
शेतकऱ्याचं जीवन म्हणजे रात्रंदिवस मातीशी नातं. बी पेरतो, खतं घालतो, पाणी देतो, उन्हातान्हात राबतो… पण कधी कधी असं होतं की, एवढं सगळं केल्यावरही पीक वाढत नाही, पानं पिवळी पडतात, झाडं मरगळतात, उत्पादन घटतं…आणि आपल्याला वाटतं, "काहीतरी चुकलंय!"
हो बरोबर- चुकतंय! पण ती चूक आपल्या डोळ्यांना दिसत नाही. कारण ती मातीखालची आहे… झाडाच्या मुळांमध्ये आहे… आणि तीच आहे 'निम्याटोड'!
निम्याटोड म्हणजे काय?
१. निम्याटोड हे डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म कृमी असतात.
हे मातीमध्ये किंवा मुळांच्या पेशींमध्ये राहतात आणि तिथूनच झाडाचं अन्न शोषून घेतात.
२. यामुळे झाडाला पोषणच मिळत नाही – मग झाड पिवळं पडतं, वाढ खुंटते, आणि शेवटी पीक हातातून जातं.
लक्षणं काय असतात? हे लक्षात ठेवा:
१. झाडं पाण्याअभावी नाही, तरी मरगळलेली दिसतात.
२. पानं पिवळी पडतात.
३. मुळ्यांवर गाठी तयार होतात.
४. झाड वाढत नाही, फुलं येत नाहीत.
५. उत्पादनात अचानक मोठी घट
६. "जेव्हा खतं दिली, तरीही पीक उभं राहत नाही… तेव्हा निम्याटोड असण्याची शक्यता नक्की समजा!"

कोणत्या पिकांमध्ये असतो जास्त धोका?
निम्याटोड जवळपास सर्वच पिकांमध्ये आढळतो, पण काही पिकांमध्ये तो अधिक घातक ठरतो.
१. टोमॅटो, वांगी, मिरची, हरभरा, तूर, सोयाबीन
डाळिंब, केळी, संत्रा, कांदा, लसूण, गहू, फुलशेती- गुलाब, गेंदा, शेवंती.
कसा ओळखायचा?
१. झाडांची वाढ थांबलेली दिसते.
२. मुळं उकरून बघा – गाठी दिसतील का पाहा.
३. माती नमुना KVK किंवा प्रयोगशाळेत द्या.
तज्ज्ञ सल्ला घ्या.
नियंत्रणासाठी सेंद्रिय उपाय-
- निंबोळी पेंड- 200 ते 300 किलो/एकर
- ट्रायकोडर्मा, व्हर्टिसिलियम, पॅसिलोमायसिस- जैव नियंत्रणासाठी उपयोगी
- गोमूत्र, जीवामृत, कंपोस्ट- मातीचे आरोग्य टिकवतात
प्रभावी उपाय:
- पिकांची फेरपालट- सतत एकाच प्रकारचं पीक टाळा.
- सोलरायझेशन- उन्हाळ्यात प्लास्टिक टाकून माती तापव.
- सेंद्रिय खतांचा वापर वाढवा- मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव वाढता.
रासायनिक उपाय- (तज्ञांच्या साहाय्याने करावा.)
फेनामायफॉस, कार्बोफ्युरॉन, क्लोरोपायरीफॉस
शेतकऱ्याचा अनुभव-
"आमचं डाळिंबाचं बागायती पीक काही केल्या जमत नव्हतं. झाडं पिवळी, फुलं पडत होती. नंतर तपासणीत मुळांवर गाठी आढळल्या. ट्रायकोडर्मा, निंबोळी पेंड वापरलं, जमिनीचा फेरविचार केला… आणि पुढच्या हंगामात ६०% वाढ मिळाली!"- श्री. घाडगे, सोलापूर
एक्स्पर्ट सल्ला:
१. "जशी जनावरांना रोग ओळखून उपचार करतो, तशीच आपल्या जमिनीचं आरोग्य तपासून, योग्य औषध आणि काळजी घ्या!"*
२. "तुमच्या घामाचं सोनं – कोण खातंय माहितेय का? तो शत्रू आहे तुमच्याच मातीखाली… आता वेळ आहे त्याला ओळखण्याची आणि मुळापासून नष्ट करण्याची!"
लेखक-
नितीन रा. पिसाळ
पशुसंवर्धन सल्लागार व कृषी अभ्यासक
फार्मर द जर्नलिस्ट- कृषी जागरण
Share your comments