुंगा 56 मावा खाऊ शकतो. पिकावर मावा किडीसोबत लेडीबर्ड बीटल जास्त आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा.

2) क्रायसोपा:
क्रायसोपाची अळी मावा, तुडतुडे, पांढरी माशी तसेच बोंडअळ्याची अंडी व त्याच्या लहान अळ्यायांचे भक्षण करते. क्रायसोपाचा पतंग पोपटी, हिरव्या व निळसर झाक असलेला असतो. मादी पतंग कपाशीच्या पानावर किंवा देठावर एकएकटी अंडी घालते. अंडे हिरव्या रंगाची असून पांढऱ्या तंतुच्या टोकावर राहते. या अंड्यातून 48 तासांत अळी बाहेर पडते व भक्षाच्या शोधात फिरते. अळी अवस्था 15 ते 27 दिवसांची असते. क्रायसोपाची अंडी उपलब्ध असल्यास हेक्टरी 10,000 अंडी या प्रमाणात कपाशीच्या शेतात एकसारख्या प्रमाणात पीक 40 ते 45 दिवसांचे झाल्यानंतर 30 दिवसांच्या अंतराने दोन वेळा सोडावीत.

3) सिरफीड माशी:
हि सुद्धा मावा किडींचा महत्वाचा भक्षक कीटक आहे. सिरफीड माशीची अळी रंगाने हिरवट असून तोंडाकडचा भाग टोकदार असतो. अळीला पाय नसतात. एक अळी दिवसभरात साधारणपणे १०० मावा खाऊ शकते. या किटकाची माशी घरात आढळणाऱ्या माशीसारखीच असून तिच्या पाठीवर लाल पिवळे व काळे पट्टे असतात. माशीचे डोके लाल रंगाचे असते.

4) पेंटॅटोमिड ढेकुण:
पेंटॅटोमिड ढेकुण हे ढालीच्या आकाराचे, काळपट करड्या रंगाचे असून, कापूस पिकावर सर्वत्र पाहायला मिळतात. हे ढेकुण आपली सोंड अमेरिकन बोंडअळी, उंट अळी तसेच इतर अळ्यांच्या शरीरात खुपसतात व शरीरातील द्रव शोषून घेतात. परिणामी अळी मरते. ओरीअस ढेकुण हे छोटे काळपट रंगाचे असून त्यांना सोंड असते. हे ढेकुण फुले तसेच पानांच्या बेचक्यात लपून बसतात. पिल्ले चकचकीत पिवळसर रंगाची असतात. तसेच प्रौढ व पिल्ले मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी किडींची अंडी, तसेच लहान अळ्या यामध्ये आपली सोंड खुपसून आतील द्रव शोषण करतात, त्यामुळे किडी मारतात.

5) रेडयुव्हीड ढेकुण:
हा परभक्षी कीटक असून किडीच्या शरीरामध्ये आपली सोंड टोचून रस शोषण करते व किडीला मारून टाकते.

6) एन्थोकोरीड ढेकुण:
हा परभक्षी कीटक असून स्वतःच्या सोंडेने मावा बोंडअळ्या ह्या किटकाला मारून त्यातून रस शोषण करून उपजीविका करतात.

7. कोळी किंवा कातीन:
कातीन हा कोळी वर्गातील असून, त्याला आठ पाय असतात. कपाशीच्या पिकामध्ये दोन प्रकारांतील कातीन आढळतात. एक जाळे करून राहणाऱ्या, तर दुसऱ्या जाळे न करणाऱ्या शिकारी कातीन. सर्व प्रकारच्या कातीन आपापल्या आकारमानाप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या किडींना खातात. त्यामुळे कातीन सुद्धा शेतकऱ्यांचा मित्र होय.

परोपजीवी कीटक

1) ट्रायकोग्रामा:
ट्रायकोग्रामाची माशी अति सूक्ष्म असते. ती दुसऱ्या किडीच्या अंड्यात आपली अंडी घालते, त्यामुळे अंडी अवस्थेतच किडींचा नायनाट होतो. अशी ट्रायकोग्रामाची अंडी असलेली ट्रायकोकार्ड आपणाला विकत मिळू शकतात. एका कार्डावर 40 हजार अंडी असतात आणि हे एक कार्ड 1 एकरासाठी पुरेशे होते. या कार्डच्या विशिष्ट आकाराच्या 20 पट्ट्या कपाशीच्या पानांच्या खालच्या बाजूने राहील आणि त्या सारख्या अंतरावर लावल्या जातील. कपाशीच्या शेतात बोंडअळ्याची अंडी दिसू लागल्यावर किंवा उगवणीनंतर 40 ते 45 दिवसांनी या पट्ट्या लावाव्यात. या पट्ट्यावरील अंड्यांमधून 7 ते 9 दिवसांत ट्रायकोग्रामाचा प्रौढ बाहेर पडून बोंडअळ्याच्या अंड्यांचा शोध घेतो व त्यामध्ये आपली अंडी घालतो. अशा तऱ्हेने अंडी अवस्थेतच किडींचा नायनाट होतो. ट्रायकोग्रामा तिन्ही प्रकारच्या बोंडअळ्यासाठी उपयोगी आहे. किडीच्या जीवनक्रमाच्या संख्येत घट करते. रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत कमी खर्च येतो. या कीड नियंत्रक शत्रूचे उत्पादन करण्याची साधी, सोपी पद्धत आहे.

2) एपेंटेलीस:
या मित्र किटकाची मादी बोंडअळीच्या शरीरामध्ये अंडे घालते व नंतर या अंड्यातून निघालेली एपेंटेलीसची अळी बोंडअळीवर उपजीविका करून काही दिवसात बोंडअळीच्या शरीरातून बाहेर पडते व आपले कोष तयार करते व परिणामी बोंडअळी मरते. 

3) प्रोम्यूसिडी, अनॅसियस व अनॅगॅरस:
या तिन्ही परोपजीवी किडी कपाशीवरील पिठ्या ढेकणाच्या शरीरामध्ये अंडी घालतात व त्यांची वाढ तेथूनच पूर्ण होते. यामुळे पिठ्या ढेकुण मरतात व ते तपकिरी रंगाचे होतात. या किडीमुळे नैसर्गिकरीत्या पिठ्या ढेकणाचे मोठ्या प्रमाणात नियंत्रण झाले आहे. 

सूक्ष्मजंतू 

1) एच.ए.एन.पी.व्ही विषाणू: 
घाटेअळीचा विषाणू हा एच.ए.एन.पी.व्ही या नावाने ओळखला जातो. एच.ए.एन.पी.व्ही ची 1 ली फवारणी हेक्टरी 250-500 एल.ई. या प्रमाणे हिरव्या बोंडअळीच्या अगदी लहान अळ्या दिसू लागताच करावी. या 10 लिटर फवारणीच्या द्रावणात 1 ग्रॅम निळ टाकावी. हे फवारणीयुक्त खाद्य अमेरिकन बोंडअळीने खाल्ल्यानंतर अळीला 'व्हायरोसिस' नावाचा रोग होऊन, अळी झाडाला उलटी लटकून मरते. एच.ए.एन.पी.व्ही इतर मित्र कीटकांना अपायकारक नाही. एच.ए.एन.पी.व्ही मुळे फक्त अमेरिकन बोंडअळीचेच नियंत्रण करता येते. 

2) जीवाणू:
बॅसिलस थुरीनजिएनसिस (बीटी) हा जीवाणू जमिनीत वास करणारा असून सर्व प्रकारच्या बोंडअळ्याच्या नियंत्रणासाठी वापरता येतो. हे जीवाणू अन्नाद्वारे बोंडअळीच्या पोटात गेल्यावर अतिसूक्ष्म बीज व स्फटिक बनवितो व विष निर्माण करतो त्यामुळे बोंडअळ्या मारतात. बीटी या जीवाणू मुळे सर्व प्रकारच्या अळ्यांचे नियंत्रण करता येते. बीटी मुळे मरणाऱ्या अळ्या आकसलेल्या दिसतात व कडक होतात. कपाशीमध्ये या जीवाणूच्या जनुकाचा वापर करून बोंडअळ्यास प्रतिकारक्षम बीटी कपाशीची निर्मिती करण्यात आली आहे.

3) बुरशी:
बीव्हेरिया बॅसियाना हि बुरशी बोंडअळीवर वाढते. जास्त आर्द्रता असलेल्या वातावरणात बुरशीचा वापर केल्यास बोंडअळ्या व इतर अळ्यांचे नियंत्रण होते.

वरील सर्व मित्र कीटक व सूक्ष्मजंतूंचा कीड नियंत्रणात वापर करता येतो व त्यांचे संवर्धन केल्यास नैसर्गिकरीत्या शत्रू किडींचे नियंत्रण होते. त्यामुळे कपाशीवरील कीटकनाशकांचा सुरवातीच्या काळात वापर टाळावा. त्यामुळे मित्र कीटकांचे संवर्धन होऊन कपाशीवरील किडींचे नियंत्रण होईल. अशाप्रकारे वरील मित्र कीटकांच्या सहाय्याने कपाशीवरील शत्रू किडींना यशस्वीरित्या आटोक्यात आणता येते.

लेखक:
डॉ. एन. के. भुते
(कृषी कीटकशास्त्रज्ञ) 7588082033
गिरीष जगदेव आणि माधव मदने
(वरिष्ठ संशोधन सहाय्यक)
कापूस सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 

cotton kapus कापूस friend insects मित्र कीटक hanpv बीव्हेरिया बॅसियाना beauveria bassiana बॅसिलस थुरीनजिएनसिस Bt Cotton bacillus thuringiensis एच.ए.एन.पी.व्ही ट्रायकोग्रामा Trichoderma
English Summary: Friendly insects and microbes on cotton Crop

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.