घाटेअळी (हेलिकोव्हरपा आर्मिजेरा ) नियंत्रणासाठी एचएएनपीव्ही १० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारण्या कराव्यात. रसशोषक किडी, मावा, तुडतुडे, फुलकिडे याकरिता इमिडाक्लोप्रिड ३ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटेअळीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पुढे १० ते १५ दिवसांनी हेलीओकिल (एचएएनपीव्ही) ५०० मिलि प्रति ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
रब्बी धान्य पिकांची काळजी अशी घ्या
१) रब्बी ज्वारी : कोरडवाहू रब्बीज्वारी पिकामध्ये जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कोळपणी करणे फार महत्वाचे आहे यासाठी रब्बीज्वारी पेरणीनंतर तिस-या, पाचव्या, आठव्या आठवड्यात कोळपणी करावी चिकट्याच्या नियंत्रणासाठी क्रायसोपर्ला कार्निया परभक्षी किडीच्या १० ते १५ हजार आळ्या प्रति हेक्टरी सोडाव्यात अथवा ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा डायमेथोएट (रोगार) ३० इ.सी. ५०० मि.ली. अथवा मोनोक्रोटोफॉस (नुवाक्रॉन) ३६ डब्ल्यू.एस.सी. ३०० मि.ली. ५०० मि.ली. प्रती ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. कोरडवाहू ज्वारीच्या पिकाला उपलब्धतेनुसार पेरणीनंतर ३०-३५ आणि ६०-६५ दिवसांनी संरक्षीत पाण्याची पाळी द्यावी जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी गवताच्या आच्छादनाचा वापर करा.
२) करडई : करडई पिकास पाणी देण्याची सोय असल्यास पीक फुलावर येताना साधारणपणे पेरणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी संरक्षीत पाणी द्यावे मावा किडीच्या नियंत्रणासाठी क्रायसोपर्ला कार्निया परभक्षी किडीच्या १० ते १५ हजार आळ्या प्रती हेक्टरी सोडाव्यात अथवा ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा डायमेथोएट ३० % ७२५ मि.ली. ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारावे किंवा १.५ % क्विनॉलफॉस फवारावे.
३) हरभरा : हरभ-यावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी ५ % निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस २५ इ.सी. १००० मि.ली. ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खुपच कमी असेल, एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येवू लागताच पाणी द्यावे दोन पाणी देण्याची सोय असल्यास पेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी पहिले पाणी आणि घाटे भरताना ६५ ते ७० दिवसांनी दुसरे पाणी द्यावे हरभ-यावरील घाटे अळीच्या बंदोबस्तासाठी प्रती हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत अथवा न्युक्लीअर पॉलीहैड्रोसिस व्हायरस (एच.ए.एन.पी.व्ही) या विषाणूचा वापर करावा अशा ५०० रोगग्रस्त अळ्या घेऊन पाण्यात ठेचून त्याचे द्रावण फडक्यातून गाळून प्रतिहेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी एच.एन.पी.व्ही.ची फवारणी पीक साधारणतः ५० % फुलो-यात असताना व एक मीटर ओळीत दोन आळ्या दिसून येताच करावी नंतर याचप्रमाणे दोन फवारण्या एक आठवड्याचे अंतराने कराव्यात. एच.एन.पी.व्ही.ची फवारणी संध्याकाळी ४ वाजेनंतर करावी.मर रोग नियंत्रणासाठी बियाणे प्रक्रिया, प्रतिकारक बियाणे वापरलेले असावे. मर आढळल्यास ग्याप भरून काढावीत.
४) सुर्यफूल : सूर्यफुलाचे पीक फुलावर असताना परागीभवन वाढविण्यासाठी हाताच्या पंज्यावर वुलन कापड गुडाळून सकाळच्यावेळी दिवसाआड ३ ते ४ वेळा फुलावरून हळूवार हात फिरवा जेथे शक्य असेल तेथे हेक्टरी ३ मधमाश्याच्या पेट्या झिगझँग आकारात ठेवा. सूर्यफुलावरील ठिपक्या रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेन एम-४५ १०० लिटर पाण्यात २५० ग्रँम या प्रमाणात फवारावे फुल, बी खाणा-या अळीच्या नियंत्रणासाठी ५ % निंबोळी अर्क अथवा २५० एच.एन.पी.व्ही. विषाणूग्रस्त आळ्याचे द्रावण हेक्टरी फवारावे.पक्षापासून संरक्षण करा जिरायत पिकास उपलब्धतेनुसार संरक्षीत पाण्याची पाळी द्यावा.
५) गहू : पिकास पेरणीनंतर २१ व्या ४२ व्या ६५ व्या ८५ व्या दिवसांनी येणाऱ्या नाजूक वाढीच्या अवस्थांना नियमीत पाण्याच्या पाळ्या द्याव्या. खुरपणी करून पिक २१ ते २५ दिवसाचे असताना नत्राचा दुसरा हप्ता द्यावा यासाठी हेक्टरी ६० किलो नत्र (१३० किलो युरीया) देऊन लगेच पाण्याची पाळी द्यावी.
६) खोडवा ऊस : अधिक उत्पादनासाठी खोडव्याचे सुधारीत पध्दतीने व्यवस्थापन करावे काणीग्रस्त गवताळ वाढी काढून टाका लोकरी माव्याचा प्रादुर्भाव आढळल्यास ऊसात फोरेट एकरी ५ ते १० किलो टाकावे. लोकरी मावाग्रस्त शेतातील पाचट ऊस तोडणीनंतर शेताबाहेर जाळून टाकावे ऊसाची पाचट न जाळता कंपोस्ट जीवाणू वापरून त्याचे सरीत पसरून खत करावे नवीन संशोधनानुसार कोणत्याही मशागतीशिवाय खोडवा पिकाचे किफायतशीर उत्पादन घेणे शक्य आहे. ऊस तुटून गेल्यानंतर पाचट सलग सर्व सऱ्यात आहे तसेच पडू द्यावे. खोडक्यावर पडलेले पाचट मात्र बाजूला सारून खोडक्या मोकळ्या कराव्यात जमिनीच्यावर दिसणाऱ्या खोडक्या धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्याव्यात. पाचटावर एकरी एक लिटर या प्रमाणात पाचट कुजविणारे जीवाणू संवर्धक त्याचबरोबरीने एकरी ५० किलो युरिया, ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट पाचटावर समप्रमाणात पसरावे. त्यानंतर सर्व सऱ्यांना पाणी द्यावे. पाचट सलग सर्व सऱ्यात आच्छादन केल्यामुळे रासायनिक खताची मात्रा ही पहारीने छिद्रे घेऊन मुळांच्या सानिध्यात द्यावी ऊस तुटून गेल्यानंतर १५ दिवसात शिफारशीत खतमात्रेच्या निम्मी मात्रा उसाच्या ओळीच्या एका बाजूला पहारीने १० सें.मी. खोलीची साधारण १ फूट अंतरावर छिद्र घेऊन द्यावी. त्यानंतर उर्वरित अर्धी मात्रा ३.५ ते ४ महिन्यांनी उसाच्या ओळीच्या दुसऱ्या बाजूला पहारीने छिद्रे घेऊन द्यावी नेहमीप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरूप खताच्या ६० व ९० दिवसांनी दोन फवारण्या कराव्यात यापद्धतीत बाळबांधणी मोठी बांधणी यांसारखी कोणतीही आंतरमशागत करू नये. कोणत्याही मशागतीशिवाय सलग पाचट आच्छादन आणि पहारीने छिद्रे घेऊन मुळांच्या सानिध्यात रासायनिक खते दिल्यास उत्पादनात घट न येता कमीत कमी खर्चात खोडवा पीक चांगले येते.
पूर्वहंगामी ऊस : काणीग्रस्त, गवताळ वाढीची बेटे काढून टाकावी पूर्व हंगामी ऊसाची लागवड होऊन ६ ते ८ आठवडे झाले असल्यास हेक्टरी १३६ किलो नत्राचा (३०० किलो युरीयाचा) दुसरा हप्ता द्यावा. नत्र युरीया खतामधून द्यावयाचे असल्यास निम कोटेड युरियाचा वापर करा. त्यामुळे नत्र पिकाला हळूहळू उपलब्ध होऊन नत्राची बचत होते.
यापूर्वी दिलेल्या पूर्वहंगामी ऊस लागवड तंत्र लेखाचे अवलोकन करावे.
खरीप पिकांच्या काढणीनंतर लगेच शेताची नांगरट करावी रब्बीच्या पिकासाठी शेत तयार करावे व वेळीच रब्बी पिकाची पेरणी करावी.
खरीप पिकाचे आलेले उत्पन्न सोयाबीन,भात, भुईमुग, शेंगा, मूग, उडीद, चवळी, घेवडा इ. सर्व धान्य उन्हामध्ये चांगले वाळवून मगच साठवून ठेवावे.
हवामानाच्या अंदाजानुसार प्रत्येक पिकासाठी रोग व किडीची शक्यता वाटल्यास, रासायनिक औषधे फवारणी पूर्वी उत्तम दर्जाच्या निंबोळी अर्काचा वापर केल्यास उत्पादन खर्च कमी करता येवू शकतो.
फुलझाडांची काळजी अशी घ्या
लागवड केलेल्या फुलझाडांना शिफारस केल्याप्रमाणे खताच्या मात्रा द्याव्या. पिकाचे रोग व किडीपासून संरक्षण करावे.
अँस्टर, निशिगंध व ग्लँडीओलस यास हेक्टरी नत्र ५०, १०० व ६५ किलो द्यावे. १) गुलाबावरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी काँपर आँकसीक्लोराईड १५० ग्रँम किंवा किंवा हेकझाकोनाझोल १५० मिली प्रती १०० लिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने ४ फवारण्या द्याव्यात.
२) ग्लँडीओलसच्या मर रोगाच्या नियंत्रणासाठी कँप्टन (०.३%) ३०० ग्रँम प्रती १०० लिटर पाण्यात मिसळून मुळास प्रक्रीया करावी.
गारपीट झाली तर
या महिन्यात अचानक हवामानातील बदलामुळे गारपीट होणेची शक्यता असते. असे झाल्यास त्यासाठी खालील उपाययोजना करावी.
गारपीटीनंतर हवेत थंडावा निर्माण होतो.
१) थंडीपासून फळबागेचे संरक्षण करणेसाठी त्याचदिवशी बागेस विहीरीचे पाणी देऊन हलके ओलीत करावे.
२) द्राक्षे किंवा बोर बागेची फळगळ झाली असल्यास तात्काळ स्वच्छता करावी. ऊस, ज्वारी पिकाची पड झाली असल्यास पीक बांधणी करावी.
३) बागेभोवती बांधावर काडीकच-याचे ढीग करून ते पेटवून शेकोट्या कराव्यात
४) झाडाच्या खोडाभोवती व आळ्यात गवत पालापाचोळा इ. चे जमिनीवर आच्छादन करावे.
५) थंड हवामानामुळे द्राक्षे पिकावर झॉन्थोमोनस करपा आणि केवडा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते तेव्हा पिकावर प्रति जैविके, बुरशीनाशकाच्या फवारण्या द्याव्यात उदा. स्ट्रेप्टोसायक्लीन ५० ग्रँम अधिक कॉपर ऑक्झिक्लोराईड १२५० ग्रँम ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यामुळे अणुजीव रोगापासून पिकांचे संरक्षण होईल.
जनावरांची काळजी अशी घ्या.
१) जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावेत जनावरांच्या अंगावर गोचीड प्रतिबंधक पावडर लावा तसेच परमेथ्रीन १ मि.ली. प्रती लिटर फवारणी योग्य ठरते. शेळ्या,मेढ्यांना आंत्रविषार, लाळखुरकत, घटसर्प रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण करून घ्या लिव्हर प्ल्युक या रोगामुळे जनावरांचे खाणे कमी होते. खालच्या जबड्याखाली सूज येते जनावरे खंगतात, कदाचित मरतात प्रतिबंधक उपाय म्हणून सर्व जनावरांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंताचे औषध पाजावे पिण्यास नेहमी स्वच्छ पाणी द्यावे. शेळ्यांमधील लिव्हर फ्ल्युक (चपटे कृमी) जंताच्या नियंत्रणासाठी फेनवेन्डाझील जंतनाशक पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पाजावे.
अतिरिक्त हिरव्या चाऱ्यापासून मुरघास बनवावे
वर्षातील उरलेल्या ७ ते ८ महिन्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता भासणार नाही जनावरांचे गोठे वेळोवेळी धुवून स्वच्छ ठेवावेत. भरपूर उजेड, हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. आजारी जनावरांना वेगळे ठेवावे. त्यांचे मलमूत्र दूर नेऊन पुरून टाकावे.
फळबागांची काळजी अशी घ्या
१) डाळींब,मोसंबी,संत्रा : या फळझाडांच्या आंबेबहार घ्यावयाचा असल्यास जमिनीच्या मगदुराप्रमाणे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात १ ते १.५ महिना पाणी हळूहळू कमी करून बंद करावे. खोडाला बोर्डोपेस्ट लावावी. वाळलेल्या फांद्या काढून टाका. रानाची मशागत करून पाणी तोडण्याच्या दृष्टीने रानबांधणी करावी. फळबागेसाठी पाण्याची कमतरता असल्यास कलमांच्या, रोपांच्या अळ्यात १.५ % क्विनॉलफॉस फवारावे. त्यावर १५ से.मी. जाडीच्या १ मिटर व्यासाचे वाळलेल्या गवताचे किंवा काडाचे किंवा पाचटाचे आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या कलमांना काठीचा आधार देऊन सुतळीने कलमे सैलसर बांधावीत जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देताना कलमांच्या जोडाचा भाग पाण्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी.पाण्याची कमतरता असल्यास फळझाडांना पाणी देताना मडका सिंचन किंवा ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करा
नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांचा मोहोर, डाळीबाची फुले तसेंच पेरू चिकू इ. कलमांची फळे तोडून टाका.
२) आंब्याला : मोहोर येताच भुरी व तुडतुड्यांचा उपद्रव टाळण्यासाठी ३०० मेश गंधक, १.५ % क्विनॉलफॉस एकास एक या प्रमाणात मिसळून झाडावर धुरळावी किंवा ८० % पाण्यात विरघळणारे गंधक २५ ग्रँम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. अशा २ ते ३ धुरळण्या किंवा फवारण्या दर १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात आंबा कलम करताना बांधलेली प्लँस्टीक पट्टी सोडली नसल्यास सोडावी. कलमाच्या जोडाखालची फूट काढावी व कलमाला आधार द्यावा.
३) केळी : कांदेबाग लागवडीस दोन महिने होत आले असल्यास नत्राचा १०० ग्रँम प्रती झाड पहिला हप्ता द्यावा.
४) डाळींब :नवीन लागवड केलेल्या झाडांना काठीचा आधार द्यावा आंबेबहार धरण्यासाठी पाणी तोडावे खोडावर बोर्डोपेस्ट लावावी. डाळींबावरील रोग व किडीचा बंदोबस्त करावा. बागेमध्ये झाडाखालील रोगट, सडलेली फळे गोळा करून नायनाट करावा. फळ पोखरणा-या अळीच्या बंदोबस्तासाठी ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा क्लोरो डस्ट १.५% पावडर १००० ग्रँम किंवा मोनोक्रोटोफॉस ११०० मि.ली. ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी फळकुज रोगाच्या बंदोबस्तासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड १२५० ग्रँम अधिक स्ट्रप्टोसायक्लीन ५० ते १०० ग्रँम ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे
५) अंजीर :तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी, क्लोरोथॅलोनिल २ ग्रॅम अधिक कार्बेन्डान्झीम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी. पुढील फवारणी आवश्यकतेनुसार १० दिवसांच्या अंतराने करावी बागेत गळालेली, वाळलेली पाने बागेबाहेर नेऊन जाळावीत. बाग स्वच्छ ठेवावी फळांचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी पक्षिरोधक जाळीचा वापर करावा. फळ पक्वतेच्या काळात बागेस नियमित पाणीपुरवठा करावा फळ तोडणीनंतर ताबडतोब बाजारपेठेत पाठवावे.
भाजीपाला पिकांची काळजी अशी घ्या
कांदा :रब्बी उन्हाळी कांद्याची लागवड पूर्ण करावी. त्यासाठी फुले सुवर्णा, एन-२-४-१, पुसा रेड, फुले सफेद, या जाती वापराव्यात. रब्बी कांदा लागवडीस महिना झाला असल्यास नत्राचा दुसरा हप्ता हेक्टरी ५० किलो प्रमाणे द्यावा. करपा रोगाचे नियंत्रणासाठी डायथेन एम-४५, १२५० ग्रँम ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी रोगाबरोबरच किडीपासून संरक्षण करावयाचे असल्यास त्यातच ५ % निंबोळी अर्क अथवा मँलेथिऑन ५० इ.सी. ५०० मि.ली. अथवा क्विनॉलफॉस २५ इ.सी. ६०० मि.ली अथवा मोनोक्रोटोफॉस ३५ डब्ल्यू.एस.सी. ५५० मि.ली. यापैकी आलटून पालटून एक एक किटकनाशक प्रतिहेक्टरी ५०० लिटर पाण्यात ५०० मि.ली. स्टीकर मिसळून १० ते १२ दिवसांच्या अंतराने फवारावे.
कोबी, फुलकोबी, ब्रोकोली
या पिकांमध्ये चौकोनी ठिपक्याच्या पतंगाचा प्रादुर्भाव होतो त्यांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजनेचा अवलंब करावा. लागवडीपूर्वी मुख्य पिकाच्या २५ ओळीनंतर २ ओळी मोहरीच्या पेराव्यात. त्याचप्रमाणे शेताच्या बांधावरही मोहरी पेरावी. शेतात पक्षी बसण्यासाठी पक्षीथांबे लावावेत. ते किडीचा फडशा पाडतात एकरी ५ गंध सापळे लावावेत मोहरीवर अळ्या दिसू लागताच, डायक्लोरव्हॉस १० मि.लि. प्रति १० लिटर प्रमाणे फवारणी करावी. कोबी पिकावर पहिली फवारणी २ अळ्या प्रति रोप दिसू लागताच बी.टी. जिवाणूवर आधारित कीटकनाशक १० ग्रॅम प्रति १० लिटर प्रमाणे संध्याकाळी करावी त्याचप्रमाणे ट्रायकोग्रामा बॅक्ट्री कीटक हेक्टरी १ लाख या प्रमाणात सोडावेत. दुसरी फवारणी निंबोळी अर्क ४ टक्के, तिसरी फवारणी इंडोक्झाकार्ब १० मि.लि. किंवा स्पिनोसॅड (२.५ एस.सी.) १० मिली प्रति १० लिटर प्रमाणे करावी. चौथी फवारणी ४ टक्के निंबोळी अर्काची करावी.
बटाटा खंदणी करून भर द्यावी. नत्र खताचा दुसरा हप्ता हेक्टरी ५० किलो द्यावा.
टोमँटो :झाडांना आधार देण्याचे काम पूर्ण करावे. नत्राचा दुसरा हप्ता हेक्टरी ५० किलो द्यावा फळ पोखरणा-या अळीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी पाच ट्रायकोकार्ड शेतात लावावी अथवा २५० एच.एन.पी.व्ही. विषाणूग्रस्त आळ्यांचे द्रावण प्रती हेक्टरी फवारावे अथवा क्लोरो डस्ट १.५% पावडर , ४५ ग्रँम, १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ %, २१ मि.ली.१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पानावरील ठिपका रोगनियंत्रणासाठी बाविस्टीन ०.१% फवारावे.
वांगी :शेंडा व फळे पोखरणारी अळी, तुडतुडे, मावा, फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी पाच ट्रायकोकार्ड प्रती हेक्टरी लावावी तसेंच १० ते १५ हजार क्रायसोपर्ला कार्नियाच्या आळ्या प्रती हेक्टरी सोडाव्यात अथवा इमामेक्टिन बेंझोएट ४ ग्राम किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ %, १४ मि.ली. क्लोरो डस्ट १.५% पावडर ३० ग्रँम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नत्र खताचा दुसरा हप्ता हेक्टरी ५० किलो प्रमाणे द्यावा.
वाटाणा :लागवडीसाठी बोनोव्हील, अर्केल, सिलेक्शन ८२, सिलेक्शन ९३, खापरखेडा या जाती वापराव्यात. लागवड पूर्ण करा. लागवडीपूर्वी रायझोबियम, स्फुरद जीवाणूची प्रत्येकी २५० ग्रँम प्रती १० किलो बियाण्यावर बिजप्रक्रीया करा शेंग पोखरणारी अळी व मावा यांचा बंदोबस्त करावा. यासाठी एच.एन.पी.व्ही. ग्रस्त २५० अळ्यांचे द्रावण प्रती हेक्टरी फवारावे व माव्यासाठी १० ते १५ हजार क्रायसोपर्ला कार्नियाच्या आळ्या हेक्टरी सोडाव्यात अथवा मिथिल डिमेटॉन २५ %, ८ मि.ली. किंवा डायमेथोएट ३० %, १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भोपळावर्गीय भाज्या तसेंच कोबी, कॉलीफ्लॉवर :* यावरील केवडा रोग नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड २५० ग्रँम या बुरशीनाशकाची प्रति १०० लिटर पाण्यातून फवारणी करावी. भाजीपाला पिकावरील करपा रोग नियंत्रणासाठी दर १० दिवसाचे अंतराने कॉपर ऑक्झिक्लोराईड २५० ग्रँम प्रति १०० लिटर पाण्यातून फवारावे. तसेच विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार टाळण्यासाठी रोगट झाडे उपटून त्यांचा नाश करावा. त्याचप्रमाणे रोगप्रसार करणा-या किडींच्या नियंत्रणासाठी क्विनोलफोस १५० मि.ली.ची वरील बुरशीनाशकात मिसळून फवारणी करावी.
Share your comments