लसूण घास हे द्विदलवर्गीय पीक असून ६० ते ९० सें.मी. उंचीपर्यंत वाढते. या चारा पिकात जीवनसत्त्व अ आणि ड, प्रथिने, खनिजे भरपूर प्रमाणात असतात. योग्य व्यवस्थापन केल्यास वर्षभर भरपूर, सकस हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. लसूणघास हे पीक काळ्या कसदार, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या, मध्यम प्रतीच्या पोयटायुक्त जमिनीत घेता येते.
पिकास थंड हवामान पोषक असते, तसेच उष्ण, कोरड्या हवामानातसुद्धा हे पीक वाढू शकते. आम्लयुक्त जमिनीत उत्पादन कमी येते, कारण अशा जमिनीत बियांची उगवण एकसारखी न होता सुरवातीला नांग्या पडतात. त्यामुळे कालांतराने एकूण झाडांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येते._किमान तीन वर्ष हे पीक जमिनीत ठेवता येते. हे लक्षात घेऊन एक खोल नांगरट करून जमिनीची चांगली मशागत करावी. जास्त पावसाच्या प्रदेशात काळ्या कसदार जमिनीत वरंबे प्रमाणापेक्षा जास्त उंच ठेवू नयेत. कारण वाफ्यामध्ये पाणी साचून राहते. घासाच्या रोपांची मर होऊन पीक विरळ होते. मध्यम ते कमी पावसाच्या प्रदेशात वाफे करताना वरंबे नेहमीपेक्षा थोडे रुंद व उंच ठेवावेत._
चार लिटर पाण्यात ५०० ग्रॅम गूळ मिसळावा. हे द्रावण उकळून थंड करावे. त्यानंतर थंड केलेल्या द्रावणात २५० ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धक मिसळावे. हे द्रावण पुरेशा बारीक चाळलेल्या मातीत चांगले मिसळून घ्यावे. त्यानंतर हेक्टरी ३० किलो बियाण्यासोबत जिवाणू संवर्धक मिसळलेली माती चांगली एकत्रित करावी. थोडा वेळ सावलीत वाळवून नंतर पेरणी करावी._दोन ओळीत ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी. त्यामुळे आंतरमशागत करणे सोपे जाते. परंतु बहुतेक शेतकरी लसूण घासाची पेरणी बी फोकून करतात. त्यामुळे बियाणे जास्त लागते, उगवण एकसारखी होत नाही. पुढे आंतरमशागतीस अडचण होते._
लागवडीसाठी आनंद २, आनंद ३ आनंद ८ या जातींची निवड करावी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील चारा पिके संशोधन प्रकल्पाने आर. एल. ८८ या जातीची शिफारस राज्य व राष्ट्रीय स्तरावर केली आहे. ही जात बहुवर्षीय उत्पादन देणारी आहे._
बहुवर्षीय जातीची लागवड केल्यास प्रति हेक्टरी १० ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. प्रति हेक्टरी २० किलो नत्र (४३ किलो युरिया) ८० किलो स्फुरद (५०० किलो सिंगल सुपरफॉस्फेट) आणि ४० किलो पालाश (६६ किलो म्युरेटऑफ पोटॅश) द्यावे._बहुवर्षीय जातीपासून भरपूर चारा उत्पादनासाठी चार कापण्यांनंतर खुरपणी करून हेक्टरी १५ किलो नत्र (३३ किलो युरिया)५० किलो स्फुरद (३१२ किलो सिंगल सुपरफॉस्फेट) किंवा १०० किलो डीएपी खत द्यावे_
हात कोळप्याने कोळपणी करून घ्यावी. प्रत्येक कापणीनंतर खुरपणी करून पाणी द्यावे. त्यामुळे माती भुसभुशीत राहून जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत होते. कोळपणीमुळे खोडाच्या भागात मातीची भर लागते, पीक वाढीस जोम येतो._
जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन हिवाळ्यात १० ते १२ दिवसांनी आणि उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे. जमिनीचा मगदूर आणि हंगामाचा विचार करून वेळेवर पुरेसे पाणी व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. जास्त प्रमाणात पाणी दिल्यास रोपे मरण्याची शक्यता असते.
पेरणीनंतर पहिली कापणी ५० ते ५५ दिवसांनी करावी. कापणी जमिनीपासून ५ ते ६ सें.मी. उंचीवर करावी. कापणी करताना पीक उपटून येणार नाही याची काळजी घ्यावी. पुढील कापण्या २१ ते २५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. पहिल्या वर्षी १० ते ११ कापण्या तर दुसऱ्या वर्षी १२ ते १४ कापण्या होतात. तिसऱ्या वर्षी फेब्रुवारी अखेरपर्यंत हिरव्या चाऱ्यासाठी कापण्या घ्याव्यात. शेवटच्या कापणीनंतर पिकाला ५ ते ६ दिवस पाण्याचा ताण द्यावा. दरम्यान खुरपणी करून पाणी देण्यापूर्वी हेक्टरी १०० किलो स्फुरदची (६२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) मात्रा द्यावी. पाणी देऊन पीक बियाण्यासाठी सोडावे. घासाचे पीक ५० टक्के फुलोऱ्यात आल्यानंतर २ टक्के डायअमोनियम फॉस्फेटची फवारणी करावी. त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने पुन्हा २ टक्के डाय अमोनियम फॉस्फेटची दुसरी फवारणी करावी. यामुळे बियाणे उत्पादनात २० टक्के वाढ होते.
वर्षभरात लसूण घासापासून १२० ते १४० टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.
लेखक - प्रवीण सरवदे (कराड)
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments