पपई ही आरोग्यास पोषक असून मुळव्याध, अपचन, बध्दकोष्टता, यकृत प्लीहाचे विकार, डोळ्याचे विकार, त्वचारोग इत्यादी रोगावर गुणकारी आहे. झाडांपासून वर्षभर फळे मिळतात. परंतु दूरच्या मार्केटमध्ये माल पाठविताना फार दिवस टिकत नाही. त्यासाठी पपईवर प्रक्रिया करणे जरूरीचे आहे. पपईपासून जॅम, सरबत, मार्मालेड, टूटीफ्रुटी, केक, पेपेन असे पदार्थ बनवून दूरच्या मार्केटला तसेच निर्यात देखील करता येतात.
पपई पासून बनविले जाणारे मुल्यवर्धीत पदार्थ:
पपई जॅम
पपईपासून जॅम बनविण्यासाठी पुर्ण पक्व झालेल्या फळांचा 1 किलो गर + साखर 750 ग्रॅम + सायट्रीक एसिड 9 ग्रॅम लागते. सुरुवातीला पक्व फळे पाण्याने स्वच्छ धुवून चाकूने कापून बी वेगळे करावे. फळाची साल बाजूला काढून गर व्यवस्थित मिक्सरमध्ये एकजीव करावा व त्यामध्ये साखर व सायट्रीक एसिड घालून मंद अग्नीवर 103 डी. सें. तापमानापर्यंत गरम करावे. त्यातील प्रवाही पाण्याचा अंश संपला (या वेळी मिश्रणाचा टिएसएस 68.5 टक्के असतो) की जॅम तयार झाला असे ओळखावे. नंतर अग्नीवरून खाली उतरवून थोडा थंड झाल्यावर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरण्यामध्ये जॅम भरून बरणीवर थोडे मेण (पॅराफिन वॅक्स) ओतावे. अशा रितीने उत्तम प्रतीचा टिकावू जॅम तयार होतो. बरण्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात.
पपईचे सरबत
पपईपासून सरबत बनविण्यासाठी अर्धपक्व पपई, चिमुटभर जिरे, आवश्यकतेनुसार साखर, दोन कप दूध, थोडे मीठ व थोडे केशर या प्रमाणात साहित्य घ्यावे. प्रथम पपई चुलीवर किंवा गरम राखेत करपणार नाही अशी भाजून घ्यावी. नंतर तिची साल काढून गराचे तुकडे करावेत. हे तुकडे चाळणीवर चिरडून गाळून घ्यावेत. त्यामध्ये पाणी, साखर, भाजलेल्या जिर्याची पूड, मीठ व केशर टाकून ढवळून घ्यावे. तयार झालेला सरबत थंड झाल्यावर काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवावा.
टुटीफ्रुटी
टुटीफ्रुटी बनविण्यासाठी कच्च्या पपईच्या गराचे चौकोनी तुकडे 1 किलो + साखर 1 किलो + पाणी 1 लिटर (पाकासाठी) + पाणी अर्धा लिटर (चुन्यासाठी) + चुना 4 टी-स्पून + सायट्रिक एसिड 1 टी-स्पून + रंग आवडीप्रमाणे घ्यावे. प्रथम चुना, पाणी एकत्र करून त्यामध्ये पपईचे तुकडे अर्धा तास ठेवावेत. नंतर दुसर्या 2-3 वेळा धुवून पांढर्या मलमलच्या कापडात बांधून 3 ते 5 मिनीटे वाफवून घ्यावे. नंतर हे तुकडे थोडा वेळ थंड पाण्यात ठेवावेत. साखरेचा एक तारी पाक करून गाळून घ्यावा व त्यामध्ये हे तुकडे पुर्ण एक दिवस ठेवावेत. नंतर तुकडे वेगळे करून पाक दोन तारी होईपर्यंत उकळावा. उकळताना त्यात सायट्रिक एसिड मिसळावे. नंतर पाक गाळून घेऊन थोडा थंड झाल्यावर त्यात तुकडे मिसळून 2-3 दिवस ठेवावेत. तुकड्यांमध्ये पाक चांगला शिरल्यावर ते तुकडे पाकातून काढून वाळवावेत. तयार झालेली टुटीफ्रुटी बरणीत भरून ठेवावी.
पपई केक
केक बनविण्यासाठी पिकलेल्या पपईचे घट्ट तुकडे 500 ग्रॅम, साखर 3 कप, तूप 1 कप, अंडी 3, मैदा 3 कप, खाण्याचा सोडा 1 चमचा, बेकिंग पावडर अर्धा चमचा, मीठ पाव चमचा, व्हॅनिला (इसेन्स) 1 चमचा, दालचिनी, लवंगा, जायफळ प्रत्येकी पाव चमचा घ्यावे. प्रथम साखर व तूप एकत्र गोटून त्यात अंड्याचा बल्क व पपईचे तुकडे चांगले मिसळावेत, नंतर तुपाने किंवा डालड्याने आतून गुळगुळीत केलेल्या भांड्यात 10 मिनीटे 160 डी. सें. तापमानपर्यंत भाजून नंतर 135 डी. सें. तापमानापर्यंत खाली आणून 35 मिनीटांपर्यंत भाजून घ्यावे. भाजल्यानंतर केकच्या भांड्यात काढून केक थंड होऊ द्यावा.
लेखक:
प्रा. डॉ. पवार व्ही. एस. व श्री. कटके. एस. डी
(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Share your comments