नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात रात्रीच्या तापमानात घट व रात्रीचा कालावधीत वाढ होत असल्याने गुलाबी बोंडअळीच्या पतंगाना उपजीविकेसाठी अनुकुल वातावरण ठरत आहे. त्याकरीता सद्य परिस्थितीत गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे असुन पुढील प्रमाणे उपाययोजना करण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किटकशास्त्रज्ञांनी दिला आहे.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कामगंध सापळयाचा वापर करुन मोठया प्रमाणात सामुहिकरीत्या नर पतंग गोळा करुन नष्ट करावेत. जिनींग-प्रेसिंग मिल तसेच कापूस साठवण केलेल्या जागी प्रकाश सापळे, कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावेत. आवश्यकता असलेल्या ठिकाणी कामगंध सापळ्यातील ल्युर बदलून नवीन ल्युर लावावे. डिसेंबर व जानेवारी महीन्यात कपाशीच्या पऱ्हाटया किंवा वाळलेल्या नख्या मध्ये गुलाबी बोंडअळी सुप्त अवस्थेत जाण्याची शक्यता असुन पुढील हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीच्या शेतातील अवशेष नष्ट करणे अवश्यक आहे.
जानेवारी महिन्या नंतर कपाशीचे पिक ठेवल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी कपाशीची बोंडे सतत उपलब्ध होत असल्याने तिच्या वाढीच्या अवस्थेस आणखी चालना मिळते, आणि अळीच्या जीवनक्रमांच्या संख्येत कमी कालावधीत वाढ होते, तसेच बीटी प्रथिनांचे प्रमाण कमी होऊन प्रतिकारकता निर्माण होते. डिसेंबर महिन्यानंतर शेत पुढील 5 ते 6 महिने कापूस पिक विरहीत ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम संपुष्टात येते, त्यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होतो.
डिसेंबर नंतर खाद्य उपलब्ध नसल्यास अळी सुप्तअवस्थेत जाते. परंतू फरदडीमुळे जीवनक्रम चालू राहून पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापसावर तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो म्हणून कुठल्याही परिस्थितीत फरदड घेऊ नये. कापूस पिकाचा चुरा करणारे यंत्राचा या वापर करावा व तयार झालेला पिकाचा चुरा गोळा करुन सेंद्रिय खतामध्ये रुपांतरीत करावे. पिक काढणीनंतर खोल नांगरणी करुन जमिन उन्हात चांगली तापू द्यावी. पिक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाटया, व्यवस्थीत न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पालापाचोळा नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे.
फरदड कापूस म्हणजे कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर सिंचन उपलब्ध असलेल्या जमिनीवर पाणी देऊन पुन:श्च कापूस पिक घेतले जाते. अशा वेळी पिकापासून जोमदार उत्पन्न मिळण्यासाठी पाणी, खते, किटकनाशके यांचा वापर करुन मार्च महिन्यानंतरही कापूस पिक घेतले जाते. फरदड कपाशीला सिंचीत केल्याने पाते, फुले व बोंडे लागण्यात अनियमितता येऊन गुलाबी बोंडअळीला सतत खाद्य उपलब्ध होते. फरदड कपाशीमध्ये लागणाऱ्या बोंडाचे पोषण चांगले होत नाही त्यामुळे धाग्याची लांबी कमी होते. त्याचप्रमाणे धाग्याची मजबुती व रुईचा उतारा घटून कापसाला बाजारभाव कमी मिळतो. कापसाची फरदड घेतल्यास कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
फरदड कापूस पिकांवर येणाऱ्या अळ्यांना हंगामानंतर सतत खाद्य उपलब्ध होते. त्यामुळे किडींचा पुढील हंगामात प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. कापूस पिकाचा कालावधी जसा-जसा वाढत जातो त्याप्रमाणे त्यामधील बीटी प्रथिनाचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे बोंडअळयांमध्ये बीटी प्रथिना विरुध्द प्रतिकारक्षमता निर्माण होण्याची शक्यता असते. खरीप हंगामात पिठ्या ढेकूण व पांढरी माशीचा प्रादुर्भाव झालेला असल्यास त्याचा फरदड कपाशीमध्ये मोठया प्रमाणात प्रसार होऊन उत्पादनात घट होते व पुढील हंगामात किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पुढील हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फरदड कपाशी न घेण्याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड व समन्वय अधिकारी क्रॉपसॅप प्रकल्प तथा सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनंत बडगुजर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Share your comments