बटाटा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनात भरीव वाढ होते. यासाठी बटाटा व बेणे प्रक्रिया, खत व पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, बटाटा काढणी आणि एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाच्या माहितीचा या लेखात समावेश केला आहे.महाराष्ट्रात बटाटा पिकाची लागवड रब्बी हंगामात सर्वच जिल्ह्यांत कमी-जास्त प्रमाणात आढळून येते. मात्र, खरीप हंगामात या पिकाची लागवड पुणे, सातारा व अहमदनगर या जिल्ह्यांतील काही ठराविक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर होते. महाराष्ट्र राज्यात बटाट्याचे बियाणे निर्माण केले जात नाही. उत्तर भारतातून आणलेल्या बियाणावरच शेतकर्यांना अवलंबून राहावे लागते. व्यापारी हे बियाणे राज्यात आणून वेगवेगळ्या नावांनी शेतकर्यांना विक्री करतात. बियाणे प्रमाणित आहे किंवा नाही याचीही कल्पना येत नाही. यामुळे जर आपण बटाट्याचे पीक घेत असला तर तुम्ही स्वत: बेणे प्रक्रिया करावी.
बटाटा बेणे व बेणे प्रक्रिया :
बटाटा बेणे हे प्रमाणित कीड व रोगमुक्त असावे. शक्यतो बटाटा बेणे हे सरकारी यंत्रणेकडूनच खात्रीशीर असे पायाभूत (फाऊंडेशन) किंवा सत्यप्रत असलेले वापरावे. किंवा राष्ट्रीय बीज निगम (नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन), महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्या प्रतिनिधींकडून आगाऊ नोंदणी करून बटाटा बेणे खरेदी करावे. शीतगृहात बटाटा बेणे ठेवलेले असल्यामुळे ते लागवडीपूर्वी ७-८ दिवस पसरट व हवेशीर जागी मंद प्रकाशात चांगले कोंब येण्यासाठी ठेवणे आवश्यक असते. बटाटा बेणे ३० ते ४० ग्रॅम वजनाचे व ५ सें.मी. व्यासाचे असावेत. बटाटा बेणे प्रक्रियेसाठी २५ ग्रॅम कार्बेन्डेझिम व रस शोषण करणाऱ्या किडींसाठी लागवडीपूर्वी इमिडॅक्लोप्रिड २०० एस. एल. मिनीटे बुडवून घ्यावे. लागवडीपूर्वी २-५ किलो अॅझेटोबॅक्टर आणि ५०० मिली द्रवरूप अॅझेटोबॅक्टर प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून बियाणे १५ मिनीटे बुडवून बीजप्रक्रिया करावी. नंतर सदर बियाणे थंड, हवेशीर ठिकाणी पसरून ठेवावे.
लागवडीचा हंगाम :
हंगाम लागवडीची वेळ काढणीची वेळ खरीप जून अखेर ते जुलैचा पहिला आठवडा सप्टेंबर-ऑक्टोबर रब्बी ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबरचा दुसरा आठवडा फेब्रुवारी-मार्च
खत व्यवस्थापन :
बटाटा पिकास लागवडीपूर्वी १५ ते २० टन प्रति हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत द्यावे. पिकास १५० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि १२० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. यामध्ये लागवडीच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा, तर पालाश आणि स्फुरदाची पूर्ण मात्र द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा लागवडीनंतर एका महिन्याने भर देताना द्यावी.
पाणी व्यवस्थापन :
बटाटा पिकाचे अधिक व अपेक्षित उत्पादन येण्यासाठी पाणी व्यवस्थापनाचा सिंहाचा वाटा आहे. बटाट्यास पाण्याची एकूण गरज जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५० ते ६० सें.मी. एवढी आहे. सरी वरंबा पद्धतीने रानबांधणी केल्यास पाण्याची बचत होऊन बटाट्याचे उत्पादन जास्त मिळते. लागवडीनंतरचे हलके (आंबवणी) पाणी द्यावे. नंतर ५-६ दिवसांनी पाण्याची दुसरी पाळी वरंबा २/३ उंचीपर्यंत भिजेल अशा पद्धतीने द्यावे. पीकवाढीच्या संवेदनक्षम अवस्थांना पाण्याचा पुरवठा होणे अत्यावश्यक असते, अन्यथा पीक उत्पादनात लक्षणीय घट येते. बटाटा या पिकाच्या तीन संवेदनक्षम अवस्था पुढीलप्रमाणे आहेत :
१) रोपावस्था : ही अवस्था लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी येते. यावेळी जमिनीत पुरेशी ओल नसेल तर पिकाची वाढ चांगली होत नाही.
२) स्टोलोनायझेशन : या अवस्थेत बटाटे तयार होण्यास सुरुवात होते. ही अवस्था लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांनी येते. या अवस्थेस पाण्याचा ताण बसल्यास बटाट्यांची संख्या, आकार कमी होतो व उत्पादन खूपच कमी येते.
३) बटाटे मोठे होण्याची अवस्था : ही अवस्था लागवडीनंतर ७० ते ७५ दिवसांनी प्राप्त होते. या अवस्थेस पाण्याच्या कमतरतेमुळे बटाटे खूप लहान राहतात. परिणामी, उत्पादन घटते.
पाणी व्यवस्थपानासाठी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब :
अवर्षणप्रवण क्षेत्रांतील मध्यम खोल जमिनीत बटाट्याच्या अधिक उत्पादनाकरिता व अधिक नफा मिळवण्याकरिता रब्बी बटाट्याची लागवड तुषार सिंचनाखाली करावी. याकरिता तुषार सिंचनाद्वारे २५ मि.मि. पाणी बाष्पीभवन झाल्यावर ५-८ दिवसांनी) ३५ मि. मी. पाणी प्रत्येक पाळीस द्यावे. या पद्धतीमुळे आपण पिकाच्या गरजेनुसार पाणी देऊ शकतो आणि त्यामुळे पिकाची वाढ जोमदार तर होतेच, तसेच बटाटेदेखील चांगले पोसतात. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमिनीत नेहमीच वाफसा राहत असल्याने पिकास दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होतात व उत्पादनात वाढ होते.
आंतरमशागत : बटाटा लागवडीनंतर ५ ते ६ दिवसांनी जमीन वाफश्यावर असताना बटाटा पिकामध्ये उगवणाऱ्या तणांच्या बंदोबस्तासाठी मेट्रीबेंझीन २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात या तणनाशकाची जमिनीवर फवारणी करावी.
लागवडीनंतर साधारणत: २५ ते ३० दिवसांनी बटाटा पिकाच्या वरंब्यास मातीची भर द्यावी. यामुळे बटाट्याचे हिरवे होण्याचे प्रमाण कमी होते. यावेळी उर्वरित नत्राचा दुसरा हप्ता म्हणजेच ७५ किलो नत्र प्रतिहेक्टर द्यावे.
बटाटा काढणी : काढणीपूर्वी ८ ते १० दिवस पाणी देऊ नये. बटाटे काढणी पोटॅटो डिगरने करावी. काढणीनंतर बटाटे शेतात पडू न देता गोळा करून सावलीत आणावेत. आकारमानानुसार प्रतवारी करून ते जाळीदार पोत्यात भरून बाजारात विक्रीसाठी किंवा शीतगृहात साठवणीसाठी पाठवावेत.
एकात्मिक कीड व रोगनियंत्रण
- २-३ दिवसांतून पिकाचे सर्वेक्षण करा.
- बटाटा पिकावर रसशोषण करणार्या किडींच्या नियंत्रणासाठी स्पायरोमायसीफेन (२४० एससी) १० मिलि किंवा थायामेथॉकझम (२५ ई.सी.) ८ मिली किंवा अॅसिटामीप्रीड २-३ ग्रॅम किंवा डायमिथोएट (३० टक्के) १५ मिली प्रति १० लिटर पाणी. यांच्यापैकी एका कीटकनाशकाची गरजेनुसार १५ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी.
- पिवळ्या रंगाचे चिकट सापळे प्रत्येक ४-५ ओळींनंतर लावावेत.
- लवकर येणारा करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास पाण्यात मिसळणारी भुकटी मॅन्कोझेब (७५ टक्के) या बुरशीनाशकाची २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- उशिरा येणाऱ्या रोगासाठी मॅन्कोझेब (७५टक्के) २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० टक्के) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून पहिली फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त आढळल्यास मेटॅलॅक्झिकल (८८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के) हे संयुक्त बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे दुसरी फवारणी करावी.
लेखक -
श्री. गजानन शिवाजी मुंडे
कृषी सहाय्यक, (उद्यानविद्या विभाग)
कृषी महाविद्यालय नागपूर. (डॉ.पं.दे.कृ.वि. अकोला)
ई.मेल.munde007@rediffmail.com
प्रा. शुभम विजय खंडेझोड
(सहायक प्राध्यापक) उद्यानविद्या विभाग,
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव.
ई. मेल. shubhamkhandezod4@gmail.com
प्रा.मयूर बाळासाहेब गावंडे
सहायक प्राध्यापक (उद्यानविद्या विभाग)
श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती.
Share your comments