1. कृषीपीडिया

अशी करा हळद लागवड व कीड व्यवस्थापन

हळद लागवड

हळद लागवड

भारतीय मसाल्यांमध्ये हळद एक महत्वपूर्ण मसाला पीक म्हणून ओळखले जाते. हळदीची लागवड १५ मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात केल्यास उत्पादन चांगले मिळते. चांगले उत्पादन मिळण्यासाठी लागवडीपूर्वी शास्त्रीय दृष्टिकोनातून जमिनीची पूर्वमशागत करणे आवश्यक आहे.

जमिनीची मशागत:

 • जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.
 • सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ टक्केपेक्षा जास्त असावे.
 • जमिनीची खोली २५ ते ३० सें.मी. असावी.
 • कंद चांगले पोसण्यासाठी जमिनीमध्ये हवा खेळती राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
 • त्यासाठी जमिनीची उभी – आडवी एक फूट खोल नांगरणी करावी.
 • दोन नांगरणीमधील अंतर कमीत कमी १५ दिवसांचे ठेवावे.
 • त्यासाठी जमिनीची उभी-आडवी एक फूट खोल नांगरणी करावी.
 • जमिनीचा पोत चांगला राखण्याच्या दृष्टीने द्विदल किंवा हिरवळीची पिके ( ताग, धैंचा) गाडून जमिनीची पूर्वमशागत करावी.
 • भारी, काळ्या चिकण आणि क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक चांगले येत नाही, त्यामुळे अशा जमिनी शक्यतो हळद लागवडीसाठी टाळाव्यात.
 • जमिनीमधील लव्हाळा, हराळी यांसारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत.तसेच अगोदरच्या पिकाच्या काश्या वेचून घ्याव्यात.

बेण्याची निवड

 • बेण्याची सुप्तावस्था संपलेली असावी.
 • बेण्यावरील एक ते दोन डोळे चांगले फुगलेले असावेत.
 • मातृकंद बेणे ५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे ४० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, तर हळकुंडे ३० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाची असावीत.
 • बेणे रोगमुक्त व कीडमुक्त असावे.
 • बेण्याची उगवण एकसारखी होण्यासाठी लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर बेण्यावरती पाणी मारावे.
 • बेण्यास कंदकुजीचा प्रादुर्भाव झाला असल्यास बेणे मऊ पडते. असे मऊ बेणे कापले असता आतमधील भाग कापसासारखा दिसतो. असे बेणे उगवत नाही बीजप्रक्रियेच्या द्रावणात तरंगते.
 • मातृकंद बेणे त्रिकोणाकृती असावे.
 • बेण्यामध्ये इतर जातींची भेसळ नसावी.
 • बेण्यावरील मुळ्या, गतवर्षीच्या पानाचे अवशेष साफ करून बियाणे स्वच्छ करावे.

बियाण्याचे प्रकार :

हळदीमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारचे बियाणे लागवडीसाठी वापरतात.

मातृकंद किंवा जेठा गड्डे बियाणे :

या प्रकारचे बियाणे हे मुख्य रोपाच्या खाली जे कंद तयार होतात त्यास म्हणतात. याचे वजन ५० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एकरी ११ ते १२ क्विंटल बियाणे लागते.

बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे :

मुख्य रोपाच्याबाजूला जे फुटवे येतात, त्याच्या खाली जे कंद तयार होतात. त्यास बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे असे म्हणतात. या कंदाचे वजन ४० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एकरी १० क्विंटल बियाणे लागते.

हळकुंड :

ओली हळकुंडेही बियाणे म्हणून वापरू शकतो; परंतु त्यांचे वजन ३० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एकरी ९ ते १० क्विंटल बियाणे लागते. सुरवातीला बियाणे तयार करण्याच्या दृष्टीने या प्रकारचे बियाणे उत्तम आहे, परंतु मातृकंदापासून मिळणारे उत्पन्न हे हळकुंडापासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा १५ ते २० टक्के जास्त असते.

हवामान व लागवड :

बदलत्या हवामानाचा हळद पिकाच्या वाढीवर फारसा प्रतिकूल परिणाम होत नाही. हळद हे नऊ महिन्यांचे पीक असून, याची लागवड विभागानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार मे महिन्याच्या सुरवातीपासून जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करता येते. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे अक्षय तृतीयेला हळदीची लागवड करतात. हळदीचे कंद जमिनीमध्ये साधारणतः एक फूट खोलीवर वाढतात. त्यामुळे एक फूट खोलीवरील मातीपरीक्षण केल्यास फायदेशीर ठरते.

खत व्यवस्थापन :

कुळवाच्या गरजेप्रमाणे एक ते दोन पाळ्या देऊन शेवटच्या पाळी अगोदर एकरी १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे. सद्यःस्थितीमध्ये शेणखताची मात्रा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे शेणखताबरोबर इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा. सेंद्रिय खतामध्ये प्रामुख्याने गांडूळखत, कंपोस्ट खत, मासोळीचे खत, हाडांचा चुरा, प्रेस मड कंपोस्ट, वेगवेगळ्या पेंडींचे मिश्रण याचा वापर करावा. हळदीसाठी शक्यतो ओल्या मळीचा वापर टाळावा.  जमीन तयार करतेवेळी एकरी २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८० किलो म्युरेट ऑफ पोटॅश या खतांचा वापर करावा.

सुधारित जाती

१) फुले स्वरूप :

ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केली असून सदर जात ही मध्यम उंच वाढणारी अशी आहे. सरळ वाढीची सवय असून पानांचा रंग हिरवा असून क्रियाशील पानांची संख्या ६ ते ७ असते. या जातीचा पक्क्तेचा काळ हा ८.५ महिन्याचा असून फुटव्यांची संख्या २ ते ३ प्रति झाड असते. या जातीचे जेठे गड्डे मध्यम आकाराचे असून वजनाचे ५० ते ५५ ग्रॅम असतात. हळकुंडे ३५ ते ४० ग्रॅम वजनाची असून प्रत्येक कंदात ७ ते ८ हळकुंडे असतात. त्यांनंतर त्यावर उपहळकुंडाची वाढ होत असते. मुख्य हळकुंडाची लांबी ७ ते ८ सें.मी. असते. बियाणे व उत्पादनाचे प्रमाण १:५ असे आहे. हळकुंडे सरळ लांब वाढतात.

हळकुंडाच्या गाभ्याचा रंग गर्द पिवळसर असा आहे. या जातीमध्ये पिवळेपणाचे प्रमाण सध्या प्रसारीत असलेल्या जातीपेक्षा जास्त म्हणजे ५.१९% इतके असून उतार २२% इतका मिळतो. या जातीने सरासरी ओल्या हळदीचे उत्पादन ३५८.३० क्विं./हे. दिल्याचे दिसून आले असून वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७८.८२ क्विं./हे. हिल्याची नोंद आहे. या जातींमध्ये पानावरील करपा रोगास तसेच कंदमाशी या किडीस प्रतिकारक गुण असल्याचे दिसून आले आहे.

२) सेलम :

या जातींची पाने रुंद हिरवी असतात. पिकाच्या एकूण वाढीच्या कालावधीमध्ये १२ ते १५ पाने येतात. झाडास सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये १२ ते १५ पाने येतात. हळकुंडे व उपहळकुंडे जाड व ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गाभ्याचा रंग केशरी पिवळसर असतो. हळकुंडावरील पेर्‍यांची संख्या ८ ते ९ असते. कच्च्या हळदीचे उत्पादन ३५० ते ४०० क्विंटल प्रती हेक्टरी मिळते. या जातीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण ४.५ टक्के असते. वाळलेल्या हळदीचे ७० ते ७५ क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. ही जात पक्क होण्यास ८.५ ते ९ महिने लागतात. चांगल्या कसदार पोताच्या जमिनीत या जातीच्या झाडांची उंची जवळजवळ ५ फुटांपर्यंत वाढते आणि ३ ते ४ फुटवे येतात. सध्या महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यामध्ये लागवड करण्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर यांनी या जातीची शिफारस केली आहे.

३) कृष्णा (कडाप्पा ) :

या जातीची हळकुंडे लांब, जाड व प्रमाणबद्ध असतात. हळकुंडाचा गाभा पांढरट पिवळा असतो. दोन पर्‍यामधील अंतर इतर जातीच्या तुलनेने जास्त असते. पेर्‍यांची संख्या ८ ते ९ असून झासांची पाने रुंद आणि सपाट असतात. एकून पिकाच्या कालावधीमध्ये १० ते १२ पाने येतात. पानावरील ठिपके (लिफ ब्लॉच) या रोगास ही जात अल्प प्रमाणत बळी पडते. वाळलेली हळकुंडे थोडीशी सुकलेली दिसतात. वाळल्यानंतर मुख्य हळकुंडाची लांबी जवळ जवळ ६ ते ७ सें.मी. असते.

या जातीच्या वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७५ ते ८० क्विंटल प्रती हेक्टरी येते. ही जात हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज येथून सन १९८४ साली कडाप्पा जातीमधून निवड पद्धतीने काढण्यात येऊन शेतकर्‍यांना लागवडीसाठी प्रसारित केली आहे.

 

४) राजापुरी :

या जातीची पाने रुंद, फिकट हिरवी व सपाट असतात. पिकाच्या वाढीच्या एकूण कालावधीमध्ये १० ते १८ पाने येतात. झाडास फुले क्वचित येतात. हळकुंडे व उपहळकुंडे आखूड व जाड ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गड्ड्यांचा रंग पिवळा ते गर्द पिवळा असतो. शिजवल्यानंतर वाळलेल्या हळदीचा उतारा १८ ते २० टक्के पडतो व प्रती हेक्टरी कच्च्या हळदीचे उत्पादन ५५ ते ५८ क्विंटल मिळते. ही जात करपा रोगास बळी पडते. पक्क होण्यास ८ ते ९ महिने लागतात.

या जातीला स्थानिक बाजारपेठेत तसेच गुजरात व राजस्थान राज्यांतून चांगली मागणी असल्याने भावही चांगला मिळतो. बर्‍याच वेळा हळदीच्या वायदे बाजारातील भाव या जातीवरून ठरला जातो. महणून ही जात कमी उत्पादन देणारी असली, तरी लागवडीसाठी प्राधान्याने शेतकरी या जातीला पसंती देतात.

५) खाण्याची हळद (Curcuma Longa ) :

ही बहुवर्षीय जात असून ६० ते ९० सें.मी. उंच वाढते. पानांना खमंग वास असून फळे तीनधारी असतात. बोंड, कंद आखूड व जाड असतो.

पातळ पाने ६० ते ९० सें.मी. लांब असून कंदापासून ६ ते १० पोपटी हिरव्या रंगाची पाने वाढतात.

फुले पिवळसर पांढरी असतात, मात्र लागवडीच्या पिकात फळे धरत नाहीत, कारण ती नपुंसक असतात. या जातीची ९६% लागवड भारतात होते.

६) कस्तुरी किंवा रानहळद ( Cucuma Caesia) :

ही जात वार्षिक असून महाबळेश्वर, कोकण विभाग आणि आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणात लागवड करतात.

कंद मोठे गोलाकार, फिकट पिवळे (आत नारिंगी लाल) असून कापराचा वास असतो. प्रक्रियेनंतरच्या (हळकुंडास) गोड वास असतो. ६.१% हिरवट तपकिरी तेल, कापराचा वास असल्याने औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

पाने लांब - वर्तुळाकर व आल्यासारखी टोकदार, मध्यशीरा उठावदार असतात, फुले सुवासिक, औषधासाठी उपयोग.

७) इस्ट इंडियन अॅरोरूट (East Indian Aroroot) :

मध्यभारत, बंगाल, महाराष्ट्रा, तामिळनाडुच्या डोंगराळ भागात व हिमालयात या जातीची लागवड आढळते. कंदातील स्टार्च १२.५ % असून त्याचा उपयोग खर्‍या अॅरोरूटला पर्याय म्हणून तसेच मुलांना व आजारी माणसांना मिल्क पुडिंग करून देतात.

८) आंबेहळद (Curcuma Amada) :

कोवळ्या कंदाला कच्च्या आंब्याचा वास असल्याने त्याला आंबे हळद म्हणतात. कोकण, बंगाल, तामिळनाडू व पश्चिम घाटातील भागात प्रामुख्याने लागवड केली जाते. कंद बारीक व आतील गार पांढरा असून कंदाचे लोणचे करतात.

बहुवर्षायु जात असून पाने लांब वर्तुळाकार, आल्यासारखी व पानांचा जुडगा खालपासून वाढतो. मधली शीर उठावदार असते. फुले हिरवट - पांढरी असून बोंड तीनधारी असते.

औषधी उपयोग : कातडी मऊ होण्यासाठी अंगाला चोळतात. मुरगळल्यावर व सुजेवर उगाळून लावतात. चामडीची खाज घालविते. थंड, पाचक व रक्तशुद्धीकरता, जंतुनाशक म्हणून उपयुक्त आहे.

९) काळी हळद (Curcuma Caesia) :

बंगालमध्ये आढळते. ताजे कंद फिकट पिवळे, सुवासिक, सौंदर्यप्रसाधनात वापरतात. कंदामध्ये ९.७६% सुवासिक तेल असते.

१०) कचोर (Curcuma Zedoria) :

वार्षिक जात असून कोकणात सर्वत या जातींची लागवड आढळते. औषधाकरिता ताजे मूळ व गड्डे रक्त शुद्धीकरणासाठी वापरतात. पानांचा रस महारोगांवर उपयुक्त ठरतो.

पूर्व मशागत :

हळद लागवडीमध्ये पूर्वमशागतीच्या कामामाध्ये नांगरट करणे, ढेकळे फोडणे, शेताच्या कडा कुदळीने किंवा टिकावाणे खणून ही सर्व कामे पूर्वनियोजन करून त्याप्रमाणे करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीची ट्रॅक्टर ने १८ ते २२ सें.मी. पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी. पहिल्या नंगारटीनंतर शेतात नंगारटीमधून चुकलेल्या कडा १ फुटांपर्यंत टिकावाने खणून घ्याव्यात. त्याचवेळी जमिनीमधील कुंदा, लव्हाळ्याच्या गाठी यासारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत.

पहिल्या नंगारटीनंतर शेतात मोठी ढेकळे दिसत असल्यास तव्याचा कुळव मारून घ्यावा. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी परत संपूर्ण ढेकळे फोडून घ्यावीत आणि ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे त्यामध्ये Trichoderma आणि metarhizium ही  जैविक बुरशीनाशक एकरी 3 किलो शेणखतात मिसळणे...

हळद लागवडीच्या पद्धती

१) सरी वरंबा पध्दत :

हळदीचे कंद जमिनीत वाढत असल्याने या पिकाची लागवड सरी वरंबा किंवा रुंद वरंबा पद्धतीने लागावाद करावयाची झाल्यास ७५ ते ९० सें.मी. अंतरावर सर्‍या पाडून घ्याव्यात. शक्य असेल तर सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेले स्फुरद आणि पालाश जमिनीत टाकून द्यावे. जमीनच्या उताराप्रमाणे ६ ते ७ सरी वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुर्‍याची लांबी जमिनीच्या उतारानुसार पाणी बसेल अशी ठेवावी. सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाण्याचे पाट सोडावेत.

२) रुंद वरंबा पध्दत :

रुंद वरंबा पद्धतीने रान बांधणी करून काही ठिकाणी अधिक उत्पादन घेतले जाते. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसून उत्पादनात २० ते २५ % वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या पद्धतीने जमिनीस पाणी देण्यास जास्त त्रास होतो म्हणून अशा पद्धतीने लागण करावयाची असल्यास जमीन समपातळीत असणे आवश्यक आहे किंवा पाणी देण्याच्या सुधारित तंत्रज्ञानामधील ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. रुंद वरंबा तयार करताना १५० सें.मी. अंतरावर प्रथम सर्‍या पाडाव्यात. त्या सर्‍या उजरून ८० ते ९० सें.मी. माथा असलेले १५ सें.मी. उंचीचे व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी व्यवस्थित बसेल अशा लांबी रूंदीचे सरी वरंबे पाडावेत. वरंब्याचा माथा सपाट करून घ्यावा आणि मग लागवड करून घ्यावी.

लागवडीचा हंगाम आणि लागवड :

हळदीची लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. ठिकठिकाणच्या स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार लागवडीचा कालावधी मागेपुढे होतो. लागवडीसाठी वापरले जाणार्‍या बियाणांची सुप्तावस्थ संपलेली असावी. बियाणाचे डोळे नकळत फुगलेले असावेत. कुजलेले, अर्धवट सडलेले बियाणे लागवडीसाठी वापरू नये. लागवडीसाठी हळकुंड बियाणे वापरले तरी चालतात. मात्र हळकुंड बियाणे ३० ग्रॅमपेक्षा वजनाने मोठे असावेत. सरी वरंबा पद्धतीने लागवड करावयाची झाल्यास वरंब्याच्या दोन्ही बाजूस ३० सें.मी. अंतरावरती गड्डे कुदळीने अगर्‍या घेऊन लावावेत किंवा वाकुरी पाण्याने भरल्यानंतर गड्डे पाण्यामध्ये वरंब्यात ३ ते ५ सें.मी. खोल दाबून घ्यावेत. रुंद वरंबा पद्धतीने ३० x ३० सें.मी. अंतरावरती गड्डे लावून घ्यावेत. लागवडीच्या वेळी गड्डे पुर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी.

बेणे :

एकरी 8 ते 10 क्विंटल बेणे लागते. लागवड मातृकंदापासून करतात. या कंदापासून तयार केलेल्या ३० दिवसाच्या वयाच्या रोपापासूनही लागवड करतात. कन्याकंदही लागवडीसाठी वापरतात.

बीजप्रक्रिया :  १०० लि. पाण्यामध्ये 200 ग्राम कार्बेन्डाझिम आणि 200 मिली क्विनोलफोस घेऊन त्यामध्ये १०० किलो बेणे १० मिनिटे भिजवून नंतर ते सुकवून लावावे. हे द्रावण २ ते ३ वेळा वापरता येते. त्यामुळे कंद (बेणे) लवकर, एकसारखे उगवून मर होत नाही.

 

आंतरमशागत (भरणी करणे) :

हळदीच्या लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी भरणी करणे अत्यंत आवश्यक आहे. सरीमधील माती किंवा लागण केलेल्या दोन्ही गड्ड्यांच्यामधील मोकळ्या जागेमधील माती १.५ ते २ इंच शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूंच्या गड्ड्यांना लावणे म्हणजे 'भरणी करणे' होय. माती लावताना संपूर्ण कंद झाकला जाईल अशा पद्धतीने माती लावावी. भरणी केल्यानंतर पिकास हलकेसे पाणी द्यावे. भरणी केल्यामुळे नवीन येणारे हळकुंड झाकले जातात व त्यांची चांगली वाढ होते. मात्र याउलट भरणी न केल्यास जमिनीच्या बाहेर आलेल्या हळकुंडाची वाढ होत नाही. थोडीफार झाली तरी ती निकृष्ट दर्जाची होते आणि उत्पादनामध्ये जवळजवळ १० ते १५ टक्क्यांनी घट येते.

पाणी व्यवस्थापन :

हळदीची लागवड एप्रिल -मे महिन्यामध्ये होत असल्याने सुरुवातीच्या काळात पावसाची सुरुवात होईपर्यंत पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. कारण दरम्यानच्या काळात मुळांकडून स्थिरता प्राप्त होणे हा महत्त्वाचा कालावधी असतो, म्हणून लागवडीनंतर आंबवणीचे पाणी लगेच ४ ते ६ दिवसांच्या अंतराने द्यावे. जमिनीच्या प्रतिनुसार हा कालावधी कमी -जास्त ठेवावा. पावसाला सुरू झाल्यानंतर पावसाचेह पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यानंतर हिवाळयामध्ये पाण्याच्या २ पाळीमधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. मात्र पीक काढणीच्या १५ दिवस अगोदर अजिबात पाणी देऊ नये.

खते :

हळद पिकासाठी खतामधील सर्व घटकांची कमी- अधिक प्रमाणात गरज असते. मात्र हळद पिकासाठी रासायानिक खते वापरलेल्या हळदीच्या कंदावरती अनिष्ट परिणाम होतो. असा अनुभव शेतकर्‍यांचा आहे. तेव्हा हळदीला शक्य तेवढ्या प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करावा. यामध्ये पुर्ण कुजलेले शेणखत एकरी १० टन (२० बैलगाड्या) आणि कल्पतरू सेंद्रिय खत ७५ ते १०० एकरी किलो दिन हप्त्यातून (लागवडीवेळी अर्धी मात्र आणि भरणीच्यावेळी अर्धी मात्रा याप्रमाणे) द्यावे. त्याचवेळी हेक्टरी २०० ते ३०० किलो करंजी किंवा निंबोळी पेंड द्यावी आणि भरणी करून द्यावी. या पिकास भरणीनंतर कोणतीही खते देऊ नयेत.

आंतरपिकांची लागवड :

मुख्य पिकाशी स्पर्धा न करता हळद पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ करणार्‍या आंतरपिकांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही पिके हळद पिकापेक्षा उंचीने कमी तसे च पसार्‍याने कमी जागा व्यापणारी असावीत. हळद पिकाची लागवड केल्यापासून ३ ते ३.५ महिन्यांनी फुटवे येउन कंद पोसण्यास सुरुवात होते. त्यासाठी हळकुंड येण्याच्या कालावधीपूर्वी आंतरपिकाची काढणी होणे फायदेशीर ठरते, महणून हळद पिकामध्ये श्रावणघेवडा, मिरची, कोथिंबीर या पिकांची लागवड करावी. मका हे पीक हळदीमध्ये घेऊ नये. कारण मक्यामुळे हळदीच्या उत्पादनामध्ये १५ ते २० % घट येते.

कीड नियंत्रण

१) कंदमाशी :

 

या पिकास कंदमाशीसारख्या किडीचा मोठा उपद्रव होतो. या किडीची माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते.

माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून त्यावर राखी रंगाचे ठिपके असतात. अंडी पांढरट रंगाची असतात.अळी पिवळसर असून त्यांना पाय नसतात. या किडीच्या अळ्या उघड्या गड्ड्यामध्ये शिरून त्याच्यावर उपजीविका करतात. याच्या नियंत्रणासाठी कंदमाशा शेतामध्ये दिसू लागताच माशा मारण्यासाठी  क्विनॉलफॉस २५% प्रवाही २० मी.ली. १० लिटर पाण्यामध्ये मिसळून जुलै ते ऑगस्ट दरम्यान १ ते २ फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. याच किटकनाशकाचे पुढील २ हप्ते १ महिन्याच्या अंतराने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये द्यावेत.अर्धवट कुजले, सडके बियाणे लागवडीस वापरू नये. जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतात उघडे पडलेले गड्डे मातीने झाकून घ्यावेत.

२) पानातील रस शोषून घेणारा ढेकूण :

या किडीची पिल्ले पानाच्या पाठीमागे एकत्रितपणे आढळून येतात. ते पानाच्या पाठीमागे राहून पानातील रस शोषून घेतात. या किडींचा उपद्रव झालेली पाने तांबूस पिवळसर रंगाची दिसून येतात. मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यू. एस. सी. १० मिली १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

३) पाने गुंडाळणारी अळी :

हळद पिकावर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीची अळी हिरवट रंगाची असून ती अंड्यातून बाहेर पडल्यानंतर स्वत:च्या शरीराभोवती पान गुंडाळून घेते व आत राहून पाने खाते.किडीचा प्रादुर्भाव दिसताच गुंडाळलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. तसेच कार्बारील ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी.

४) सुत्रकृमी :

 

काही भागामध्ये या पिकावर सुत्रकृमींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पिकाच्या मुळाभोवती राहून सुईसारख्या अवयवाने मुळातील रस शोषण करतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते व पाने पिवळी पडतात. तसेच यांनी केलेल्या छिद्रातून कंदकुजीस कारणीभूत असलेल्या बुरशींचा सहज शिरकाव होतो. सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा प्लस ५ किलो /हे. शेणखतात मिसळून द्यावा किंवा फोरेट १० जी. हेक्टरी २५ किलो याप्रमाणात द्यावे किंवा १८ ते क्विं/हे. लिंबोळी पेंडीचा वापर करावा.

रोग नियंत्रण

१) कंदकूज (गड्डे कुजव्या) :

हळद तसेच कंद वर्गातील पिकांवरील हा एक प्रमुख रोग आहे. वेळीच खबरदारी न घेतल्यास या रोगामुळे ५०% पर्यंत नुकसान होऊ शकते. भरपूर पाऊस, भारी काळी कसदार, कमी निचरा असणारी जमीन या रोगास पोषक ठरते. हा रोग ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. प्रथम पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून खालीपर्यंत वाळले जातात.

खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाही वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो. या भागावर दाब दिल्यास त्यातून कुजलेले, घाण वास येणारे पाणी बाहेर येते. अशा झाडाचे खोड थोडे जरी ओढले तरी चटकन हातात येते. हा रोग प्रामुख्याने सुत्रकृमी किंवा खुरपणी करताना/आंतरमशागत, करताना कंदास ईजा झाल्यास त्यातून पिथियम, फ्युजेरियम यासारख्या बुरशींचा गड्ड्यामध्ये शिरकाव होऊन कंदकुजण्यास सुरुवात होते.

या रोगाच्या नियंत्रणासाठी लागवड करतान निरोगी बियाण्याचा वापर करावा. जमीन हलकी ते मध्यम परंतु उत्तम निचर्‍याची निवडावी. पावसाळ्यात शेतामध्ये चर घेऊन पाण्याचा निचरा करून घ्यावा. तसेच मेटॅलॅक्सिल ८% + मॅकोझेब ६४% हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बेंडॅझिम (५० डब्ल्यू. पी.) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा मॅकोझेब २.५ गरम प्रति लिटर यापैकी एका बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. शेतामध्ये हा रोग आढळून आल्यास याच बुरशीनाशाकांची आलटून पालटून फवारणी करावी. लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा प्लस पाच किलो प्रति हेक्टरी शेणखतातून मिसळून द्यावा.

२) पानावरील ठिपके (लिफ ब्लॉच) :

या रोगामध्ये पानावरती लंबगोलाकार तपकिरी रंगाचे अंडाकृती ठिपके दिसतात. ते सूर्याकडे धरून पाहिल्यास त्यात अनेक वर्तुळे दिसतात. रोगट भाग पूर्णत: वाळतो व तांबूस राखी रंगाचा दिसतो. असे ठिपके वाढून एकत्रित येतात आणि संपूर्ण पान करपते. या रोगाची तीव्रता सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिसून येते. हा रोग कोलेटोट्रिकम कॅपसिकी या बुरशीमुळे होतो. यांच्य १ टक्का बोर्डोमिश्रण तयार करून फवारणी करावी. हवामानाच्या परिस्थितीनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये १५ ते २० दिवसाच्या अंतराने फवारण्य कराव्यात.

३) पानावरील ठिपके (टिक्का) :

हा बुरशीजन्य रोग असून टॉंफ्रिन मॅक्यूलन्स नावाच्या बुरशीमुळे होतो. साधारणपणे ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये आर्द्रतायुक्त हवामानामध्ये या रोगाची सुरुवात. जमिनीलगतच्या पानावर होऊन तो वरील पानावर पसरतो. या रोगाची तीव्रता वाढत गेल्यास हे ठिपके एकत्र येऊन संपूर्ण पान करपते. त्यासाठी लिफ ब्लॉच या रोगासाठी बुरशीनाशकांची फवारणी घेतल्यास रोग आटोक्यात येऊ शकतो.

काढणी :

हळद लागवडीमध्ये अतिशय महत्त्वाची आणि शेतकरी बंधूना खर्‍या अर्थाने क्लिष्ट वाटणारी बाब म्हणजे काढणी होय. चांगल्या उत्पादन देणार्‍या हळद पिकाची काढणी ८.५ ते ९ महिन्यांनी करावी. पक्क झालेल्या हळद पिकाच्या झाडाला पाला जमिनीच्या मगदूरानुसार पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ६० ते ८० टक्केच वाळला जातो. अशावेळी झाडाचा पाल जमिनीलगत धारदार विळ्याने कापून घ्यावा. त्यानंतर जमीन थोडीशी भेगाळून घ्यावी आणि कुदळीच्या सहाय्याने हळद काढणी करावी. काढणी करताना जेठे गड्डे, हळकुंडे, सोर गड्डा अशी प्रतवारी करावी. काढणीनंतर हळकुंडे तसेच बियाणे त्वरीत सावलीच्या ठिकाणी हलवावे.

हळद शिजवण वाळविणे व पॉलिश करणे

हळद शिजवताना सच्छिद्र वापर करून हळद शिजविणे फायदेशीर ठरते. या पद्धतीमध्ये डिझेलच्या बॅरलपासून बनविलेले १.५ फूट उंचीचे व २ फुट व्यासाचे ४ते ५ सच्छिद्र ड्रम ५ फुट व्यासाच्या मोठ्या कढईमध्ये पाणी ओतून पाण्याची आतील पातळी ड्रमच्या उंचीच्या वर ४ ते ५ से.मी. इतकी ठेवली जाते. नंतर ड्रम जाड गोणपाटाने झाकून घेतले जातात. या पद्धतीने हळद फक्त २५ ते ३० मिनिटात चांगल्या प्रकारे शिजते. त्यावेळी पाण्याचे तापमान ९० डी. ते १०० डी. सेंटीग्रेट असते.

हळद शिजल्यानंतर चुलवानामध्ये इंधन टाकण्याने प्रमाण कमी केले जाते. त्यामुळे आपोआप पाण्याचे तापमान कमी होते. शिजलेल्या हळदीचे ड्रम लांब बांबूच्या सहाय्याने २ कड्यामध्ये असकून २ व्यक्तिंकडून सहजासहजी उचलून वाळविण्यासाठी खळ्यामध्ये अथवा कठीण जागेवर टाकावे. असे रिकामे झालेले ड्रम पुन्हा कच्च्या हळदीने भरून काहीलीतील गरम पाण्यात ठेवतात. पाण्याची पातळी पुन्हा ठेवलेल्या ड्रमवर ४ ते ५ सेंमी राहील इतकी ठेवली जाते. ठेवलेले ड्रम वरीलप्रमाणे गोणपाटात झाकतात व परत इंधन टाकून त्याच पद्धतीने हळद शिजविली जाते.

वरील पद्धीतमध्ये एका ड्रममध्ये सुमारे ५५ ते ६० किलो याप्रमाणे एका वेळी जवळ जवळ २५० ते ३०० किलो हळद शिजविली जाते. प्रत्येक वेळी जुन्या पद्धतीप्रमाणे गरम पाणी काढून टाकणे आणि पुन्हा नवीन पाणी टाकणे ही प्रक्रिया करावी लागत नाही. दुसरे हळद भरलेले ड्रम काहिलीत ठेवलेले असता पाण्याचे तापमान ८३ डी. ते ८४ डी. सेंटीग्रेडपर्यंत खाली येते. त्यामुळे पहिले ड्रम काढल्यानंतर दुसर्‍या घेतलेल्या ड्रममधील हळद शिजविण्यासाठी लागणारे इंधन हे तापमान ८४ ते १०० डी. सेंटीग्रेटपर्यंत वाढविण्यासाठी लागेल इतकेच असते. त्यामुळे इंधनाची बचत होते. तसेच सर्व हळद एकसारखी शिजली जाते. शिजताना पाण्यातील माती हळकुंडावर न बसता काहिलीत जमा होते. त्यामुळे इंधनाची बचत होते. तसेच सर्व हळद एकसारखी शिजली जाते. त्यामुळे मातीविरहीत स्वच्छ धुतलेली हळद मिळते.

अशा हळदीस वाळविल्यानंतर पॉलिश केल्यास आकर्षक रंग प्राप्त होतो आणि उताराही चांगला मिळतो. अशा हळदीची गुणवत्ता चांगली असल्याने बाजारभावही चांगला मिळतो. अशा या वेळ, इंधन व मजुरी यांची बचत करणार्‍या व किफायतशीर नफा मिळवून देणार्‍या सुधारीत तंत्राचा पारंपारिक पद्धतीत थोडाफार खर्च करून अवलंब नक्कीच फायदा होईल.

 

हळद वाळविणे :

हळद शिजविल्यानंतर सुरुवातीचे ४ ते ५ दिवस ३ ते ४ इंचापेक्षा मोठा थर देऊ नये. मोठा थर दिल्यास हळकुंड वाळण्यास उशीर लागतो. त्याचप्रमाणे हळकुंड काळी पडतात. हळकुंडे साधारणपणे ८ ते १० दिवस उन्हात चांगली वाळवावी, वाळलेली हळद पाण्याने भिजाणार नाही याची दक्षता घ्यावी. हळद शक्यतो तोडपत्रीवरती किंवा कठीण जागेवरती वाळवावी, त्यामुळे मजुरीवरती होणारा खर्च कमी होईल.

पॉलिश व प्रतवारी करणे :

वाळलेली हळद विक्रीसाठी मार्केटला पाठविण्यापूर्वी पॉलिश करणे अत्यंत आवश्यक असते. हळद पॉलिश करणे म्हणजे वाळलेल्या हळकुंडावरची खरबरीत साल काढून टाकणे होय. पॉलिश करण्यासाठी ऑईलच्या बॅरलला १.२ ते २ इंच अंतरावरती छन्नीने भोक पाडून हा बॅरल लोखंडी कन्यावरती फिट करून हा पॉलिश ड्रम स्टँडवर बसवून फिरविल्यास हळकुंडाची वरची साल निघून जाते व हळद पॉलिश होते. हेच काम १ एच. पी. सिंगल फेज मोटारवरती चालणार्‍या लाकडी अष्टकोणी ड्रमवरतीच करता येते.

हळद पॉलिश केल्यानंतर प्रतवारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी मोठे हळकुंड, मध्यम, लहान कणी, त्याचप्रमाणे गड्डे, सोरा गड्डा अशी वेगवेगळ्या प्रकारामध्ये प्रतवारी करून तयार माल विक्रीसाठी मार्केटला पाठवावा. पतवारी न करता विक्रीस पाठविल्यास मालास योग्य भाव मिळत नाही, परिणामी आर्थिक नुकसान होते.

उत्पादन :

हळदीचे उत्पादन हे वापरलेली जात, निरोगी बियाणे, दिलेली खते, जमिनीचा प्रकार यावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे ओल्या हळदीचे प्रति हेक्टरी २५० ते ३५० क्विंटल (+ २५ ते ३० क्विंटल गड्डे ) इतके उत्पादन मिळते. तसेच या ओल्या हळदीपासून ५८ ते ७५ क्विंटल वाळलेली हळद मिळते.

लेखक - 

डॉ.देवीकांत देशमुख डोंगरगावकर

     वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख

     कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी,नांदेड...

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters