(A) हरभऱ्यावरील घाटेअळी ची ओळख व नुकसानीचा प्रकार : हरभऱ्यावरील घाटे अळीचा मादी पतंग नवती च्या पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यावर व फुलावर एक एक अशी एकेरी खसखशीच्या दाण्यासारखी अंडी घालतो. या अंड्यातून साधारणता दोन ते तीन दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी सुरुवातीला पानावरील हरितद्रव्य खरडून खाते त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व गळून पडतात. ह्या अळ्या थोड्या मोठ्या झाल्यावर हरभऱ्याची पूर्ण पाने कोवळी देठे खाऊन फस्त करतात. या किडीच्या तीव्र प्रादुर्भाव झाला असता झाडावर फक्त फांद्या शिल्लक राहतात. पुढे हरभऱ्याला फुले लागल्यावर व घाटे लागल्यावर ह्या अळ्या फुले व घाटे याचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाट याला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक घाटेअळी संपूर्ण कालावधीत हरभऱ्यात 30 ते 40 घाटयाचे नुकसान करू शकते.
(B) हरभऱ्यावरील घाटेअळी साठी एकात्मिक व्यवस्थापन योजना :
(१) हरभरा पिकात नैसर्गिक पक्षी थांबे नसल्यास ताबडतोब हरभऱ्याचे शेतात बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे प्रति हेक्टर 20 पक्षी थांबे या प्रमाणात शेतात लावावे त्यामुळे पक्षांना आकर्षित करून पक्षा द्वारे अळ्या वेचून खाण्याचे काम सोपे होण्यास मदत होते.
(२) हरभरा शेतात शेतकरी बंधूंनी घाटे अळीच्या सनियंत्रणाकरिता एकरी 2 म्हणजेच हेक्टरी 5 कामगंध सापळे पिकाच्या उंचीच्या वर साधारणता एक ते दीड फूट उंचीवर Helilure या कामगंध गोळी सह लावावे. या कामगंध सापळा सतत दोन ते तीन दिवस आठ ते दहा घाटअळीचे नर पतंग ही सरासरी आढळल्यास घाटे अळीच्या व्यवस्थापनाकरिता व्यवस्थापन उपाय योजना अंमलात आणावयाची आहे असा त्याचा संकेतार्थ घ्यावा.
(३) शेतकरी बंधूंनो वेळोवेळी हरभरा पिकात निरीक्षणे घ्यावी. हरभरा पिकात 1 ते 2 घाटे आळ्या प्रति मीटर ओळीत आढळल्यास किंवा सरासरी पाच टक्के हरभऱ्याच्या घाटयाचे नुकसान आढळून आल्यास आर्थिक नुकसानीची पातळीच्या आधारावर घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी खालील प्रमाणे कीटकनाशकाची फवारणी करावी
(a) पहिली फवारणी साधारणता चाळीस ते पन्नास टक्के फुलोऱ्यावर हरभरा असताना :
पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी
किंवा
क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 20 मिली अधिक 10 लिटर पाणी
या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका बाबीची पहिली फवारणी करावी.
(b) दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर साधारणता पंधरा दिवसांनी करावी :
इमामेक्टीन बेंजोएट 5% SG 4.4 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी
किंवा Ethion 50 % प्रवाही 20 मिली अधिक दहा लिटर पाणी
किंवाChlorantraniliprole 18.5%SC 2.5 मिली अधिक दहा लिटर पाणी
या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची योग्य निदान करून आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गरजेनुसार फवारणी करावी.
टीप : (१) फवारणी करताना लेबल क्लेम शिफारशीची शहनिशा करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणेच रसायनाचा वापर करावा
(२) फवारणी करताना शिफारशीत मात्रेत कीटकनाशकाचा वापर करावा तसेच अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी
(३) फवारणी करताना एकाच किटकनाशकाचा सतत वापर करू नये तसेच लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे कीटकनाशक बदलून कीटकनाशकाचा वापर करावा.
(४) फवारणी करताना सुरक्षा किटस चा वापर करावा तसेच फवारणी करताना सुरक्षित फवारणी तंत्राचा वापर करावा.
Share your comments