कापूस हे महाराष्ट्रात नव्हे तर पुर्ण देशात घेतले जाणारे नगदी पीक आहे. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात कापसाची मागणी खूप जास्त आहे. परदेशातही कापसाला मागणी मोठी आहे. कापसाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. यावर्षीही कापासाच्या शेतीकडे अनेक शेतकरी वळले आहेत. सोयाबीनच्या बियाणांचा तुटवडा झाल्याने शेतकरी आता कापूसची लागवड करत आहेत. व्यापारी पीक असल्याने कापासाच्या शेती करण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल असतो. विदर्भ, खानदेश, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर, मराठावड्यातील बहुसंख्य शेतकरी कापसाचे उत्पन्न घेतात. परंतु गेल्या वर्षांपासून पावसाची अनिमियतपणा, बाजारपेठेतील अनिश्चितता, लागवडीचे चुकीचे तंत्र, चांगल्या गुणवत्तेच्या बियाणांचा अभाव अशा कारणांमुळे कपाशीच्या उत्पादनांतल घट येत आहे. यामुळे बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेतीवर झालेला खर्च काढणेही कठीण होत असते.
पण शेतकरी बांधवांनी जर नवीन तंत्र, सिंचनाची योग्य सुविधा, कीटकनाशकांचा नियोजनात्मक वापर, कमी उत्पादन खर्च कमी केला तर कापसाच्या शेतीतून नक्कीच फायदा होईल. चांगल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. यात बियाणांची निवड, खत व्यवस्थापन, किड व्यवस्थापन, तण नियंत्रण , पाणी पुरवठा, वेचणीचे नियोजन व्यवस्थित ठेवले तर आपल्याला या पिकांतून अधिक उत्पन्न मिळेल.
बियाणांची निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल - बाजारातून बियाणे आणताना शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारच्या जाहिरातींना किंवा इतर पोस्टरबाजीवर विश्वास ठेवू नये. बियाणांचे गुणधर्म पाहून त्यांची निवड करावी. यात आपण झाडांना येणाऱ्या बोंडांचे वजन, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता, धाग्याची लांबी, कीड व रोगांशी लढण्याची शक्ती कशी आहे. किती कालावधीत उत्पन्न येते या गोष्टींची तुलना करुन आपण बियाणांची निवड करावी.
नियोजनात्मक खत व्यवस्थापन(दर एकरी - ) लागवडीपूर्वी कापूस या पिकाला शेणखत आणि कंपोस्ट खत देणे फार महत्त्वाचे असते. कोरडवाहू बीटी - कपाशीसाठी २५ किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश या खतांचा लागवडीपूर्वी उभी- आडवी पेरणी करुन घ्यावी. साधारण २५ दिवसांनी एकरी २५ किलो नत्राचा पुरवठा करावा, सुक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य देण्यासाठी माती परिक्षण करणे आवश्यक असते. माती परिक्षण केले असेल तर त्याच्या आधारे सुक्ष्म व दुय्यम मात्रा द्याव्यात.
किड व्यवस्थापन - कापूस पिकांवर प्रामुख्याने रसशोषक किडीचा प्रादुर्भाव जास्त होत असतो. जसे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, गुणनी बोंड अळी आदींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. किटकांवर नियंत्रण करण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या व कमीत कमी खर्चात नियोजन केल्यास परिणामकारक फायदा मिळू शकतो.
तण नियंत्रण - कपाशी पीक तणविरहित ठेवणे हे कपाशीच्या उत्पादन वाढीसाठी फार मह्त्त्वाची बाब आहे. पेरणीनंतर खुरपी आणि कोळपणी करणे फार आवश्यक असते. जेणे आवश्यक असेल तेथे तण नियंत्रणासाठी कृषी अधिकाऱ्याच्या सल्ला घेऊन तणनाशकांचा वापर करुन करावा.
नियोजनात्मक पाणी पुरवठा - कपाशीची लागवड केल्यानंतर पेरणी केल्यापासून ते रोपाला पाते फुटेपर्यत कमी पाणी पुरवठा करावा. कारण पिकांची अनावश्यक वाढ होत नाही. कपाशीच्या झाडांना फुलोरा आल्यानंतर आणि झाडांना बोंडे येऊ लागल्यानंतर पाण्याचे प्रमाण वाढवावे लागते. जमिनीत ओलावा असणे फार गरजेचे असते. ठिंबक सिंचनाचा वापर करून आपल्याला पाण्याचे योग्य व्यवस्थापन करता येते.
वेचणीचे नियोजन - झाडावर अंदाजे २० ते २५ टक्के बोंडे फुटल्यावर पहिली वेचणी करावी. त्यानंतर २० ते २५ दिवसांच्या अंतराने वेचण्या कराव्यात. कपाशीची वेचणी सकाळी करता आली तर अधिक चांगले असते. वेचणी करताना कपाशीच्या बोंडाला सुकलेला कचरा, कपाशीचे पाते, लागणार नाहीत, याची काळजी घ्यावी. जेणेकरुन कपाशीची प्रत चांगली येईल व बाजारात चांगला दर मिळेल.
लेखक
रत्नाकर पाटील- देसले
Share your comments