1. कृषीपीडिया

पर्यावरणातील घटक आहे शेतीसाठी उपयुक्त, बघा काजव्यांचे शेतीमधील योगदान

पूर्वी पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी काजवे लुकलुकत असतं. लहानपणी आपल्यातील अनेकांनी काजवे पकडून ते काचेच्या बाटलीत भरून ती बाटली अंधाऱ्या खोलीत ठेवून त्याचा प्रकाश पाहिला असेल. पण आता ही काजवे कुठे गेली हे कळतच नाही.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
काजव्यांचे शेती मधील योगदान.

काजव्यांचे शेती मधील योगदान.

पूर्वी पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी काजवे लुकलुकत असतं. लहानपणी आपल्यातील अनेकांनी काजवे पकडून ते काचेच्या बाटलीत भरून ती बाटली अंधाऱ्या खोलीत ठेवून त्याचा प्रकाश पाहिला असेल. पण आता ही काजवे कुठे गेली हेकळतच नाही. अवघ्या तीस वर्षात हे काजवे अश्या पद्धतीनं गायब होतील, याचा विचार त्या काळी कधी केला नव्हता.

आज तास भर अंधारात फिरलो तरी नजरेला जेमतेम एक तरी काजवा दिसला तर नशीब. हे काजवे गेले तरी कुठे??? त्यांचे भविष्य काय?? त्यांचा जीवनक्रम कसा असतो?? काजवे काय खातात?? ते कसे चमकतात?? याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
तर काजवे भुंग्यांच्या कुळात मोडतात जगभरात काजव्याच्या जवळपास २००० विविध प्रजाती विखुरलेल्या आहेत. त्यातील भारतात जेमतेम ९ ते १० प्रजाती आढळतात. काजव्यांचा जीवनक्रम पूर्ण व्हायला एक वर्ष जाते. पावसाळ्यात एक मादी तब्बल १०० अंडी देते. ही अंडी ती एखाद्या झाडाच्या खोडामधे किव्वा पाणथळ जागांच्या शेजारी, किव्वा उंच गवताळ ठिकाणी पालापाचोळा मध्ये दिली जातात. काजव्याची अंडी व अळी दोन्ही अंधारात चमकतात. साधारण दोन आठवड्यात अंड्यातून कजव्याची अळी बाहेर येते, आणि मग सुरू होतो जगण्यासाठीचा तिचा संघर्ष.

या काळात ती छोटे मोठे किडे, शेतीस नुकसानदायक असलेले कीटक व अळ्या तसेच शेतात पिकावर ताव मारणाऱ्या गोगलगाई, इत्यादी खाऊन फस्त करतात. आणि त्या विकासाच्या पुढल्या टप्प्यात जातात. प्रतेक वेळी जेव्हा त्यांचा आकार वाढतो तेव्हा त्या कात टाकतात. एकूण पाच वेळा कात टाकल्यानंतर अळ्या विकासाच्या पुढच्या टप्प्यात येतात,जिथे त्या फुलपाखरा प्रमाणे कोश रुप धारण करतात. तो वेळ असतो मे ते जून महिन्याच्या. आणि पावसाच्या एक दोन जोरदार सरी येऊन गेल्या नंतर ह्या कोषातून लुकलुकणारे काजवे बाहेर येतात.

आता त्यांचे दुसरे आयुष्य सुरू होते. जिथे ते हवेत उडणारे लहान मोठे कीटक खातात. लहान मोठ्या किटकांव्यातिरिक्त ते स्वाजाती भक्षण देखील करत असल्याचे समोर आले आहे. प्रतेक जातीचा काजवा एका विशिष्ट पद्ध्तीने लुकलुकत असतो. काही काजवे अगदी कमी वेळात जलद गतीने लुकलुक करतात, तर काही मंद गतीने लुकलुकत असतात. त्यांच्या लुकलुकणाऱ्याची वारंवारता त्यांना त्यांच्या जनुकीय संरचनेच्या आधारे मिळते. ज्यामुळे हे काजवे आपल्या जातीच्या नर व मादांना ओळखतात आणि आकर्षित करतात. काही जातीच्या मादा इतर जातींच्या लुकलुक करण्याच्या पद्धती ची नक्कल करून दुसऱ्या जातीच्या नराला आकर्षित करतात व त्याला भक्ष देखील बनवतात.
असे हे काजवे कोषातून बाहेर आले की त्यांच्या जवळ खूपच कमी वेळ असतो. कारण कोषातून बाहेर आल्यावर त्यांचे आयुष्य केवळ दहा ते पंधरा दिवसांचे असते.

 

एवढ्या कमी वेळात त्यांना मादी सोबत मिलन करून त्यांची पुढली पिढी निर्माण करण्यासाठी स्पर्धा सुरू असते. म्हणून बहुदा बरेच नर काही न खाता केवळ मिलन करणे हाच एक क्रम सुरू ठेवतात आणि लवकरच मरून जातात. पुढे मादीदेखील अंडी दिल्या नंतर अवघ्या काही दिवसात मरून जाते. आणि आता अंड्यातून अळी अळी पासून कोश आणि कोषापासून काजवा तयार व्हायला तब्बल एक वर्षाचा काळ लागतो. आपल्या आयुष्याचा खूप मोठा काळ अश्या रीतीने काजवे जमिनीवर काढत असतात.काजवे पूर्वी खूप दिसायचे कारण त्या काळी बऱ्याच पाणथळ जमिनी अस्तित्वात होत्या, ठीक ठिकाणी असलेल्या पाणथळ जमिनींमुळे भूजल पातळी काठोकाठ भरलेली असे परिणामी जमिनीतील आद्रता पूर्ण वर्षभर टिकून राहत असे, तसेच त्या वेळी मोठं मोठी गवताची कुरणे आमच्या पालघर जिल्ह्यात अस्तित्वात होती ज्यामुळे उंच वाढलेल्या दाट गवता मुळे सूर्यप्रकाश जमिनी पर्यंत पोहोचत नसे.

ज्यामुळे तेथे काजव्यांसाठी योग्य आद्रता वर्षभर टिकून राही. तसेच शेतांच्या बांधावर नागफणी, थेंगड, इत्यादी काटेरी झाडांचे कुंपण असे ज्या मुळे अश्या ठिकाणी देखील आद्रता चांगल्या प्रकारे राहत असे आणि बरोबर ह्या ठिकाणी असलेल्या खेकड्याच्या सुक्या बिळात कजव्यांच्या अळ्या रात्री चमकताना दिसत. पुढे हळू हळू एका पाठोपाठ एक पाणथळ जागा आणि गवताळ कुरणे नष्ट होत गेल्या, ज्या मुळे जमिनीतील आद्रता पावसाळा संपल्यानंतर देखील टिकेनाशी झाली. परिणामी काजव्यांच्या अळीला जगण्यासाठी आवश्यक असलेली आद्रता मिळेनाशी झाली.

पुढे शेतात देखील माणसाने फवारणी आणि रासायनिक खते टाकायला सुरुवात केली. ज्या मुळे इतर उपद्रवी किटकांपाठोपाठ परागीभवनासाठी उपयुक्त असणाऱ्या मधमाश्या आणि इतर काजव्यांसरख्या शेतीस उपयुक्त कीटक देखील नष्ट झाले. उरली सुरली कसर वाढत्या शहरकरणाने पूर्ण केली. ज्या मुळे अगदी थोडा वेळ मिलनासठी पंख उघडून लुकलुक करणारे हे कीटक रात्रीच्या वेळी लावलेल्या एल. ई.डी. आणि इतर झगमगाटामुळे त्यांना त्यांचा जोडीदार शोधण्यात अडथळे येऊ लागले. ज्या मुळे आधीच कमी उरलेल्या काजव्यांच्या संख्येत आणखीन घट होत गेली. पुढे निसर्ग पर्यटन या नावाखाली उरल्या सुरल्या ठिकाणी जिथे आजही काजवे त्यांची शेवटची लुकलुक करून पृथ्वीच्या पाठीवरुन कायमचे नष्ट होणार आहेत अश्या ठिकाणी ही विचित्र शहरी माणसे यायला लागली तिथे नाईट ट्रेल, करत सोबत बॅटरी घेऊन फिरू लागली. ज्या मुळे काजव्याना घनदाट जंगलात देखील आता त्यांचा जोडीदार शोधण्यात अडथळे येऊ लागले आहेत.

 

माणसाची मानसिकता दिवसेंदिवस खूप घाणेरडी होत चालली आहे. आधी तो निसर्ग ओरबाडून काढतो, त्यातील जीवनाचा एकूण एक थेंब शोषून त्याचा कागदी पैसा बनवतो आणि नंतर हाच माणूस त्या पैशाने निसर्गात भ्रमंती करायला येतो. निसर्गाला बटिक समजतो पाहिजे तसे उपभोगाची आणि पैसे फेकून मोकळं व्हायचं. ह्याच वृत्ती मुळे आज सर्वत्र पृथ्वी वरील जीवन क्षणोक्षणी नष्ट होत आहे. अवघ्या तीस वर्षात काजव्या पाठोपाठ असे कितीतरी बहुउपयोगी कीटक आपण संपवले आहेत ज्याचा खूप भयानक परिणाम येत्या काळात आपल्याला भोगावा लागणार आहे. निसर्गाच्या काठीला आवज नसतो.

कधी तो करोना बनून तर कधी अंफान, निसर्ग सारख्या चक्रीवादळाच्या रूपाने आपल्याला आपली जागा दाखवून देतो. येत्या फक्त पाच वर्षात जागतिक तापमान वाढीमुळे आणखी भयानक संकटे ओढवणार आहेत, ज्यात संपूर्ण मानवा सहित जीवसृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. आता तरी निसर्गाची हाक ऐका पुन्हा नैसर्गिक शेती आणि माती कुडाच्या घरात जा तसे करणे मागास मुळीच नाही तेच खरे शास्वत जीवन आहे.

 

लेखक -
प्रा. भूषण वि. भोईर
सह. प्रा. प्राणीशास्त्र विभाग
सोनोपंत दांडेकर महाविद्यालय,
पालघर.
८२३७१५०५२३
प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: Environmental component is useful for agriculture, see the contribution of fireflies in agriculture Published on: 18 June 2021, 04:30 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters