पीक पोषण होणे म्हणजे पिकास मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सेंद्रिय अथवा रासायनिक खतांद्वारे पुरवठा करणे. पीक पोषणासाठी नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांनाच अधिक प्राधान्य दिले जाते. त्या तुलनेत दुय्यम अन्नद्रव्यांकडे (कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व गंधक) आवश्यक त्या प्रमाणात लक्ष दिले जात नाही; तसेच लोह, मंगल, जस्त, तांबे, मोलाब्द, बोरॉन, क्लोरिन ही सात मूलद्रव्येही पीक पोषणात अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात; परंतु त्यांचा वापरही अतिशय मर्यादित स्वरूपात होत आहे. सध्याच्या परिस्थितीतही त्याकडे म्हणावे तसे लक्ष पुरविले जात नाही. सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांचे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले दिसून येते; परंतु सूक्ष्म अन्नद्रव्ये ही मुख्य तसेच दुय्यम अन्नद्रव्यांशी संबंधित असल्याने त्यांच्या वापराकडेही तितकेच लक्ष देणे महत्त्वाचे आहे. वनस्पती शास्त्रज्ञांना रासायनिक परीक्षणात आढळून आले आहे, की कोणती पोषणद्रव्ये महत्त्वाची आहेत ते तीन मुख्य तत्त्वांवर ठरते -
1) पोषणद्रव्ये वनस्पतींच्या वाढीसाठी व प्रजननासाठी उपयुक्त असली पाहिजेत, ती नसल्यास वाढ चांगली होत नाही व प्रजनन थांबते.
2) जरूर त्या पोषणद्रव्यांची उणीव अन्य कुठल्याही अन्नद्रव्यांचा वापर करून भरून काढली जाता येऊ नये.
3) वनस्पतींच्या----- प्राथमिक स्वरूपाची कामगिरी असली पाहिजे.
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर न केल्याने होणारे प्रतिकूल परिणाम ताबडतोब दृश्य स्वरूपात नसतात. मात्र, त्यांची कमतरता खूपच नुकसानकारक ठरू शकते. कारण अल्प प्रमाणात लागणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पीक पोषणातील कार्य मात्र मुख्य अन्नद्रव्यांइतकेच महत्त्वाचे आहे. नत्र, स्फुरद व पालाश योग्य प्रमाणात वापरून देखील पिकांपासून पूर्ण क्षमतेएवढे उत्पादन मिळत नाही, कारण प्रत्येक अन्नद्रव्याचे कार्य विशिष्ट प्रकारचे असते. या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपस्थितीतच पिके नत्र, स्फुरद, पालाश व इतर अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर करतात. म्हणजेच एखादे अन्नद्रव्य हे दुसऱ्या अन्नद्रव्याची जागा घेऊ शकत नाही.
लक्षात ठेवू या लोह- जस्त- बोरॉन
योग्य प्रमाणात व कार्यक्षम स्वरूपात सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरासाठी पीक नियोजन व व्यवस्थापन आवश्यक आहे.
उदा. तृणधान्य, टोमॅटो, भुईमूग, ऊस, मका व लिंबूवर्गीय फळझाडे ही लोह या अन्नद्रव्यास जास्त संवेदनशील असल्यामुळे लोहाच्या कमतरतेचा अनिष्ट परिणाम या पिकांवर लवकर होतो. जस्ताची कमतरता असेल तर तृणधान्य, कापूस, सोयाबीन व लिंबूवर्गीय फळझाडांचे जास्त नुकसान होते.
2) बोरॉनच्या कमतरतेमुळे सूर्यफूल, कापूस, हरभरा, भाजीपाला व लिंबूवर्गीय फळझाडांची योग्य वाढ होत नाही. ही अन्नद्रव्ये फवारणीद्वारे दिल्याने उत्पादन चांगले येते. वनस्पतींना मातीतून योग्य प्रमाणात बोरॉन मिळाल्यास कॅल्शिअम -पोटॅशिअम मॅग्नेशिअम यांचे कार्य व्यवस्थित सुरू राहते. काही प्रमाणात किडींना दूर ठेवण्यास बोरॉनची मदत होते.
महाराष्ट्रातील जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता
माती परीक्षणाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील जमिनींमध्ये 35.4 टक्के जमिनीत उपलब्ध जस्त, 25.7 टक्के जमिनीत उपलब्ध लोह व 25.7 टक्के जमिनीत उपलब्ध बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आली आहे. मात्र उपलब्ध मॅंगनीज, तांबे व मोलाब्द पुरेशा प्रमाणात पिकांना पुरविण्याची क्षमता महाराष्ट्रातील जमिनीमध्ये आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील जमिनीमध्ये एकापेक्षा अधिक सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. माती परीक्षण अहवालानुसार त्यांचा योग्य प्रमाणात वापर पीक उत्पादनाची व शेतीमालाची प्रत वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. चाळीस वर्षांपूर्वी एकाच अन्नद्रव्याची कमतरता (नत्र) जाणवत होती,
आज त्याच मातीमध्ये सहा अन्नद्रव्यांची (नत्र, स्फुरद, गंधक, लोह, जस्त, बोरॉन) कमतरता दिसून येत आहे. यापुढे योग्य काळजी घेतली नाही, तर सहा अन्नद्रव्यांच्या या यादीत वाढ होईल हे निश्चित आहे. पिकांना लागणारी अन्नद्रव्ये आणि त्यांचे प्रमाण योग्य असेल तरच पिकांची चांगली वाढ होत असते.
सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची कारणे
1) अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित वाणांचा वापर.
2) भरखते/ सेंद्रिय खतांचा कमी वापर.
3) रासायनिक खतांचा असंतुलित वापर.
4) सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा नगण्य वापर.
5) वर्षातून सतत एकापेक्षा जास्त पिके घेणे म्हणजे बहुपीक पद्धतीचा वापर.
6) पिकांची योग्य अशी फेरपालट न करणे.
7) संयुक्त किंवा अतिशुद्ध अशा सूक्ष्म अन्नद्रव्येविरहित रासायनिक खतांचा वापर.
8) सतत बागायती पिके घेतल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण घटणे.
9) पिकातील व जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचा परस्पर संबंध.
10) जमिनीचे उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्यांशी संबंधित गुणधर्म, उदा. जमिनीत पाण्याच्या निचऱ्याचा अभाव, मुक्त चुन्याचे प्रमाण, क्षारवट व चोपण जमीन, जमिनीचा सामू जास्त असणे आणि अल्कधर्मी व खडकाळ जमीन.
Share your comments