भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिनांक 13 एप्रिल 2021 पासून जमीन सुपोषण व संरक्षण जनजागरण अभियान राबविण्यासाठी सुरुवात केली आहे. या अभियानाचा एक महत्वाचा उद्देश म्हणजे जमिनीचे आरोग्य टिकून राहण्याकरिता व शाश्वत पीक उत्पादन मिळविण्याकरिता रासायनिक खताचा वापर माती परीक्षणाच्या आधारावर योग्य तेवढाच झाला पाहिजे.
रासायनिक खते वापरताना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे संबंधित पिकात सेंद्रिय खते, जैविक खते व माती परीक्षणाच्या आधारावर योग्यवेळी योग्य प्रमाणात रासायनिक खताचा तसेच विद्राव्य खतांचा संतुलित वापर झाला पाहिजे म्हणजे जमिनीचे आरोग्य टिकून राहील व पीक उत्पादनात वाढ होऊन शेतकरी बंधूंचे निव्वळ उत्पन्न वाढण्यासाठी सुद्धा फायदा होईल. आज आपण या अनुषंगाने रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होण्याकरिता कोणत्या सर्वसाधारण बाबीचा अंगीकार करावा याबाबत काही टिप्स पाहणार आहोत.
हेही वाचा : सिताफळ बागातील कीड व्यवस्थापन ; जाणून घ्या! किडींची माहिती
शेतकरी बांधवांनो सर्व पिकांमध्ये खते देण्यापूर्वी सर्वप्रथम माती परीक्षण करून घ्या व माती परीक्षणाच्या आधारावर सेंद्रिय खत, जैविक खत, या खताच्या
-
वापराबरोबर गरज आहे तेवढेच शिफारशीत रासायनिक खताची मात्रा संबंधित पिकात योग्य शिफारशीत वेळी द्या.
-
नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विशेषता युरियाचा वापर करताना नीम कोटेड युरियाच्या वापराला प्राधान्य द्या.
-
नत्रयुक्त खताची मात्रा एकाच वेळी न देता पिकाच्या विविध अवस्था लक्षात घेऊन संबंधित कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे संबंधित पिकात नत्रयुक्त खताची मात्रा दोन किंवा
-
तीन हप्त्यात विभागून द्यावी. जमिनीत घातलेले नत्र उडून अथवा वाहून जाऊ नये याकरता पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे.
-
सर्वसाधारणपणे कमी कालावधीच्या पिकात स्फुरद व पालाशयुक्त खते एकाच हप्त्यात पेरणीच्या वेळी बियापासून पाच सेंटीमीटर खोलीवर द्यावीत.
-
ही खते विभागून द्यावयाची झाल्यास संबंधित कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे पिकाच्या शाखीय वाढीनुसार व पाण्याची उपलब्धता पाहून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विभागून सुद्धा देता येऊ शकतात, त्यासाठी गरजेनुसार तज्ञांचा सल्ला घ्यावा.
-
डाळवर्गीय व तेलवर्गीय पिकासाठी गंधक युक्त खताचा वापर करावा.
-
दीर्घकालीन पिकासाठी संयुक्त खताच्या वापरासाठी प्राधान्य द्यावे.
-
स्फुरदाची उपलब्धता सुकर होण्याकरिता पूर्णपणे विद्राव्यशील खताची निवड करावी तसेच स्फुरदाची कार्यक्षमता वाढण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू खताचा वापर करावा.
-
चुनखडीयुक्त जमिनीत युरिया, अमोनियम सल्फेट, तसेच स्फुरदयुक्त खते जमिनीच्या पृष्ठभागावर फेकून देऊ नये
-
स्फुरदयुक्त सिंगल सुपर फॉस्फेट सारखी खते शेणखतात मिसळून दिल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते. रासायनिक खते देण्यापूर्वी पिकांची फेरपालट करताना कडधान्य, हिरवळीची खते यांचा पिकाची फेरपालट करताना समावेश केला का हा प्रश्न मनाची जरूर विचारावा कारण पिकांच्या फेरपालटि मध्ये कडधान्य व हिरवळीच्या पिकाचा समावेश केला तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढीस लागतो व रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होते.
-
पिकांच्या गरजेनुसार अन्नद्रव्याचा रासायनिक खताद्वारे पुरवठा करावा. उदाहरणार्थ सर्वसाधारणपणे तृणधान्य पिकाला नत्र जास्त लागते तर कडधान्य पिकाला स्फुरद जास्त लागतो तर गळीत धान्य पिकाला स्फुरद पालाश व गंधकाची गरज जास्त असते. त्यामुळे जमीन हलकी किंवा अतिशय निचऱ्याची असल्यास नत्रयुक्त खतांबरोबर पालाश युक्त खत वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत विभागून देता येते परंतु ह्या सर्व बाबी करण्यापूर्वी माती परीक्षणाच्या अहवालाच्या आधारावर संबंधित कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे तज्ञांचा सल्ला घेऊन कराव्यात.
-
माती परीक्षणाच्या अहवालानुसार संबंधित सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार संबंधित सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीमध्ये शेणखतामध्ये मिसळून पेरणीपूर्वी त्यांचा वापर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करता येईल तसेच माती परीक्षणाच्या अहवालानुसार सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास संबंधित सूक्ष्म अन्नद्रव्य उदाहरणार्थ जस्त,मंगल, तांबे इत्यादी सुक्ष्म अन्नद्रव्ये संबंधित पिकातील शिफारशीप्रमाणे व कमतरते प्रमाणे चिलेटेड स्वरूपात घेऊन फवारणीतून सुद्धा देता येतील त्याकरिता माती नमुन्याचे पृथक्करण करून तज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार वापर करावा.
-
काही पिकात उदाहरणार्थ सोयाबीन, कपाशी यासारख्या पिकात काही रासायनिक खते फवारणीद्वारे उभ्या पिकांना योग्य अवस्थेत देणे सुद्धा फायदेशीर असते. उदाहरणार्थ सोयाबीन पिकात पेरणीनंतर 50 व 70 दिवसांनी दोन टक्के युरियाची फवारणी करण्याची शिफारस आहे तर कपाशी पिकात पीक फुलावर असताना दोन टक्के युरियाची आणि बोंडे भरण्याच्या अवस्थेत असताना दोन टक्के डीएपीची फवारणी करण्याची शिफारस आहे त्यामुळे अन्नद्रव्याचे कार्यक्षम व्यवस्थापन होते व पीक उत्पादनात वाढ होते.
हेही वाचा : कपाशीच्या शेतीतून बोंड अळीचा नायनाट करायाचा असेल तर 'या' गोष्टी आहेत महत्त्वाच्या
माती परीक्षणाच्या आधारावर संबंधित पिकातील कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारे पिकांना त्यांच्या वाढीच्या अवस्थेनुसार दिल्यास अन्नद्रव्यांच्या कार्यक्षम शोषण होऊन कार्यक्षमता वाढते व खताची बचत होते. अन्नद्रव्याचे व्यवस्थापनासाठी केवळ रासायनिक खतावर विसंबून न राहता जैविक खताचा तसेच सेंद्रिय खताचा सुद्धा योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे. एकदल धन्याला पेरणीपूर्वी अझोटोबॅक्टर व पीएसबी या जिवाणू खताची 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात तर द्विदल धान्याच्या पिकाला रायझोबियम व पीएसबी जिवाणू खताची 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करून घेतल्यास नत्राचे स्थिरीकरण व स्फुरदाची उपलब्धता होण्यास फायदा होतो व त्यामुळे रासायनिक खताच्या मात्रेत बचत होते व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास सुद्धा मदत मिळते व पिकाचे उत्पादनात वाढ मिळते.
समस्यायुक्त जमिनीत रासायनिक खते देण्यापूर्वी अशा समस्यायुक्त जमिनीची सुधारणा करून घ्यावी उदाहरणार्थ आम्लयुक्त जमिनीत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आता बरोबर चुना टाकून तर विम्लयुक्त चोपण जमिनीत जिप्सम किंवा गंधक शेणखतात मिसळून जमिनीची सुधारणा करून घेता येते अर्थात याबाबतीत तज्ञांचा सल्ला घेऊन माती परीक्षणाच्या अहवालानुसार समस्यायुक्त जमिनीमध्ये जमिनीची सुधारणा करून घ्यावी नंतर रासायनिक खताचा वापर अशा जमिनीत केल्यास अन्नद्रव्याचे कार्यक्षम व्यवस्थापन मिळते व जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते.
शेतकरी बंधुंनो रासायनिक खते एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अविभाज्य आणि महत्त्वाचा घटक असले तरीही माती परीक्षाचा आधारावर सेंद्रिय खते जैविक खते व योग्य तेवढ्या प्रमाणात गरजेनुसार रासायनिक खताचा कार्यक्षम वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होईल व पिक उत्पादन व उत्पन्नात सुद्धा वाढ होईल. धन्यवाद
लेखक - राजेश डवरे कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments