कंदमाशी
कंदमाशी ही हळद पिकावरील नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. कंदमाशीचा प्रौढ डासासारखा परंतु मुंगळ्याप्रमाणे आकाराने मोठा व काळसर रंगाचा असतो. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायांची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून, त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात.
या किडीच्या अळ्या उघड्या गड्डयामध्ये शिरून त्यांच्यावर उपजीविका करतात. अशा गड्डयामध्ये नंतर बुरशीजन्य रोगांचा आणि काही सुत्रकृमींचा शिरकाव होतो. त्यामध्ये खोड व गुद्दे मऊ होतात व त्यांना पाणी सुटून ते कुजतात.
जास्ती दिवस लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक प्रमाणात अनुकूल असतो. वेळीच लक्ष दिले नाही तर या कीडीमुळे हळद पिकामध्ये ४५ ते ५० टक्के नुकसान होते. ही कीड ऑगस्ट ते पिकाच्या काढणीपर्यंत नुकसान करते.
व्यवस्थापन:
१. आॅगस्ट ते ऑक्टोंबर दरम्यान १५ दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २० मि.ली. किंवा डायमिथोएट (३०% प्रवाही ) १० मि.ली. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे झाडावर फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे.
२.उघडे पडेलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.
३. तसेच जमिनीतून क्लोरपायरीफॉस ५० टक्के ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात करावी. तसेच कंदमाशी मुळे कंद कूज झाली असल्यास मुख्य किटकनाशकासोबत एका बुरशीनाशकाची तज्ञांच्या सल्ल्याने मिसळून आळवणी करावी.
४. हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत.
५. तसेच एकरी २-३ पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम घेऊन त्यात १ ते १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात.
(संदर्भ: हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली)
टीप : हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्याने विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत.
अशाप्रकारे कंद माशीच्या प्रादुर्भावास वेळीच लक्ष देऊन भविष्यात होणारे नुकसान टाळावे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी
०२४५२-२२९०००
Share your comments