सध्या शेतकरी आधुनिक शेती बरोबरच विविध प्रकारचे फळे, भाजीपाला, पिके यांचे उच्च तंत्रज्ञान वापरून उत्पादन घेत आहे. बरेच शेतकरी सध्याच्या परिस्थितीत फळशेती व फूल शेतीकडे वळला आहे. फुल शेतीमध्ये झेंडू, गुलाब, तसेच जरबेरा, कार्नेशन इत्यादी फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. आज आपण पॉलिहाऊस मधील कार्नेशन लागवडीविषयी या लेखात माहिती घेऊ.
कार्नेशनला भरपूर सूर्यप्रकाश थंड व कोरडे हवामान मानवते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन पॉलिहाऊससाठी निवडावी. त्यानंतर शेणखत, बारीक लाल पोयटाच्या मातीने जमीन सपाट करून करून घेतल्यानंतर 100 सेंटिमीटर रुंद व 40 सेंटीमीटर उंचीचे गादीवाफे तयार करावेत. दोन गादी वाफ्यांमध्ये 50 सेंटिमीटर पेक्षा जास्त अंतर ठेवू नये. पॉलिहाऊसमध्ये ठिबक सिंचन यंत्रणा तयार करावी. याचा उपयोग पाणी देण्यासाठी, तापमान नियंत्रण व आद्रता नियंत्रणासाठी होतो. पॉलिहाऊसमध्ये टाकलेल्या मातीचे आणि गादीवाफे यांचे 100 प्रति चौ.मीटर क्षेत्राला दहा लिटर फॉरमॅलिन वापरून निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
अशाप्रकारे गादीवाफे तयार केल्यानंतर रोपांची लागवड सुरू करावी. लागवड करीत असताना जास्त खोलवर लागवड करू नये. तसेच दोन रोपांमधील अंतर 15 सेंटिमीटर पेक्षा जास्त असता कामा नये. लागवड करीत असताना रोपाच्या पिटचा1/4 भागच खड्ड्यात लावावा बाकीच्या3/4 बघायला माती लावावी. नंतर आठवडाभर पॉलिहाऊस बंद ठेवावे.
लागवड करत असताना काही मुद्दे लक्षात ठेवणे गरजेचे असते.
अ - गादीवाफे तयार करताना चांगल्या प्रतीचे लाल माती व शेणखत वापरावे. यामध्ये भाताचे तूस वापरण्यात विसरू नये.
ब - निर्जंतुकीकरण केल्यानंतर चांगला वाफसा आल्यानंतर लागवड करावी.
क - गादीवाफ्यावर ठिबकच्या लॅटरल व उपनळ्या यांची मांडणी व्यवस्थित करून घ्यावी.
ड - लागवड केल्यानंतर बुरशीनाशक द्रावण रोपांना द्यावे.
ई - आधारासाठी दोन जाळ्या लागवडीपूर्वी बसवून घ्याव्यात. लागवडीनंतर तीन आठवडे हलकेसे पाणी द्यावे.
रोपांना आधार देण्यासाठी
कार्नेशनच्या रोपांना आधाराची गरज असते, त्यासाठी जी आय तारेच्या चार जाळ्या एकावर एक बसवून घ्याव्यात. म्हणजे रोपांना चांगला आधार मिळेल. जाळीच्या प्रति चौरस मीटर क्षेत्रात कार्नेशनची 40 रोपे बसतात. त्यानंतर रोपांना पाणी देण्यासाठी ठिबक रोज 10 ते 15 मिनिटे चालू करावे व पाणी द्यावे. तेव्हा 40 ते 85 टक्के आद्रता असणे आवश्यक असते. लागवड केल्यानंतर 15 ते 25 सेंटिमीटर उंचीवर तीन ते चार आठवड्यांनी रोपाचा शेंडा खुडावा. त्यासाठी बाजूच्या फुटव्यांची वाढ होण्यास मदत होते व रोपांवर अनेक फुले लागतात. जेव्हा आपण शेंडे खुडतो त्याच्यानंतर प्रॉपर बाविस्तीनची फवारणी करावी.
कार्नेशनसाठी द्यायची खते
लागवडीच्या वेळेस प्रतीत 100 चौरस मीटर क्षेत्राला12:6:18 पाच किलो, कॅल्शियम नायट्रेट 2.5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 2.5 किलो पावशेर बोरॅक्स आणि 19: 19: 19 200 ग्राम वापरावे. नंतर दोन महिन्यांनी याच खतांचे प्रमाण थोडे कमी करून द्यावे. विद्राव्य खते ठिबक द्वारे द्यावेत.
कार्नेशन वर येणारे रोग व किडी
- मर व खोडकुज - नियंत्रणासाठी दोन ग्रॅम रिडोमिल तसेच बाविस्तीन दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी याची ड्रेंचिंग करावी. तसेच कोंब कूज आणि पानांवरच्या ठिपक्यांचा साठी दोन ग्रॅम कॅप्टन, डायथेन एम-45 एक ग्रॅम एक लिटर पाणी यांच्या द्रावणाच्या फवारण्या कराव्यात.
- मावा फुलकिडे, सुत्रकृमी, कळी पोखरणारी आळी यांच्या नियंत्रणासाठी 15 मिली न्यू ऑन, 5 मिली अंबुस, 1 मिली डायकोफॉल, 40 ग्रॅम नीम केक किंवा तीन मिलि सुजान प्रति एक लिटर पाणी यांचे फवारणी करावी.
काढणी
कळी पक्व दिसू लागतात जमिनीपासून वीस सेंटीमीटर अंतरावर दांड यांसह फुलांची काढणी करावी. सिल्वर थायो सल्फेट चा पाण्यामध्ये वापर करून त्या बादलीत फुलांचे दांडे ठेवावेत. दर दोन दिवसांनी फुलांची काढणी करावी. प्रति चौरस मीटरला 250 फुलांचे उत्पादन मिळते. तसेच काढणीनंतर रंग, दांड्यांची लांबी, आकारमान, अवस्था अशा बाबींचा विचार करून प्रतवारी करावी.
वीस फुलांचा बंद करून त्याला शीत गुंडाळावे. वीस फुलांचा बंच कोरूगेटेड बॉक्स मधून बाजारात पाठवावे.
Share your comments