देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बांधवांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक पिके घेणे तसेच त्याच जमिनीवर प्रति हेक्टरी उत्पादन वाढविणे अनिवार्य आहे. परंतु असे असले तरी ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे, त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे. दिवसेंदिवस जमिनीची उपजाऊक शक्ती कमी होत आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेल्या आहेत. शेतजमिनीची भौतिक, रासायनिक व जैविकदृष्टय़ा अपरिमित हानी होत आहे.. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे.
गांडूळखतासाठी गांडुळाच्या योग्य जाती.
गांडूळांच्या 300 हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने ईसिना फोइटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या गांडूळांच्या महत्त्वाच्या आणि योग्य जाती आहेत. या जातीची वाढ चांगली होऊन त्या खत तयार करण्याची प्रकिया 40 ते 45 दिवसात होते.इसिनीया फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सें.मी. असते. एका किलोमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडुळे बसतात. अशी एक हजार गांडूळे घेवून त्यांची अनुकुल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याएंशी हजार होते. पिले व प्रौढ गांडुळे एका किलोमध्ये दोन हजार बसतात. शंभर किलो प्रौढ गांडुळे महिन्याला एक टन गांढूळखत तयार करतात.
गांडूळ खतामध्ये नत्र ,स्फुरद व पालाश यांचे प्रमाण
गांडूळ खत तयार होण्यास 40 ते 45 दिवस लागतात. त्यामध्ये मुख्यत्वाने नत्र स्फुरद व पालाश पोषक तत्व अधिक प्रमाणात असतात.
नायट्रोजन.(N) 2.5-3.0टक्के
फाॅस्फरस (P) 1.8-2.2टक्के
पोटॅश (K) 1.5-2.2 टक्के
अ) माती च्या दृष्टिने
गांडूळामुळे जमिनीचा पोत सुधारतो
मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
गांडूळामुळे जमिनीची धूप कमी होते.
गांडूळांच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते.
जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते.
जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.
बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
जमिनीचा सामू ( पी.एच.) योग्य पातळीत राखला जातो.
गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.
गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत भरपूर वाढ होते.
ब) शेतकयांच्या दृष्टीने फायदे
इतर रासायनिक खतावर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल.
जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.
पाणी देण्याचा कालावधी कमी होतो
झाडांना, पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळणारे उत्पादन जास्त व चांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते.
रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत.
मजूर वर्गावर होणारा खर्च कमी.
गांडूळखत निर्मितीमुळे ग्रामीण भागात बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलबध होते.
क) पर्यावरणाच्या दृष्टीने फायदे
माती, खाद्य पदार्थ आणि जमिनीतील पाण्याच्या माध्यमाद्वारे होणारे प्रदुषण कमी होते.
जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होते.
पडीक जमिनीची धूप व क्षाराचे प्रमाण कमी होते.
रोगराईचे प्रमाण कमी होऊन आरोग्य चांगले राहाते.
कच-याच्या विल्हेवाटीने आरोग्यासंदर्भाचे प्रश्न कमी होतात.
ड) इतर उपयोग
गांडूळापासून किंमती अमिनो ऍसिड्स, एंझाईमस् आणि मानवासाठी औषधे तयार करता येतात.
पक्षी, कोंबडया, पाळी जनावरे, मासे यांना उत्तम प्रती खाद्य म्हणून गांडूळ वापरता येतात.
आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी उपयोग होतो.
पावडर, लिपस्टिक, मलमे यांसारखी किमती प्रसाधने तयार करण्यासाठी गांडूळांचा वापर केला जातो.
परदेशात पिझाज, आमलेट, सॅलेड यासारख्या खाद्य वस्तूमध्ये प्रथिनांची कमतरता भरुन काढण्यासाठी गांडूळांचा उपयोग करतात.
गांडूळांच्या कोरडया पावडरमध्ये ६० ते ६५ टक्के प्रथिने असतात. तिचा अन्नात वापर करता येतो.
Share your comments