1. कृषीपीडिया

कपाशीची शेती – जाणून रोगांची माहिती आणि व्यवस्थापन

कापूस हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पीक असून २०१८-१९ मध्ये पिकाखालील क्षेत्र देशातील एकूण क्षेत्राच्या ३५ टक्के म्हणजेच ४२.१८ लाख हेक्टर इतके आहे.

KJ Staff
KJ Staff


कापूस हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पीक असून २०१८-१९ मध्ये पिकाखालील क्षेत्र देशातील एकूण क्षेत्राच्या ३५ टक्के म्हणजेच ४२.१८ लाख हेक्टर इतके आहे. तसेच कापूस रुईची दर हेक्टरी उत्पादकता २६६ किलो / हेक्टर ही राष्ट्रीय उत्पादकतेपेक्षा ३०५ किलो / हेक्टर कमी आहे.  कपाशीवर बुरशी, जिवाणू, विषाणूंमुळे रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतात. काही वेळा आकस्मिक मर, मूलद्रव्यांच्या कमतरता दिसून येतात. या रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट येते. रोगांमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्याकरिता योग्य वेळेत उपाययोजना करणे आवशयक आहे. आजच्या लेखात आपण याविषयी माहिती घेणार आहोत.

) कवडी रोग (ऍन्थ्रकनोज) :- हा रोग कोलेटोट्रिकम इंडीकम या बुरशीमुळे होतो. रोगाची लक्षणे पिकाच्या सर्व अवस्थेत  आढळतात. रोगट बियाण्यांपासून निघालेली रोपे कुजतात. पानांवर तपकिरी काळ्या रंगाचे ठिपके दिसतात, अशी पाने गळतात जमिनीलगतच्या कोवळ्या देठावर चट्टे येऊन रोपे मरतात. बोंडावर लहान, गोलाकार, काळपट-करड्या रंगाचे व किंचित खोलगट चट्टे पडतात. तसेच बोंडे अर्धवट उमलतात. कापूस घट्ट चिकटून राहतो. कवडीसारख्या गुठळीत रूपांतरित होते. म्हणून याला कवडी रोग म्हणतात. असा कापूस आणि त्याचे बी निरुपयोगी होते. कापसाचा रंग पिवळसर तपकिरी होऊन त्याची धाग्याची प्रत बिघडते. या रोगाचा प्रसार दूषित व रोगट बियाणे तसेच जमिनीतील रोगट झाडांच्या अवशेषांपासून होतो. दुय्यम प्रसार बुरशीच्या बीजाणूद्वारे हवा व जमिनीतून होतो.  अतिवृष्टी, थंड हवामानात आणि विशेषतः बागायती कपाशीवर या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. हा रोग कपाशीच्या अमेरिकन व देशी अशा दोन्ही जातींवर आढळून येतो.


रोगाचे
नियंत्रण-  रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी बियाण्यास शिफारस केलेल्या रसायनांची प्रक्रिया करावी. यामुळे रोगाचा प्राथमिक प्रसार कमी करता येतो. शेतातील पिकांचे रोगट अवशेष जाळून नष्ट करावेत. रोग व्यवस्थापनासाठी बियाण्यास ३ ग्रॅम थायरम प्रति १ किलो बियाणे या प्रमाणात पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. बोंडे पक्व होण्याच्या काळात २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड १० लिटर पाण्यात अथवा २५ ग्रॅम झायनेब १० लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार दोन ते तीन वेळा फवारावे.

) दहिया रोग ( ग्रे मिल्ड्यू) - हा रोग रॅमुलेरिया ऍरिओला या बुरशीमुळे होतो.  या रोगांचा प्रादुर्भाव देशी, अमेरिकन, संकरित व  संकरित बीटी कपाशीवर आढळून येतो. रोगट पानांवर खालील बाजूने पांढरे, कोनाकृती ठिपके दिसतात. हे ठिपके पसरून झाडावर दही शिंपडल्यासारखे डाग दिसतात. यामुळे या रोगास दहिया हे नाव पडले आहे. या बुरशीच्या प्रादुर्भावाने पाने, फुले व बोंडे गळतात. या रोगांची बीजे जमिनीत पडलेल्या रोगट अवशेषामध्ये सुप्तावस्थेत राहतात आणि पुढील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पोषक हवामानात पुन्हा सक्रिय होऊन कपाशीवर रोगांची लागण होते. रोगांचा पुढील प्रसार हवेतून होतो. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत जास्त पाऊस आणि सारखे ढगाळ वातावरण असल्यास रोगाची लागण मोठ्या प्रमाणात होते.

रोगाचे नियंत्रण- शेतातील रोगग्रस्त अवशेषांचा नायनाट करावा. पिकांची फेरपालट करावी. पेरणीनंतर ३०, ६० व ९० दिवसांनी प्रादुर्भाव दिसून येताच ३०० मेश पोताची गंधक भुकटीची हेक्टरी २० किलो ग्रॅम या प्रमाणात धुरळणी करावी किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकांची १० ग्रॅम / १० लिटर पाणी किंवा पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.

) मर रोग :- हा रोग फ्युजारियम ऑक्‍सिस्पोरम फॉ. स्पे. वासिन्फेक्‍टम या जमिनीत वाढणाऱ्या बुरशीमुळे होतो. देशी कपाशीचे वाण या रोगाला जास्त प्रमाणात बळी पडतात. जमिनीचे २४ ते २८ सेल्सिअस तापमान व ४० ते ६० टक्के आर्द्रतेचे प्रमाण असताना, या रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. हा रोग पिकांच्या वाढीच्या सर्व अवस्थेत होऊ शकतो. रोगट झाडाची पाने कोमेजतात, मलूल होतात, लोंबतात व पिवळी पडून वाळतात. रोगाला संपूर्ण झाड किंवा काही फांद्या बळी पडतात. रोगट झाडांचा आणि मुख्य मुळाचा भाग मधोमध उभा चिरल्यास आतील भागात काळपट पट्टे दिसतात. या रोगकारक बुरशीचा प्रसार प्रामुख्याने जमिनीतून होतो. या रोगामुळे उत्पादनात ५० ते ६० टक्के घट येते.

रोगाचे नियंत्रण-  पेरणीपूर्वी  बियाण्यास १.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम + ३ ग्रॅम थायरम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. रोग प्रतिबंधक वाणांची लागवड करावी.

) पानावरील ठिपके/ अल्टरनेरिया करपा (अल्टरनेरिया लिफ स्पॉट): - हा बुरशीजन्य रोग असून मुख्यत्वे करून पानांवर येतो.  अल्टरनेरिया या बुरशीमुळे पानांवर ठिपके किंवा मोठे चट्टे आढळून येतात. रोगाची बुरशी पालापाचोळ्यावर असते. ती पुढील हंगामातील पिकास रोग होण्यास कारणीभूत ठरते. दुय्यम प्रसार बुरशीच्या बीजाणूद्वारे हवेतून होतो. अमेरिकन जातीवर या रोगाचे प्रमाण जास्त असते.

नियंत्रण :- वेळीच रोगट व गळालेली पाने वेचून जाळून टाकावीत. पेरणीपूर्वी १० ग्रॅम सुडोमोनास फ्लुरोसन्सची प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. नियंत्रणासाठी २० मि.लि. सुडोमोनास फ्लुरोसन्स प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर ३०, ६० व ९० दिवसांनी फवारणी करावी. यामुळे जिवाणूजन्य करपा व ठिपके या दोन्ही रोगांचे नियंत्रण होते. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच पायरॅक्लोस्ट्राबीन (२० टक्के डब्ल्यूजी) १० ग्रॅम किंवा मॅनकोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १०  लिटर पाणी किंवा कार्बेन्डाझिम २५० ग्रॅम प्रति ७५० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टर फवारणी करावी.

 


) मूळकुजव्या रोग:- हा रोग रायझोक्टोपनया सोलॅनी, रायझोक्टोपनया बटाटीकोला, मॅक्रोफोमीना फॅसिओलीना, क्लेरोशीयम  रॉल्फसाई या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव जून, जुलै महिन्यात दिसून येतो. तापमानाच्या तीव्र बदलामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. अशी झाडे एकाएकी कोमेजून वाळतात, मुळे कोमेजतात. साल चटकन निघून येते. सुरुवातीच्या अवस्थेत रोपे शेंड्यापासून कोमेजून खाली झुकतात. जमिनीलगतचे खोड व बुंधा सडून बाधित झाड सहजपणे जमिनीपासून उपटल्या जाते. रायझोक्टोनिया या रोगकारक बुरशीमुळे मुळ्या तांबड्या किंवा काळ्या पडून कुजतात. तसेच उष्ण व दमट हवामानात क्लेरोशीयम रॉल्फसाई या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे झाडाच्या बुंध्यावर पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ दिसून येते व झाडाच्या जमिनीलगतच्या भागात वर्तुळाकार तांबड्या रंगाच्या मोहरीच्या आकाराच्या क्लेरोशीअल बॉडीज तयार झालेल्या दिसतात. रोगाची बुरशी प्रामुख्याने जमिनीत राहत असल्याने, रोगाचा प्राथमिक प्रादुर्भाव मुख्यतः जमिनीद्वारे होतो. जमिनीत पाण्याचा अभाव व अधिक तापमान हे रोगाच्या प्रसारास अनुकूल असते.

नियंत्रण- थायरम किंवा कार्बेन्डाझिम ३ ग्राम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्राम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. प्रादुर्भाव दिसून येताच १० ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा २५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड प्रति १० लिटर पाणी घेऊन २०० ते ३०० मि. ली द्रावणाची रोगट रोपाच्या बुंध्याजवळ आळवणी करावी.

) करपा- हा रोग झॅन्थोमोनास ऑक्सेनोपोडीस पॅथोव्हर मालव्हेसीरम या जिवाणूंमुळे होतो.

अ) पानावरील कोनाकार ठिपके- सुरुवातीस पानांच्या खालच्या बाजूने तेलकट कोनात्मक तांबड्या काळपट रंगाचे ठिपके दिसतात. रोगाची सुरुवात साधारणतः ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते. जवळपास सर्वच जातींवर या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो.

ब) पानाच्या शिरेवरील करपा - पानाच्या मुख्य व उपशिरांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. यामुळे पानाच्या शिरा काळपट किंवा तांबड्या रंगाच्या दिसतात.

क) देठावरील करपा - फांद्यांवर काळपट रंगाचे ठिपके दिसतात व फांद्या काळपट पडतात.

ड) बोंड सड (रॉट) - बोंडावर तेलकट, काळपट ठिपके पडतात.

रोगाच नियंत्रणः शेतात पडलेल्या रोगट पाला-पाचोळा, पऱ्हाट्या, रोगट बोंडे गोळा करून जाळावीत. सुरुवातीस रोगट झाडे त्वरित नष्ट करावीत. पिकांची फेरपालट, लवकर विरळणी, चांगली नांगरणी हे उपाय रोग कमी करण्यास मदत करतात, रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी. प्रति किलो बियाण्यास १ ग्रॅम कार्बोक्सिन अधिक ३ ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. पेरणीसाठी तंतुविरहित केलेले बियाणे वापरावे. शेतात आंतरपीक किंवा मिश्र पिके घ्यावीत. रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्ट्रेप्टोमायसीन १ ग्रॅम अधिक कॉपर ऑक्झिक्लोराइड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरजेनुसार १० दिवसांच्या अंतराने ५ टक्के निंबोळी अर्काच्या ३  फवारण्या घ्याव्यात. सुडोमोनास फ्लूरोसेन्स पी. एफ-१, १० ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी तसेच २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून ३ फवारण्या उगवणीनंतर ३०, ६०, आणि ९० दिवसांनी कराव्यात.

 


) लाल्या - हा कपाशीतील रोग नसून प्रामुख्याने अन्नद्रव्यांची कमरता (त्यातही मुख्यत्वे नायट्रोजन व मॅग्नेशियम) व अन्य काही कारणांमुळे दिसून येणारा परिणाम आहे. प्रारंभी पाने टोकाकडून व कडेने पिवळसर पडण्यास सुरुवात होते. त्यानंतर पानांमधील हरितद्रव्य नष्ट होऊन अँथेासायनिन नावाचे लाल रंगाचे द्रव्य जमा होते. त्यामुळे पाने लाल रंगाची दिसू लागतात. यालाच आपण लाल्या असे म्हणतो.

नियंत्रण :- शेतात पाणी साचल्यास त्वरीत चर काढून ते शेताबाहेर काढून द्यावे. पावसाने बराच काळ उघडीप दिल्यास संरक्षित पाणी द्यावे. खतांची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी. त्यातही नत्राच्या मात्रा २ ते ३ वेळेस विभागून देणे अतिशय आवश्यक आहे. पाते लागणे, बोंडे भरणे यांसारख्या महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थेत २ ते ३ वेळेस २ टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी द्यावी. लाल्याची लक्षणे दिसताच १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मॅग्नेशिअम सल्फेटच्या २ ते ३ फवारण्या द्याव्यात. किंवा २० ते ३० किलो मॅग्नेशिअम सल्फेट प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीतून द्यावे.

) विषाणूजन्य रोग:-  (टोबॅको स्ट्रीक व्हायरस)- बीटी कपाशीत विषाणूजन्य रोग तीव्र प्रमाणात येतो. कपाशीच्या पानावर पिवळसर  किंवा करपलेल्या रेघा येऊन पानाचा आकार कमी होतो. पाने व खोडावर करपलेल्या रेषा येऊन त्या वाढत जातात. त्यामुळे झाड खुजे होते. हा विषाणू तंबाखू, कापूस या पिकाव्यतिरिक्त सूर्यफूल, भुईमूग आणि सोयाबीन या पिकांवर येतो.  या रोगाचा प्रसार फुलकिडीद्वारे होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी निरोगी बियाण्याचा वापर करावा. फुलकिडीद्वारे होणारा प्रसार थांबविण्यासाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकाच्या तीन ते चार फवारण्या घ्याव्यात.

) आकस्मिक मर: - हा रोग नसून, या रोगला कोणताही बुरशी, जिवाणु किंवा विषाणु जबाबदार नाही. दिर्घ पावसाचा खंड नंतर भरपुर पाऊस आणि जमिनित अतिरीक्त पाण्याची साठवण व आर्द्रतामुळे या रोगाची लक्षणे दिसतात. हा रोग बहुधा संकरित वाणावर जास्त येतो. रोगट झाडावरील पानाचा  तजेलपणा नाहीसा होऊन पाने मलूल होतात व पानातील ताठपणा कमी होतो. झाडे संथगतीने सुकू लागतात. पाने, फुले व बोंडाची गळ होते. अपरिपक्व बोंडे अवेळी सुकतात. पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर वीस दिवसांपेक्षा जास्त झाल्यास हा रोग होण्याची दाट शक्यता असते.

नियंत्रण :-  जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होण्यास योग्य वेळी डवरणीच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत ठेवावी. पिकास पाण्याचा ताण जास्त कालावधीकरिता बसू देऊ नये. तसेच शेतात झाडाजवळ दीर्घ काळ पाणी तुंबून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.  रोगग्रस्त झाडाच्या भोवतालची जमीन खुरपीने त्वरित भुसभुशीत करावी आणि प्रति झाड २ ते ३ ग्रॅम युरिया झाडाजवळ जमिनीत मिसळून द्यावा. झाडाच्या मुळ्यांजवळ कॉपर ऑक्झिक्लोराइड ३० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम  प्रति १० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची झाडांच्या बुंध्याजवळ आळवणी करावी.

 

 

लेखक -

श्री शरद एस. भुरे

वनस्पती रोगशास्त्र, कृषि महाविद्यालय नागपुर

मो. ९५८८६१९८१५

डॉ. बिना नायर

वनस्पती रोगशास्त्र, कृषि महाविद्यालय नागपुर

डॉ. संदीप कामडी

वनस्पती रोगशास्त्र, कृषि महाविद्यालय नागपुर

श्री.जगदीश पर्बत

वनस्पती रोगशास्त्र, कृषि महाविद्यालय नागपुर

 श्री. गणेश कंकाळ

वनस्पती रोगशास्त्र, कृषि महविद्यालय नागपुर

English Summary: Cotton farming - To know diseases information and management Published on: 07 July 2020, 07:58 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters