1. कृषीपीडिया

सोयाबीनचे अधिक उत्पन्न हवं का ? मग तण व्यवस्थापन करा चांगलं

यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यात बोगस बियाणांचे प्रकरणे समोर आली आहेत. सोयाबीनचे बियाणेही बोगस निघाल्याने सोयाबीन उत्पादकांना आर्थिक फटका बसला आहे. तर काही शेतकऱ्यांच्या शेतात सोयबीनची पेरणी व्यवस्थित उतरली आहे, पण सोयाबीनचे चांगले उत्पादन घेण्यासाठी पि‍काव्यतिरिक्त उगवणार्‍या तणांचे शास्त्रोक्त पद्धतीने नियंत्रण करणे आवश्यक असते.

KJ Staff
KJ Staff

 

यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यात बोगस बियाणांचे प्रकरणे समोर आली आहेत. सोयाबीनचे बियाणेही  बोगस निघाल्याने सोयाबीन उत्पादकांना आर्थिक फटका बसला आहे. तर काही शेतकऱ्यांच्या शेतात सोयबीनची पेरणी व्यवस्थित उतरली आहे, पण सोयाबीनचे चांगले उत्पादन घेण्यासाठी पि‍काव्यतिरिक्त उगवणार्‍या तणांचे शास्त्रोक्त पद्धतीने नियंत्रण करणे आवश्यक असते.  या लेखातून आपण आज या भागामध्ये आपण सोयाबीन पि‍कांमधील तण व्यवस्थापनाची माहिती घेणार आहोत. 

सोयाबीनमधील मुख्य तण 

सोयाबीन पिकांमध्ये- हरळी, लव्हाळा, चिकटा, चिमणचारा, केणा आणि पिवळी तिळवण इ. एकदल वर्गीय तर गाजर गवत, हजारदाणी, एकदांडी, रेशीमकाटा, तांदुळजा, पाथरी, दुधी इ. द्विदल वर्गीय तणे आढळतात. शेतामध्ये पीक उभे असताना सोयाबीनच्या झाडांसोबतच आवश्यक नसणारे इतर पिके (मागील हंगामातील) व तणांची मोठ्या प्रमाणावर उगवण होते व झपाट्याने वाढ होते. सोयाबीनची उगवण झाल्यापासून पिकाची कापणी होईपर्यंत तण पिकाला अपायकारक असते. पिकांमध्ये वाढणारे तण सोयाबीनशी पोषण अन्नद्रव्ये, पाणी, वाढीसाठी आवश्यक जागा, सूर्य प्रकाश इत्यादींसाठी स्पर्धा करते,  त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. तणांमुळे सोयाबीन पिकामध्ये किडी व रोगांचे प्रमाण वाढते.

मशागतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होतो. यामुळे तण नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या  उपाययोजनांवर मोठा उत्पादन खर्च वाढतो. काढणीच्या वेळी वाढलेल्या तणांमुळे अडथळा निर्माण होतो.  त्यांचे बी पिकाच्या बियांसोबत मिसळले जाते,  त्यामुळे सोयाबीनच्या बियाण्यांची गुणवत्ता कमी होते. सोयाबीन पिकांमध्ये येणार्‍या तणांचे योग्यवेळी नियंत्रण न केल्यास उत्पादनात सरासरी ३० ते ४० टक्केपर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे सोयाबीनची पेरणी करून यशस्वी उगवण झाल्यानंतर सुरुवातीच्या २०-४५ दिवसांच्या कालावधीमध्ये तणांचे योग्य नियंत्रण फार महत्वाचे असते.

 

 

तण व्यवस्थापन

सोयाबीनमधील तण नियंत्रणासाठी खालील उपाय योजनांचा अवलंब केल्यास फायदेशीर ठरते:

१) मनुष्य बळ वापरून खुरपणी किंवा कोळपणी करणे -

सोयाबीन पीक रोप आवस्थेमध्ये असताना त्याची वाढ सावकाश होत असते.  त्यावेळी तणांचा प्रादुर्भाव झाल्यास रोपांची वाढ खुंटते व पीक अपेक्षेप्रमाणे निरोगी व सुदृढ येत नाही. पीक फुलोर्‍यापर्यंत तणविरहित ठेवणे उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. त्यासाठी पहिली खुरपणी पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी आणि दुसरी खुरपणी पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी करावी किंवा पिकातील तण उपटून त्याचे पिकांमध्येच आच्छादन करावे. किंवा खुरपणीसाठी मजूरांची कमतरता असल्यास तणांचा प्रादुर्भाव पाहून ४० ते ४५ दिवसांपर्यंत कुळवाच्या दोन पाळ्या बैल किंवा सायकल कोळप्याच्या सहाय्याने घालाव्यात.

२) रासायनिक तणनाशकचा वापर

पडणार्‍या पावसामुळे किंवा मजुरांअभावी खुरपणी किंवा कोळपणी करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत तण नाशके वापरुन वेळीच तणांचा बंदोबस्त करता येतो. पेरणीपूर्वी, तण उगवण्यापूर्वी व उगवल्यानंतर वापरायची तणनाशके वेगवेगळी असतात. त्यामुळे तणनाशक वापराचे नियोजन पेरणी पूर्वी करणे गरजेचे असते. खाली दिल्याप्रमाणे सोयाबीनमधील तण नियंत्रणासाठी एका तण नाशकाचा वापर करावा.

अ) पेरणीपूर्वी तण नाशकचा वापर:

फ्लुक्लोरॅलिन ४५ ईसी बासालीन २.०० ली. दिलेली मात्रा ७०० ते ८०० ली./हे पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर फवारावी व कुळवाची एक पाळी देऊन जमिनीत चांगली मिसळावी व नंतर पेरणी करावी.

आ) बी उगवण्यापूर्वी तणनाशकचा वापर:

अ.नं. तणनाशकाचे सामान्य नाव व्यापारी नाव मात्रा व्यापारी घटक (प्रती हे.) फवारणी

१. पेंडिमेथिलीन ३० ईसी स्टॉम्प ३.३ ली. यांपैकी एका तणनाशकाची दिलेली मात्रा ७०० ते ८०० ली./हे पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर ताबडतोब परंतू ४८ तासांच्या आत जमिनीवर फवारावी.

२. डिक्लोसुलाम ८४% ड्ब्लुडीजी स्ट्रॉंगार्म ३२ ग्रॅम

इ) बी उगवल्यानंतर तणनाशकचा वापर

१. इमॅझेथ्यापिर १० टक्के एसएल, परस्यूट १ ली. यांपैकी एका तणनाशकाची दिलेली मात्रा ५०० ते ७०० ली./हे पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी तणांना २-४ पाने असताना तणांवर फवारावी.

२. क्विझ्यालोफॉप इथिल ५ टक्के इसी टर्गा सुपर १ ली.

३) एकात्मिक तण व्यवस्थापन: सोयाबीन पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन करण्यासाठी बी उगवण्यापूर्वी वापरवायचे कोणतेही एक तणनाशक फवारावे आणि ३० ते ३५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी.  शिफारस केल्याप्रमाणे दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडांमधील अंतर ५-७ सें.मी राहील अशी पेरणी केल्यास हेक्टरी ४ ते ४.५ लाख एवढी झाडांची संख्या राखली जाते. त्यामुळे जर पीक उगवण्यापूर्वी किंवा पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीस तण नाशक वापरले तर तण उगवून येत नाही. ३०-३५ दिवसांनी एक कोळपणी केल्यानंतर पिकातील सर्व रिकामी जागा सोयाबीनच्या झाडांनी व्यापली जाते. त्यामुळे नंतर पीकाच्या कालावधीत तणांचा उपद्रव आपोआप कमी होतो. अशाप्रकारे सोयाबीन पिकातील तण नियंत्रण केल्यास उत्पादन वाढण्यास मदत होते.

 

लेखक -  

ऋषभ जाधव

MSc( Agri)

9763410918

गोपाल सहाणे

MSc( Agri)

असलम शेख MSc( Agri)

English Summary: do you want more production in soyaben farm, then Weed management is important Published on: 05 July 2020, 06:06 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters