1. कृषीपीडिया

खरिप पिकातील किफायतशीर आंतरपीक पद्धती व फायदे

आंतरपीक म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक पिके एकाच लागवड क्षेत्रावर एकाच हंगामात लागवड करणे होय. आंतरपीक पद्धती किंवा मिश्र पीक पद्धतीची शेती म्हणजे काही नवीन तंत्रज्ञान नाही. आपल्या पारंपरिक शेती पद्धतीला संशोधनाची जोड असून शेतक-यांच्या आर्थिक नफ्याला पूरक अशी पद्धत आहे.

KJ Staff
KJ Staff


आंतरपीक म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक पिके एकाच लागवड क्षेत्रावर एकाच हंगामात लागवड करणे होय. आंतरपीक पद्धती किंवा मिश्र पीक पद्धतीची शेती म्हणजे काही नवीन तंत्रज्ञान नाही. आपल्या पारंपरिक शेती पद्धतीला संशोधनाची जोड असून शेतक-यांच्या आर्थिक नफ्याला पूरक अशी पद्धत आहे. कृषी क्षेत्रामध्ये तरुणाईच्या वाढत्या सहभागामुळे शेतातील प्रयोगशीलता आणि नवनवीन उपक्रमशीलता रोज वाढताना दिसत आहे. याचाच भाग म्हणजे आंतरपीक पद्धतीतही खूप सारे प्रयोग होताना दिसत आहेत.

मात्र यात काही तांत्रिक ज्ञानांच्या अभावामुळेही ब-याच जणांची पिके फसलेली आहेत. म्हणून आंतरपीक घेताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. शास्त्र पद्धतीने अभ्यास करून प्रयोगाअंती मुख्य पिकाच्या किती ओळींनंतर आंतरपिकाच्या किती ओळी पेराव्यात म्हणजे अधिक आर्थिक नफा मिळतो, याचे संशोधना अंती निष्कर्ष काढले जातात आणि अधिक आर्थिक नफा देणाऱ्या आंतरपीक पद्धतीची शिफारस केली जाते. अशा पद्धतीने पेरणी केलेल्या शेताचे जवळपास ७० ते ८० टक्के क्षेत्र मुख्य पिकाखाली तर २० ते ३० टक्के क्षेत्र आंतरपिकाखाली असते.

आंतरपीक पद्धतीचे फायदे :

१) मुख्य पिकामध्ये कडधान्यवर्गीय पिकाचे आंतरपीक किंवा मिश्र पीक घेतल्यास बहुतेक कडधान्य वर्गीय पिकांच्या मुळांवर असलेल्या गाठींद्वारे वातावरणातील नत्राचे स्थिरीकरण होते. त्यामुळे जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण वाढून नत्रयुक्त रासायनिक खतांच्या मात्रेत बचत करता येते, तसेच जमिनीची सुपीकता टिकवता येते.

२) मुख्य पिकाची आणि आंतरपिकाची मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या थरांत वाढत असल्यामुळे आणि प्रत्येक पिकाची अन्नद्रव्याची गरज वेगवेगळी असल्यामुळे अन्नद्रव्ये, ओलावा इ. साठी तसेच उंची वेगवेगळी असल्यामुळे सूर्यप्रकाशाकरिता स्पर्धा होत नाही.

३) मुख्य पीक आणि आंतरपीक किंवा मिश्र पिकाचा जीवनक्रम पूर्ण करण्याच्या कालावधीत भिन्नता असल्यामुळे कापणी करणे सुलभ होते.

४) आंतरपीक किंवा मिश्र पिकांमुळे शेतकऱ्यांच्या विविध गरजा उदाहरणार्थ नगदी, तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य, जनावरांसाठी चारा, जळणाकरिता इंधन इत्यादी गरजा भागविल्या जातात.

५) नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास पूर्ण/सर्व पीक उद्ध्वस्त न होता किमान एका पिकाचे तरी उत्पन्न हाती लागते.

६) कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणाकरिता आंतरपीक/मिश्र पिकाची मदत होते.

७) वेगवेगळ्या कुटुंबातील पिकांची लागवड आंतरपीक पद्धतीने होत असल्यामुळे आपोआपच त्याच्याशी संलग्न असलेल्या तणांचा तसेच, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

८) सलग एकाच पिकाखाली शेती न ठेवता मुख्य पिकांमध्ये आंतर किंवा मिश्र पीक पद्धती अंमलात आणल्यास निव्वळ आर्थिक मिळकत अधिक मिळाल्याचे अनेक संशोधनपर प्रयोगावरून सिद्ध झाले आहे.

 


खरीप
हंगामात आंतरपीक म्हणून पिकाची निवड करत असताना घ्यावयाची काळजी

एकाच कुळातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिके एका क्षेत्रावर घेऊ नये.

» समान गरजा असणारी पिके टाळावीत

» एकसारख्या मुळया असणा-या पिकांची निवड आंतरपीक पद्धतीत करू नये.

» पिके ही वेगवेगळया उंचीची, वेगवेगळया आकाराची असावीत.

» आंतरपीक पद्धतीत लवकर पक्व होणारी व उशिरा पक्व होणारी पिके एकत्रितपणे निवडावी.

» आंतरपीक पद्धतीत एकतरी कडधान्य पीक असावे, त्यामुळे नत्र स्थिरीकरणास मदत होते.

» एकमेकांचा गंध, रंग, सहवास तिरस्कार करणारी पिके टाळावीत.

खरीप पिकातील आंतरपीक निवडताना तृणवर्गीय पीके जसे, ऊस, ज्वारी, बाजरी, मका, गहू; तंतुवर्गीय पिक जसे, कापूस, ज्यूट, बोरू यांमध्ये मूग, उडीद, चवळी, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, पोपटवाल, कुळीथ इ. पिकं, आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणून घेता येतात ऊसामध्ये आंतरपीक हे पट्टापेर पद्धतीने घेतात ऊसाच्या सहा ओळींनंतर दोन ओळी मोकळ्या सोडल्या जातात आणि त्यामध्ये कांदा, बटाटा, भाजीपाला, सोयाबीन, मिरची, उन्हाळी भुईमूग इ. आंतरपिके घेतात. संकरित किंवा अमेरिकन कापसाच्या दोन ओळींच्या मधोमध मूग, उडीद किंवा सोयाबीन या आंतरपिकाची एक ओळ म्हणजे, कापूस+मूग (१:१), कापूस+उडीद (१:१) किंवा कापूस+सोयाबीन (१:१) अशा पद्धतीने घेतात. या आंतरपीक पद्धतीमध्ये कपाशीखालील क्षेत्र कमी न होऊ देता मूग, उडीद किंवा सोयाबीन हे कमी कालावधीचे आंतरपीक घेता येते. तसेच कपाशीत तुरीचे आंतरपीक घेण्याची पद्धत परंपरागत चालत आली आहे परंतु; कापसात कापूस+ज्वारी+तूर+ज्वारी (६:१:२:१) ही त्रिस्तरीय पद्धत फायदेशीर आढळून आलेली आहे.

सोयाबीनमध्ये सुद्धा अशी त्रिस्तरीय आंतरपीक पद्धत सोयाबीन+ज्वारी+तूर, ६:२:१ किंवा ९:२:१ याप्रमाणे ओळीत घेता येते. तसेच, सोयाबीन या मुख्य पिकाच्या २ किंवा ६ किंवा ९ ओळींनंतर तूर या आंतरपिकाची एक ओळ पेरणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे आढळून आले आहे. तूर+मका ह्या आंतरपीक पद्धतीवर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापनासह घेतलेल्या संशोधन प्रयोगांमध्ये तूर+मका (४:१), याप्रमाणात पेरणी केल्यास निव्वळ आर्थिक मिळकत अधिक मिळाल्याचे आढळून आले आहे. भुईमुगाच्या पिकात आंतरपीक घ्यावयाचे झाल्यास, भुईमूग+सूर्यफूल (६:२), भुईमूग+तूर (६:१), भुईमूग+ज्वारी (६:२), भुईमूग+कापूस (६:१) ओळींच्या प्रमाणात घ्यावे. सूर्यफुलात तुरीचे आंतरपीक २:१ या प्रमाणात घेणे अधिक फायदेशीर आढळून आले आहे. तसेच तिळामध्ये आंतरपीक घ्यावयाचे झाल्यास तीळ+मूग (३:३), तीळ+सोयाबीन (२:१), तीळ+कपाशी (३:१) ओळी याप्रमाणे घेतल्यास अधिक आर्थिक उत्पन्न मिळते.

एरंडी पिकात आंतरपीक घ्यावयाचे झाल्यास, एरंडी+तूर (१:१), एरंडी+उडीद (१:२), एरंडी+भुईमूग (१:५) ओळींच्या प्रमाणात घ्यावे. रब्बी हंगामातील पिकांच्या बाबतीत, आंतरपिकासाठी गहू या पिकात मोहरीचे आंतरपीक ९:१ ओळींप्रमाणे घ्यावे करडी या पिकात हरभरा व जवस या आंतरपिकाची योजना ३:३ ओळींच्या प्रमाणात करता येते. अधिक आर्थिक मिळकतीसाठी जवस या पिकात हरभरा व करडीचे आंतरपीक ४:२ ओळींप्रमाणे घेता येते. जवस+मोहरी ५:१ ओळींच्या प्रमाणानुसार आंतरपीक पद्धतीसुद्धा फायद्याची आढळून आली आहे. आंतरपीक किंवा मिश्र पीक पद्धतीमध्ये, जमिनीची खोली व मगदुराचा विचार करून पेरणी करणे अत्यावश्यक आहे. खोल किंवा मध्यम खोल जमिनीत कपाशी + मूग किंवा उडीद (१:१), ज्वारी+मूग (३:३), तूर+मूग किंवा उडीद (१:२) किंवा (२:४), तूर+सोयाबीन (१:२) आणि कापूस+ज्वारी+तूर+ज्वारी (३:१:१:१) किंवा (६:१:२:१) या ओळींच्या प्रमाणात ठेवणे अधिक फायदेशीर ठरते. बाजरी+तूर यात ओळींचे प्रमाण १:१ ठेवावे. उथळ जमिनीवर मात्र बाजरी, ज्वारी, तीळ, कारळ किंवा कुळीथ ही पिकं एकेक पद्धतीने घ्यावीत.

आंतरपिकांचे जलसंधारणात महत्त्व :

मूलस्थानी जलसंधारण म्हणजे जागच्या जागी म्हणजेच शेतातल्या शेतात पावसाचे पाणी मुरवणे होय. कोरडवाहू शेतीमध्ये पावसाच्या पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणी अडवा-पाणी जिरवा हे तंत्रज्ञान फायद्याचे ठरते. (कपाशी+सोयाबीन) ही आंतरपीक पद्धती खोल मशागत करून उताराला आडवी पेरणी केल्यास पावसाच्या पाण्याचा अपधाव उथळ मशागतीपेक्षा १२.७४ टक्के कमी होता. तसेच जमिनीची धूप १७.७६ टक्क्यांनी कमी होते आणि सोयाबीन तसेच कापसाचे उत्पादन ३८.९५ टक्क्यांनी वाढते. म्हणजेच (कापूस+सोयाबीन) या आतंरपीक पद्धतीमुळे मृदा व जलसंधारणास मदत होते.

आंतरपिकांचे एकात्मिक कीड व्यवस्थापनात महत्त्व :

आंतरपीक / मिश्र पीक पद्धतीचे एकात्मिक कीड व्यवस्थापनात महत्त्वाचे स्थान आहे. विविध आंतरपीक व मिश्र पीक पद्धतीमुळे मुख्य पिकांवर येणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव टाळता येणे शक्य आहे. मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांमुळे अळ्यांचा प्रादुर्भाव कमी होतो. याच आंतरपिकांचा वापर, पक्षी थांबे म्हणून सुद्धा करतात आणि यावर बसून पिकातील अळ्या वेचून खातात.

 


आंतरपिकाचे
आपत्कालीन पीक नियोजनात महत्त्व :

पाऊस वेळेवर येणे, न येणे, मध्येच मोठी उघडीप पडणे, पाऊस उशीरा येणे तसेच, पाऊस सारखा लागून पडल्यास अशा परिस्थितीत आंतरपीक पद्धती फायद्याची ठरते. त्याकरिता,  आंतरपीक पद्धती अंमलात आणावी नियमित पावसाळा दोन किंवा तीन आठवडे सुरु झाल्यास म्हणजेच २ ते १५ जुलै दरम्यान सुरु झाल्यास, कपाशीत मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा आणि संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता, थोड्या थोड्या क्षेत्रावर ही पिके घ्यावीत. काही क्षेत्रावर, (कापूस+ज्वारी+तूर+ज्वारी) ६:१:२:१ किंवा ३:१:१:१ या ओळींच्या प्रमाणात घ्यावी. त्यामुळे एकूण उत्पादन आणि उत्पन्नात अधिक फायदा होतो. सोयाबीन पिकात २, ६ किंवा ९ ओळींनंतर १ ओळ तुरीची आपल्या सोयीनुसार घ्यावी. नियमित पावसाळा पाच आठवड्यांपेक्षा जास्त उशीरा सुरु झाल्यास म्हणजेच, २३ ते २९ जुलै दरम्यान पाऊस आल्यास, कापसाची पेरणी करणे टाळावे. परंतु, काही क्षेत्रावर कपाशी पेरणे अनिवार्य असल्यास केवळ देशी कपाशीचे सरळ आणि सुधारित वाण वापरावे. तसेच, कापसाच्या ओळींची संख्या कमी करून एक किंवा दोन ओळी तुरीच्या आवर्जून घ्याव्यात, तसेच; इतर पिकांत सुद्धा तुरीचे आंतरपीक घ्यावे.

लेखक - 

स्वाती कदम(विषय विशेषज्ञ , कृषी विद्या )

कृषि विज्ञान केंद्र, जळगाव

English Summary: Beneficial intercropping methods and benefits of kharif crop Published on: 28 July 2020, 11:07 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters