1. कृषी प्रक्रिया

नाचणीचे प्रक्रियायुक्त पदार्थ वाट स्वयंरोजगाराची

KJ Maharashtra
KJ Maharashtra
ragi

ragi

नाचणी हे एक मुख्य अन्नधान्य पिक आहे. महाराष्ट्रामध्ये नाचणीचे उत्पादन कोकण प्रांतात तसेच नाशिकच्या पेठ आणि सुरगाणा भागात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. नाचणी हे पिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. नाचणीलाच बोली भाषेत नागली किंवा रागी असे संबोधतात. आपल्या रोजच्या आहारात नाचणीची भाकरी खायची झाल्यास अगदी  लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत सगळेच नाक मुरडतात. कारण तिच्या काळा रंगामुळे ती अनेकांना आवडत नाही परंतु नाचणीवर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ तयार केल्यास त्याचा आपणाला रोजच्या आहारात वापर करता येईल. 

नाचणीपासून फायदे:

 • नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिने, तंतुमय पदार्थ व इतर खनिजे मुबलक आहेत.
 • नाचणीमध्ये मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक तंतुमय पदार्थाचे प्रमाण जास्त आहे.
 • नाचणी पचनास हलकी आहे.
 • नाचणीमध्ये कर्बोदके भरपूर प्रमाणात आहे आणि स्निग्ध पदार्थ अतिशय कमी असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
 • नाचणीच्या सेवनामुळे रक्ताक्षय कमी होण्यास मदत होते.
 • नाचणीचा रोजच्या आहारात समावेश केल्यास उच्च रक्तदाब टाळला जावू शकतो. रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रणात येते.
 • नाचणीमध्ये कॅल्शियम सर्वात जास्त असल्याने हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे तसेच लेसिथिन आणि मिथीओनाईन या अॅमिनो आम्लामुळे पित्त कमी करण्यासाठी व यकृतामधील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत होते.
 • नाचणी थंड असल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

नाचणी पासुन विविध प्रक्रिया पदार्थ:

१) नाचणी सत्व:

नाचणी सत्व बनवितांना नाचणी रात्रभर पाण्यात भिजत घालावी, मग निथळून फडक्यात बांधून ठेवावी. तिला बारीक बारीक मोड येतात. मोड आले कि सावलीत वाळवावी आणि दळून आणावी. ते झाले नाचणी सत्व तयार.

२) नाचणीचे लाडू:

साहित्य: नाचणी पीठ दोन वाटी, तुप पाऊण वाटी, गूळ पाऊण वाटी

कृती:

 • कढई मध्ये तूप टाकून नाचणी चे पीठ भाजून घ्या. आणि थंड होऊ दया
 • गुळाचा पाक करून घ्या व त्यात भाजलेले पीठ टाकून लाडू वळून घ्यावे. 

टिप : आपल्या आवडीप्रमाणे यात स्वादाला जायफळ, वेलची, केशर, चिमुटभर सुंठ, चिमुटभर लवंगाची पूड घालावी.

हेही वाचा:कमी खर्चात करा बटाटा प्रक्रिया उद्योग, अग्रेसर व्हाल आर्थिक प्रगतीच्या मार्गावर

३) नाचणीचा डोसा:

साहित्य: नाचणी पीठ दिड वाटी, उडीद डाळ अर्धीवाटी, तांदळाचे पीठ अर्धी वाटी, मेथीचे दाणे एक चमचा, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, मीठ चवीनुसार.

कृती:

 • डाळ आणि मेथी दाणे रात्री भिजत घालावे. दुसऱ्या दिवशी दोन्हीमधील पाणी काढून मिक्सरला बारीक वाटून घ्यावे.
 • डाळ व वाटलेली सर्व पीठ मिसळून सरबरीत डोश्याच्या पिठाप्रमाणे रात्री पीठ भिजवून ठेवावे.
 • सकाळी मीठ, कांदा, कोथिंबीर घालून डोसा किंवा उत्तप्पा करावेत.
 • कांदा, कोथिंबीर न घालता प्लेन डोसे नॉनस्टिक तव्यावर करावेत. अथवा कोथिंबीर, कांदा, टोमॅटो घालून थोड्या तेलावर उत्तपे करावेत.

४) नाचणीची इडली:

साहित्य: नाचणी चार वाटी ,उडीद डाळ एक वाटी, मीठ चवीनुसार

 कृती:  

 • नाचणी व उडीद डाळ रात्री वेगवेगळे भिजत घालावे. नंतर ते मिक्सरला बारीक फिरवावे. दोन्ही मिश्रण एकत्र करून चार ते पाच तास भिजून ठेवावे.त्या मिश्रणात चवीपुरते मीठ घालावे.
 • त्या नंतर इडली पात्राला तेल लावून त्यामध्ये मिश्रण टाकावे. दहा मिनिटांनी इडली तयार.

५) नाचणीचे पापड:

साहित्य: नाचणी पीठ १ किलो, पापडखार ३० ग्रॅम, २ ते ३ टीस्पून हिंग, पाऊण वाटी मीठ

 कृती:

 • नाचणी धुवून चांगली वाळवावी व दळून आणावी.
 • पिठात हिंग, पापडखार, मीठ चांगले मिक्स करुन घ्यावे.
 • जेवढे नाचणीचे पीठ तेवढेच पाणी उकळत ठेवावे.
 • पाण्याला उकळी आल्यावर पीठ घालून चमच्याने चांगले एकत्र करावे व मंद आचेवर १२ मिनिटे वाफ आणावी.
 • लगेच पीठ परातीत घेऊन गरम पाण्याच्या हाताने चांगले मळावे व गोळ्या करुन पापड लाटावेत.

टिप : पापड तिखट हवे असल्यास अर्धी वाटी मिरची पावडर घालावी.

हेही वाचा:बेरोजगार युवकांसाठी मत्स्यपालनातील व्यवसायिक संधी

६) नाचणी अंबिल पेय:

साहित्य: नाचणी पीठ एक वाटी, गूळ एक वाटी, मीठ चवीनुसार आणि पाणी.

कृती:

 • प्रथम एका भांड्यामध्ये गुळाचा पाक करुन घ्यावा.
 • नंतर त्यामध्ये नाचणीचे पीठ चांगले मिक्स करुन घ्यावे.
 • हे मिश्रण थंड पाण्यामध्ये मिक्स करुन चांगले उकळावे. गरम खायला द्यावे

७) सकस नाचणी सत्त्वाची लापशी:

नाचणी मध्ये भरपुर प्रमाणात अ जीवनसत्त्व आणि लोह असते. लापशी पिल्याने शरीराला आलेली मरगळ निघून जाते. लहान मुलांसाठी तर खुपच उत्तम आहे.

साहित्य: मीठ, ताक, दोन चमचे नाचणी सत्त्व.

कृती: ताकामध्ये दोन चमचे नाचणी सत्त्व आणि चवीपुरते मीठ मिसळून उकळी येईपर्यंत किंवा ताक गाढे होईपर्यंत उकळावे.

८) नाचणी केक:

साहित्य: नाचणी पीठ २०० ग्रॅम, साखर १००लोणी २०० ग्रॅम, ४ अंडी, पाणी, काजू आणि वेलची चवीनुसार.

कृती:

 • प्रथम एका भांड्यामध्ये नाचणीचे पीठ आणि पाणी चांगले मिक्स करुन घ्यावे.
 • नंतर त्यामध्ये साखर आणि लोणी टाकून त्याची पेस्ट करुन घ्यावी.
 • एक चमचा वेलची पावडर टाकून ते चांगल्याप्रकारे परत मिक्स करुन घ्यावे.
 • दुसरे एक भांडे घेऊन त्याला आतून लोणी लावून त्यामध्ये वरील मिक्स केलेले मिक्चर ठेवावे व ते भांडे मायक्रोवेव ओवनमध्ये ३० मिनिटे ठेवून घ्यावे.

टिप :  तुम्ही काजु, बदामचे बारीक तुकडे सुध्दा वापरु शकता आणि त्या व्यतिरिक्त सुध्दा करु शकता.

९) नाचणी बिस्कीट:

साहित्य: नाचणी पीठ ४ वाटी, पिठी साखर २ वाटी, तूप २ वाटी, बेकिंग पावडर १ छोटा चमचा, मीठ चवीपुरते

कृती:

 • नाचणी पीठ व बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या.
 • त्यामध्ये तूप टाकून चांगले एकजीव करावे. नंतर त्यामध्ये पिठी साखर टाकून तसेच थोडे दूध टाकून घट्ट असा गोळा बनवून घ्या.
 • तो गोळा ३० मिनिटे तसाच झाकून ठेवावा. त्यानंतर जाडसर लाटून वाटीच्या साहय्याने त्याचे काप पाडा. व त्याला १८० डि.सें. वर २० मिनिटे बाके करा.

१०) नाचणी पराठा:

साहित्य: नाचणी पीठ १ वाटी, तांदूळ पीठ १ वाटी, बेसन अर्धी वाटी, बीटची पाने १५ ग्रॅम, कोबी १५ ग्रॅम, कांदा १० ग्रॅम, तेल १० ग्रॅम    

कृती:

 • बिट कोबी व कांदा बारीक चिरून घ्या.
 • तांदळाचे पीठ, नागलीचे पीठ, बेसन व चिरलेले सर्व साहित्य तेल घालून माळून घ्या.
 • त्याचा जाडसर पराठा लाटा व थोडे तेल टाकून भाजा.

११) नाचणीची नानकटाई:

साहित्य: नाचणीचे पीठ १ वाटी, बेसन पाव वाटी, पिठीसाखर अर्धी वाटी, तूप अर्धी वाटी, बेकिंग पावडर अर्धा चमचा, इसेन्स एक चमचा

कृती:

 • प्रथम तुपामध्ये पिठीसाखर घालून ते चांगले हलके होईपर्यंत फेटावे. त्यानंतर त्यात बेकिंग पावडर व इसेन्स घालून पुन्हा चांगले फेटून घ्यावे.
 • त्यात नाचणीचे पीठ आणि बेसन घालून ते सगळे एकजीव करून चांगले मळून घ्यावे. मग त्याचे छोटे छोटे गोळे करून तळहातावर दाबून नानकटाई तयार करावी.
 • तयार केलेल्या नानकटाईला मुग वरून तीळ लावून फ्रायपॅनमध्ये मंद गॅसवर भाजायला ठेवावे. ५-७ मिनिटांनी नानकटाई खालच्या बाजूने खरपूस भाजली का ते पाहून हलक्या हाताने काढून घ्यावी.
 • नाचणी मधील पोषक अन्नद्रव्य :

अ.क्र.

घटक

प्रमाण (१०० ग्रॅम दाण्यात)

१.

उर्जा (किलो कॅलरी)

३३६

२.

कर्बोदके (ग्रॅम)

७२.०

३.

प्रथिने (ग्रॅम)

७.७

४.

तंतुमय पदार्थ (ग्रॅम)

३.६

५.

स्निग्ध पदार्थ (ग्रॅम)

१.३

६.

कॅल्शियम (मि. ग्रॅम)

३४४

७.

लोह (मि. ग्रॅम)

६.४

८.

फॉस्फरस (मि. ग्रॅम)

२८३

९.

नायसीन (मि. ग्रॅम)

२.१

१०.

थियामीन (मि. ग्रॅम)

०.४२

११.

रीबोफ्ल्लेवीन (मि. ग्रॅम)

०..१९


सौ. अर्चना देशमुख                           
विषय विशेषज्ञ, गृहविज्ञान                                                 
कृषी विज्ञान केंद्र, नाशिक        
  
                  

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters