डॉ. पंकज नागराज मडावी
“जिवो जिवोस्य जीवनम्” म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवावर जगतो. निसर्गामध्ये वावरणारे जीवजंतू हे सुद्धा एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे ते आपल्या भक्ष्याच्या शोधात असतात व त्यामुळेच निसर्गाचे संतुलन साधले जाते. सेंद्रिय शेतीमध्ये नेमका याच तत्वाचा उपयोग करून काही प्रमाणात कीड, रोग व खत व्यवस्थापन करता येते. आपण उन्हाळ्यात नांगरणी करतो. त्यामुळे बऱ्याच किडी ज्यांच्या काही अवस्था जमिनीत असतात त्यांचे उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे नियंत्रण करता येते.
काही बुरशीजन्य कीटकनाशके अत्यंत प्रभावी आढळून आले आहेत. ज्यामध्ये मेटॅरायझियम अॅनिसोप्ली, बेव्हेरीया बॅसियाना, नोमोरिया रिली, व्हरटीसिलीयम लेक्यानी, पॅसिलोमायसीस लील्यासिनस या बुरशींचा समावेश होतो, तर जिवाणूजन्य कीटकनाशकामध्ये बॅसीलस थुरोंजेनीसीस तर एच. एन. पी. व्ही. हा विषाणू कीड नियंत्रणात उपयोगात येत आहे.
मेटॅरायझियम या बुरशीमुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, हुमनी, बोंडअळी, खोडकिडा (ज्वारी) तर बेव्हेरीया या बुरशीमुळे मावा, ज्वारीवरील खोडकिडा, भातावरील काटेरी भुंगा, बोंडअळी, तुडतुडे, तंबाखुची पाने खाणारी अळी, नोमोरिया या बुरशीमुळे पतंगवर्गीय कीटक जसे बोंडअळी, उंटअळी तर व्हरटीसिलीयम लेक्यानी या बुरशीमुळे मावा, पांढरी माशी, फुलकिडे, कोळी आणि पॅसिलोमायसीस लील्यासिनस या बुरशीमुळे मुख्यत: पान व केळी पिकांवरील सुत्रकृमींचा बंदोबस्त करता येतो.
बुरशीजन्य कीटकनाशके फवारणी केल्यानंतर तोंडावाटे किंवा किडींच्या शरीरावाटे प्रवेश करून शरीरातजाळे तयार करून वाढत जाते, त्यामुळे किडींची वाढ खुंटते व अन्न खाणे बंद होते. किडीचे उच्चाटण झाल्यावर बीजाणूची पैदास होते व हेच बीजाणू नंतर दुसऱ्या किडीवर प्रादुर्भाव करतात. किडींप्रमाणे रोगनियंत्रण करण्यासाठी सुद्धा काही सुक्ष्म जिवांचा वापर करता येतो, त्यामध्ये प्रामुख्याने ट्रायकोडर्मा, बॅसीलस, सुडोमोनस, अॅस्परजिलस या सुक्ष्म जिवांचा अंतर्भाव होतो. मुख्यत: या सर्व सुक्ष्म जिवांचा वापर बिजप्रक्रिया करून त्याद्वारे बियांपासून व जमिनीतून पसरणाऱ्या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी होतो. त्यामध्ये रायझोकटोनिया द्वारे होणारी मुळसड, पिथियम द्वारे होणारे रोप कोलमडणे, फ्युजारीयम द्वारा होणारा मर रोग, स्क्लेरोशियम बुरशीमुळे होणारी कुज याचा प्रामुख्याने समावेश करता येईल परंतु आता या सुक्ष्म जिवाबाबत अधिक संशोधन होऊन बियांपासून पसरणारे मुळांना होणाऱ्या रोगांचाच नव्हे तर पिकांच्या इतर भागावर येणाऱ्या रोगांना अटकाव करण्यासाठी सुद्धा अश्या बुरशी अथवा जीवाणूचा वापर होत आहे त्यात प्रामुख्याने कपाशीवरील जीवाणू करपा या रोगाचा अटकाव सुडोमोनस या उपयोगी जीवाणूद्वारे करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे इतर ही पानावरील ठिपके या रोगाचे व्यवस्थापनासाठी या जीवाणूचा प्रभावीपणे वापर होत आहे. तसेच अॅम्पेलोमायसेस क्विसकॅलिस बुरशीचा वापर भुरी (पावडरी मिल्ड्यु) रोगाच्या नियंत्रणासाठी केला जातो.
इतकेच नव्हे तर काही सुक्ष्म जिवांचा उपयोग पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी होतो व त्यामुळे अनेक मुलद्रव्यांचा योग्य पुरवठा करता येतो. त्यामध्ये मुख्यत: रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर, अॅझोस्पायरीलम, स्फुरद विघटन करणारे सुक्ष्म जीव, निळे हिरवे शेवाळ यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.
रायझोबियम या जीवाणूची बिजप्रक्रीया शेंगवर्गीय पिकांना, नत्रपुरवठा करण्यासाठी होतो. परंतु एकच रायझोबियम सर्व पिकांना चालत नाही त्याचे सात गट आहेत.
१)चवळी गट – चवळी, भुईमुंग, तूर, मुंग, मटकी, उडीद, गवार, वाल इत्यादी.
२)वाटणा गट – वाटणा
३)हरभरा गट – हरभरा
४)घेवडा गट – घेवडा व राजमा
५)सोयाबीन – सोयाबीन
६)अल्फा अल्फा – ल्युसर्न गवत
७)बरसीम - बरसीम
अॅझोटोबॅक्टर या जीवाणूची बिजप्रक्रीया एकदल पिकासाठी करण्यात येते. उदा. गहू, ज्वारी, मका, बाजरी, त्याचप्रमाणे फळझाडे व फुलझाडे यासाठी सुद्धा याचा वापर करता येतो.
सधारणत: जैविकांची बिजप्रक्रीया २० ते २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात करावी व स्टीकर म्हणून गुळाचे द्रावण वापरावे, या जैविकांमुळे आपल्याला जवळपास २० टक्के पर्यंत उत्पादनात वाढ मिळते परंतु जैविक उत्पादने वापरतांना......
जैविक खत/ किटकनाशक, बुरशीनाशक गुणवत्ता योग्य असणे गरजेच आहे त्याला सधारणत: उत्पादन केल्यापासून ६ महिन्याचा कालावधी असतो, त्या कालावधीत त्याचा वापर होणे गरजेचे असते.
फवारणी तीव्र उन्हात करु नये, ह्यात जैविक घटक असल्याने फवारणीसाठी वातावरण पोषक असणे गरजेचे आहे.
फायदे –
मित्र कीड किंवा मित्र बुरशीचा नाश होत नाही.
फळे व भाजीपाला यावर विषारी घटक राहत नाही.
परदेशी बाजारपेठ मिळते.
किडीमध्ये प्रतिकारक शक्ती तयार होत नाही.
पिकांत वावरणाऱ्या पक्ष्यांवर विपरीत परिणाम होत नाही.
डॉ. पंकज नागराज मडावी, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण), मोबाईल क्र: ९५७९५२८५८४
Share your comments