1. कृषीपीडिया

पेरणीकरिता सोयाबीनचे बियाणे वापरण्‍यापुर्वी तपासा उगवणक्षमता

KJ Maharashtra
KJ Maharashtra


महाराष्ट्र राज्यामध्ये सोयाबीन पिकाखालील सर्वसाधारण क्षेञ ३५ लाख हेक्‍टर असून लागवडीखालील क्षेञ दिवसेंदिवस वाढत आहे. खरीप २०२० मध्ये सोयाबीन पिकाखाली ४० लाख हेक्‍टर क्षेञ अपेक्षित आहे. राज्यात मागील वर्षीच्या आक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये वादळी व अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकांचे व बिजोत्पादनाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, सोयाबीन बियाणे नाजुक असल्यामुळे उगवणशक्‍ती तपासणीत मोठया प्रमाणात हे बियाणे नापास झाले. उपरोक्त वाढत जाणाऱ्या क्षेञासाठी लागणारी बियाणेची गरज भागविण्यासाठी विविध स्ञोताद्वारे बियाणे उपलब्ध करावे लागणार आहे.

अशा परिस्थितीत पेरणीसाठी व सोयाबीनच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी शेतकरीस्तरावर स्वउत्पादित सोयाबीन बियाण्याच्‍या वापरावर आपणास भर द्यावा लागेल. याकरिता शेतकरी बांधवानी स्‍वत: कडील सोयाबीन बियाणाची उगवणक्षमता तपासणी करून वापरा करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या बियाणे विभागाने केले आहे.

सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने या पिकाचे बियाणे सरळ वाणांचे आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्‍यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित होणारे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित बियाण्यांची चाळणी करुन चांगल्या प्रतीचा बियाण्याची निवड करावी. सोयाबीन बियाणाचे बाह्रयावरण नाजूक व पातळ असल्याने साठवणूक केलेल्या बियाण्यांची हाताळणी काळजी पूर्वक करावी. पोती उंचावरुन आदळली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. स्वउत्पादीत मागील वर्षीचे बियाणे पेरणीसाठी वापरण्याकरीता त्यांची उगवणशक्ती तपासणे अत्यंत गरजेचे असते, त्यावरुन चांगल्या उगवण क्षमतेची खाञी पटू शकते. 

उगवणक्षमतेनुसार पेरणी करता बियाण्याचे प्रमाण ठरविता येऊ शकेल. सदरिल उगवणक्षमता तपासणी शेतकरी बांधव घरच्‍या घरी पुढील तीन पध्‍दतीने करू शकतात.

१) मातीमध्ये उगवणक्षमता तपासणी 

या पद्धतीत कुंडी किंवा ट्रे मध्ये ३/४ भागापर्यंत माती भरावी. नंतर या मातीच्या थरावर एकासारख्या अंतरावर मोजून बी ठेवावेत व त्यावर एक ते दोन से.मी. जाडीचा मातीचा थर टाकावा. हात फवारणीच्या (हैण्ड स्प्रयेरच्या) सहाय्याने कुंडी किंवा ट्रे वर पाणी शिंपडावे. बियांच्या आकारानुसार मातीमध्ये ओलेपणा ठेवावा. अशा कुंडया किंवा ट्रे आवश्‍यक असणाऱ्या तापमान व आर्द्रता असलेल्या ठिकाणी ठेवल्यानंतर साधारणत: आठ ते दहा दिवसांमध्ये बियाणांची उगवण होऊन त्याची उगवणक्षमता तपासता येते.

२) कुंडीत बियाणे तपासणी  

एका कुंडीत चांगली माती भरुन त्यात शंभर बियांचे दाणे उथळ पेरावेत व पाणी देऊन पाच ते सात दिवसात किती रोपे उगवतात याची पाहणी करावी. जर बियाण्याची उगवणशक्ती ७० टक्कयाहून जास्त असेल तरच ते बियाणे पेरणीसाठी वापरावेत.

३) वर्तमानपञाचा कागद वापरुन बियाणे तपासणी 

वर्तमानपञाचा एक कागद घेऊन त्याला चार घड्या पाडाव्यात त्यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी दहा बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपञाच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशा रीतीने शंभर बियांच्या दहा गुंडाळया तयार कराव्यात. नंतर या गुंडाळ्या पॉलीथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसांनंतर त्यामधील बिजांकुर मोजावे.

शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता उपरोक्त पध्दतीने घरच्या घरी तपासून जर उगवणक्षमता ७० टक्के पेक्षा कमी असल्यास त्याप्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. जर उगवण क्षमता ६५ ते ७० टक्के असेल तर पेरणीसाठी एकरी ३२.५ ते ३०.० किलो बियाणे वापरावे. जर उगवणक्षमता ६० ते ६४ टक्के असेल तर पेरणीसाठी एकरी ३५.० ते ३३.० किलो बियाणे वापरावे. सोयाबीन बियाणे टोकण पध्दतीने किंवा बीबीएफ प्लँटरच्या सहाय्याने रुंद वरंबा सरी पध्दत यंञाने पेरणीसाठी प्रति हेक्टरी ५० ते ५५ किलो बियाणे वापरावेत.

जिवाणु संवर्धके व बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया  

रायझोबियम व पीएसबी या जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास  ग्रॅम थायरमची बुरशीरोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. मान्‍सुनचा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. अशी माहिती विद्यापीठाच्‍या बियाणे विभागाणे दिली आहे.

बीजतंत्र संशोधन केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
02452-220899 

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters