उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होते, क्षार जमिनीवर साठत जाऊन जमिनी क्षारयुक्त बनतात. हा जमिनी सुधारण्यासाठी सामूहिक उपाययोजनांची गरज आहे.
सिंचन क्षेत्रातील भारी काळ्या आणि नदीकाठच्या पोयटायुक्त जमिनीचा सामू, विद्राव्य क्षार आणि विनिमय सोडिअमचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या जमिनी क्षार व चोपण झाल्या आहेत.
नदीकाठच्या आणि कालवा सिंचन क्षेत्रातील क्षार व चोपणयुक्त जमिनीच्या भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मावर अतिशय विपरीत परिणाम झाला आहे. हे गुणधर्म सुधरविण्यासाठी निचऱ्याच्या माध्यमातून अतिरिक्त पाण्याबरोबर असलेल्या विद्राव्य क्षारांचा भूमिगत किंवा उघड्या चरांद्वारे बाहेर काढण्याबरोबर एकात्मिक सुधारणा व्यवस्थापनेवर भर द्यावा लागणार आहे, तसेच या जमिनीमुळे सिंचन क्षेत्रातील विहिरी व कूपनलिकेतील पाणीसुद्धा क्षारयुक्त होत आहे. या क्षार व चोपणयुक्त जमिनींची व्याप्ती कमी करण्यासाठी माती परीक्षण करून प्रथमतः जमिनीचे वर्गीकरण करावे.
क्षारपड जमिनीमध्ये अ) क्षारयुक्त, ब) क्षारयुक्त - चोपण आणि क) चोपण जमीन असे तीन प्रकार आहेत. या प्रकारानुसार जमिनीची सुधारणा करणे अवलंबून असते, अन्यथा जमिनी जास्त क्षारपड होत जातात. त्यासाठी अशा विविध क्षारपड जमिनींचे प्रकार, कारणे, गुणधर्म आणि सुधारणा समजावून घेऊनच एकात्मिक सुधारणा व्यवस्थापनेवर भर द्यावा.
जमिनी क्षारपड होण्याची कारणे
उष्ण व कोरड्या हवामानाच्या विभागात पाऊस कमी असल्यामुळे जमिनीतील क्षारांचा निचरा होत नाही. सिंचन क्षेत्रात भारी चिकण मातीच्या अतिखोल काळ्या, निचरा कमी असलेल्या जमिनीस अतिरिक्त पाण्याचा वापर जास्त होतो. नैसर्गिक ओढे, नाले बुजवून जमिनींची ठेवण सखल भागात केल्याने भूमिगत नैसर्गिक निचरा कमी झाला आहे. त्यामुळे क्षार जमिनीतच साठू लागले आहेत. कालवा सिंचन क्षेत्रात कालव्याच्या बाजूने कॉंक्रिट मुलामा न केल्याने पाण्याच्या पाझरामुळे आजूबाजूच्या जमिनी पाणथळ होऊन क्षार व चोपणयुक्त बनल्या आहेत. जास्त पाणी लागणारे उसासारखे पीक वारंवार घेतल्याने व पिकांची फेरपालट न केल्याने जमिनी क्षारपड होत गेल्या आहेत. राज्यातील जमिनी अग्निजन्य बेसाल्ट खडकापासून बनल्या आहेत. त्यामध्ये अल्कधर्मीय खनिजांचे प्रमाण जास्त आहे. खनिजांचे विघटनानंतर मुक्त क्षार जमिनीत साठतात. सिंचनास क्षारयुक्त पाण्याचा अमर्याद वापर झाल्यामुळे क्षारांचे प्रमाण वाढते आहे.
सेंद्रिय व हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनींचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म बिघडले आहेत.
कोरडवाहू क्षेत्रात पावसाळ्यामध्ये उंच भागावरून पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेले क्षार पाणलोट क्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या सखल भागात वर्षानुवर्षे साठतात. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होते, क्षार जमिनीवर साठत जाऊन जमिनी क्षारयुक्त बनतात.
क्षारयुक्त जमिनींचे गुणधर्म
जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी असतो.
जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते.
विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा कमी असते.
उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर क्लोराईड व सल्फेटयुक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअमच्या पांढऱ्या क्षारांचा पातळ थर आढळतो.
जास्त क्षारांमुळे पाणी व अन्नद्रव्ये शोषून घेण्यास पिकांना जास्त ऊर्जा खर्च करावी लागते.
जमिनीतील पाण्याची पातळी उथळ (एक मीटरच्या आत) असते.
पिकांची पाने पिवळी पडून वाढ खुंटते.
क्षारयुक्त जमिनींची सुधारणा
शेताभोवती खोल चर काढावेत, पृष्ठभागावरील क्षारांचा थर खरवडून जमिनीबाहेर काढावेत.
शेतात लहान लहान 20 गुंठ्यांचे वाफे तयार करून चांगले ओलिताचे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करावा.
सेंद्रिय खतांचा हेक्टरी 20 ते 25 टन वापर करावा.
जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचा (उदा. पाचट) आच्छादनासाठी वापर करावा, जमीन पडीक ठेवू नये.
हिरवळीची पिके धैंचा, ताग 45 ते 50 व्या दिवशी तीन वर्षांतून एकदा तरी जमिनीत गाडावा.
भाजीपाला रोपे सरी वरंब्याच्या मध्यभागी लागवड करावी.
सेंद्रिय भूसुधारके मळीकंपोस्ट, स्पेंटवॉश जमिनीत टाकू नये, तसेच रासायनिक भूसुधारकांमध्ये जिप्सम, गंधक यांचा वापर करू नये.
क्षार सहनशील पिकांची निवड करून लागवड करावी
संकलन - संजय गानोरकर
कृषी समर्पण
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments