महाराष्ट्र ही कृषिप्रधान भूमी… आणि या भूमीच्या संस्कृतीत बैलाचे स्थान अनन्यसाधारण आहे. शेतकरी राजा आपल्या श्रमाचा खरा सोबती मानून बैलाला कुटुंबातील सदस्यासारखं जपतो. याच नात्याचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्रात दरवर्षी बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना स्नान घालतो, रंगीबेरंगी सजावट करतो, गोडधोड खाऊ घालतो आणि ढोल-ताशांच्या गजरात बैलांची मिरवणूक काढतो. हा सोहळा केवळ परंपरेचा भाग नसून, कृतज्ञतेची जाणीव आहे. कारण बैल हा फक्त शेतीतील प्राणी नाही, तर शेतकऱ्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
आजच्या काळात शेतीचं आधुनिकीकरण झालं आहे. ट्रॅक्टर, यंत्रसामग्री शेतात आली आहे. मात्र, बैलाचं महत्व कमी झालेलं नाही. ट्रॅक्टर काम करतो, पण मातीशी जिव्हाळा जपतो तो बैल. आधुनिक यंत्रांमुळे कर्जाचं ओझं वाढतं, पण बैल शेतकऱ्याचा खरा साथीदार ठरतो.
वाढत्या शेती खर्चाच्या आणि अनिश्चित बाजारभावाच्या संकटात शेतकरी अनेकदा अडचणीत येतो. तरीही बैलाच्या पावलावर पाऊल ठेवून तो शेतात उभा राहतो. त्यामुळेच बैलपोळा हा दिवस शेतकऱ्याच्या मनातील बैलाविषयीचं प्रेम, आदर आणि विश्वास व्यक्त करणारा उत्सव ठरतो.
म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं-
“शेतकरी राजा आणि त्याचा बैल, हीच खरी महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीची ताकद आहे.”
लेखक- नितीन रा.पिसाळ
कृषि अभ्यासक, फार्मर द जर्नलिस्ट, कृषि जागरण
Share your comments