आवळा आपल्या सगळ्यांना परिचित आहे. आवळ्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. आवळ्यामध्ये क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते. आवळ्यात लोहाचे प्रमाण देखील जास्त आहे.
आवळ्या मध्ये असलेल्या पोषण मूल्यांमुळे माणूस निरोगी राहतो तसेच आवळा हा त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे. अशा या आरोग्यदायी आवळा पासून विविध प्रकारची प्रक्रिया मुक्त पदार्थ तयार केले जातात. त्याबद्दलची माहिती या लेखात जाणून घेऊ.
- आवळाकॅन्डी:
आवळा कॅण्डी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –एक किलो आवळे 750 ग्रॅम साखर, 250 ग्रॅम पिठीसाखर.
कृती – अगोदर निवडलेले आवळे स्वच्छ धुवून घ्यावेत व पुसून स्वच्छ करावेत. त्यानंतर पाणी गॅसवर ठेवून एक उकळी आल्यानंतर त्यात आवळे टाकावेत. आवळे फुटायला लागेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यावेत व त्यानंतर आवळे थंड होऊ द्यावेत आणि आवळे पूर्ण थंड झाल्यानंतर आवळ्यांच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात. या पाकळ्या भांड्यात काढून त्यावर साखर ओतावी. आता हे भांडे पुढील दोन दिवस उन्हात राहू द्यावे. तिसऱ्या दिवशी आवळे पूर्णपणे पाकाचा तळाशी जातील. आता हा पाक चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यावा. वर उरलेल्या कडी उन्हात अजून दोन ते तीन दिवस वाळवायला ठेवाव्यात. पूर्णपणे वाळल्यावर अधिक गोड हवे असल्यास कॅण्डी वर पिठीसाखर चोळावी. वाळलेल्या कॅंडी हवाबंद डब्यात भराव्यात.
- आवळा सुपारी:
साहित्य – एक किलो आवळे, 40 ग्रॅम मीठ.
कृती- पूर्णपणे वाळलेले पक्व आवळे निवडावेत. हे आवळे स्वच्छ पाण्यात दोन तीन चार मिनिटे उकळत्या पाण्यात टाकून थंड करावेत. या फळाचे तुकडे करावेत किंवा किसणी च्या सहाय्याने कीस काढावा. या कीसात 40 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात घेऊन मिसळावे. त्यानंतर यंत्रात सुपारी वाळवावी.
- आवळाचटणी:
चांगले मोठे, डाग नसलेले आवळे कुकरमध्ये उकडून घ्यावेत. बिया व शिरा काढून घ्याव्यात. हाताने नीट कुस्करावे किंवा किसण्याचे किसून घ्यावेत. चवीप्रमाणे त्यात मीठ, तिखट, जिरेपूड आणि गुळ किसून मिसळावा.नीट एकजीव करून वरून मोहरी, हिंग व हळदीची खमंग फोडणी द्यावी आणि परत सर्व एकत्र करावे.
- आवळा सरबत
साहित्य -आवळ्याचा रस एक लिटर,साखर एक किलो, सायट्रिक ॲसिड अर्धा चमचा, पोटॅशियम ॲसिड अर्धा चमचा
कृती – सर्वप्रथम आवळे शिजवून घ्यावेत. त्यानंतर त्यातील बिया काढून टाकाव्यात व त्या आवळ्याच्या फोडी मिक्सरमध्ये टाकून चांगले पातळ असे मिश्रण तयार करावे. गॅसवर एका पातेल्यात एक लिटर पाणी घ्यावे. त्यात साखर व सायट्रिक ऍसिड एकत्र करून टाकावे. एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून हे सिरप गार झाल्यावर त्यात आवळ्याचा रस मिक्स करावा. अर्धा चमचा पोटॅशिअम मेटाबाय सप्लाइडघालावे व शिरा बाटलीत भरताना गाळून घ्यावे.
Share your comments