उन्हाळ्यामध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बाजरी लागवड करण्यात येते. खानदेश भागात तसेच नाशिक जिल्ह्याचा काही भागात बाजरी लागवड प्रामुख्याने केली जाते. उन्हाळ्यामध्ये जर बाजरी लागवड केली तर रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो आणि पाण्याची सोय जर असेल तर बाजरीपासून चांगले उत्पादन मिळवणे शक्य होते.
उन्हाळ्यामध्ये बाजरी लागवड करण्याचे प्रमुख फायदे म्हणजे उन्हाळ्यात हवामान कोरडे असल्याने अरगट,गोसावी या सारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो. त्यामुळे धान्याची आणि चाऱ्याची गुणवत्ता चांगली मिळते. या लेखात आपण उन्हाळी बाजरी लागवडीविषयी माहिती घेऊ.
उन्हाळी बाजरी लागवड व्यवस्थापन
जमिनीची निवड:
- उन्हाळी बाजरीसाठी शक्यतो सपाट मध्यम ते भारी 6.2 ते आठ सामू असणारी जमीन निवडावी.
- लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. कुळवाच्या पाळीच्या अगोदर चांगले कुजलेले शेणखत चार ते पाच टन वापरावे. जमीन भारी असल्यास ओलावा जास्त काळ टिकून राहतो.
बाजरीचे संकरित वाण
उन्हाळी बाजरी फुलोऱ्यात येण्याच्या कालावधीमध्ये वाऱ्याचा वेग व तापमान जास्त असल्याने काही वानांमध्ये परागीकरणाला अडचण येते. कणसात दाणे कमी भरतात. श्रद्धा,सबुरी असे अधिक उत्पादन देणारी तसेच केसाळ प्रकारातील अतिशय घट्ट कणीस असणारे वान निवडल्यास पक्ष्यांचा त्रासही कमी होतो.
उन्हाळी बाजरीची लागवड पद्धत
- संकरित बाजरीचे प्रमाणित बियाणे हेक्टरी चार ते पाच किलो वापरावे. पेरणीपूर्वी प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोस्पिरीलम या जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी. शेत ओलावून वाफसा आल्यावर पेरणी करावी. पेरणी तीन ते चार सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल करता कामा नये. बाजरीची पेरणी जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात ते फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात केल्यास फायदेशीर ठरते.
- पेरणीस उशीर झाल्यासपिक जात किंवा वानाप्रमाणे 50ते55 दिवसांनी फुलोऱ्यात येते. अशा वेळी तापमान 42 अंश सेंटिग्रेड पेक्षा अधिक असल्यास परागकण मरतात व उत्पादनात घट होण्याची शक्यता असते.
बाजरी लागवडीचे अंतर
उन्हाळी बाजरी पेरताना दोन ओळीतील अंतर तीस ते चाळीस सेंटीमीटर व दोन रोपांमधील अंतर 10 ते 15 सेंटिमीटर ठेवावे. नंतर गरजेप्रमाणे विरळणी करावी व एका ठिकाणी एकच रोप ठेवावे.
उन्हाळी बाजरी साठी खत व्यवस्थापन
माती परीक्षणानुसार प्रति हेक्टरी 60 किलो नत्र आणि 30 किलो स्फुरद द्यावे. यातील निम्मे नत्र पेरणीच्या वेळी व संपूर्ण स्फुरद,तर उर्वरित नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे. तसेच पेरणीनंतर बाजरीचे शेत पहिले 30 ते 35 दिवस तणविरहित ठेवावे.
पाणी व्यवस्थापन
जमिनीच्या मगदुराप्रमाणे 10 ते 15 दिवसांनी पाणी द्यावे. पीकवाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत पाणी दिल्यास चांगले उत्पादन मिळते.
- पहिले पाणी वीस ते पंचवीस दिवसानंतर फुटवे येण्याच्या वेळी द्यावे.
- दुसरे पाणी 35 ते 45 दिवसांनी पीक पोटरीत असताना द्यावे.
- तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी कणसात दाणे भरतात क त्यावेळी द्यावे.
उन्हाळी बाजरीचे उत्पादन
उन्हाळी बाजरीची हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात राखल्यासव योग्य वाणाची निवड केल्यास संकरित बाजरीचे उत्पादन हेक्टरी 35 ते 40 क्विंटल पर्यंत मिळते तसेच बाजरीचा हिरवा चारा देखील जनावरांना चांगला मानवतो.
Share your comments