आज शेतकऱ्याची अवस्था अतंत्य दयनीय आहे. वर्षभर शेतात राबराब राबून देखील पाहिजे तसा मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी हताश होऊन चिंतेच्या गर्तेत स्वतःला फसवून घेतो आणि प्रसंगी काळाला आमंत्रण सुद्धा देतो. पण रुळलेल्या पाऊल वाटा सोडून शेतकऱ्याने शेतीपूरक व्यवसाय सुरु करण्यावर भर दिल्यास शेतकरी स्वतःचे भाग्य बदलू शकतो. सर्वच अन्न प्रक्रिया उद्द्योग हे शेतीमालावर अवलंबून आहेत. अनेक प्रकारचे प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या निर्मितीसाठी शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ टोमॅटोपासून केचप, सॉस, लोणचे, पावडर. विविध फळांचा वापर करून जॅम, मार्मालेड, जेली, अनेक प्रकारचे पेये, स्क्वॅश, क्रश, आर.टी.एस इत्यादी. फळांपासून फ्रुट चीज, फ्रुट टॉफी, फ्रुट लेदर वाळवलेल्या भाज्या, लोणचे इ. आजच्या काळात सर्वच खूप वेळ वाचवून अधिक काम करण्याच्या मागे असतात.
कामाचा वाढता व्याप, अपूर्ण वेळ, वेळेची बचत, कमी श्रम यामुळे इन्स्टंट किंवा कमी श्रमात बनवता येण्यासारख्या अन्नपदार्थांना बाजारात खूप मागणी आहे. भारतात एम. टी. आर., किसान, डाबर, गिटस अशा अनेक ब्रांडस ने अनेक वर्षांपासून आपले स्थान निर्माण केले आहे. इन्स्टंट म्हणजे लगेचच बनवता येण्यासारखे. म्हणूनच शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेल्या कृषी मालावर आधारीत प्रक्रिया उद्द्योग करून लोकांना इन्स्टंट फूड उपलब्ध करून दिल्यास त्यातून तुलनात्मक मोबदला मिळून चांगले उत्पन्न मिळू शकते. जर शेतकरी फक्त धान्याचेच उत्पन्न घेत असेल तर स्वच्छ धान्याचे रेडी पॅकेटस, वेगवेगळ्या धान्याचे पीठे, मिश्रित धान्याचे पीठ ज्याला मल्टीग्रेन पीठ म्हणून खूप मागणी आहे असे लहान मोठ्या पॅक साईझ मध्ये लोकांना उपलब्ध करून दिल्यास अधिक नफा मिळवता येणे शक्य आहे. म्हणूनच आपण आज आपण मार्केट मध्ये रुचिरा, शुभान्न या कंपन्यांचे अनेक प्रकारचे पीठ जसे शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ, साबुदाणा पीठ, भगर पीठ, ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, नागलीचे पीठ इ. विक्रीसाठी उपलब्ध असलेले पाहतो.
शिवाय शहरी लोकांना ब्रेड, बिस्किट्स, कूकीज, नूडल्स, फ्लेक्स शिवाय आहार ते जुमानत नाहीत आणि हे सर्व पदार्थ मैदा खेरीज बनत नाहीत पण जर विविध धान्यांच्या पिठाचा अंतर्भाव करून निर्मिती करून या पदार्थांचा लघु उद्द्योग सुरु करून देखील शेतकरी खूप मिळकत मिळवू शकतो. त्यासाठी शेतकऱ्याने थोडा पुढाकार घेऊन एखाद्या तज्ञाचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.
आज महिला देखील खूप मोठ्या प्रमाणात घराबाहेर कार्यरत आहेत, त्यात रोजचे दोनवेळचे जेवण बनवणे सुद्धा काम करणाऱ्या स्त्रीला जिकरीचे होते. अशा महिलांसाठी अनेक प्रकारचे रेडी टू कुक, किंवा थोडा त्रास कमी करू शकतील अशा पदार्थांची खूप मागणी होताना दिसते. म्हणूनच शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या भाज्यांसाठी लागणार विशिष्ट मसाला जसे, पावभाजी मसाला, छोले मसाला, बिर्याणी मसाला, विविध मसाल्यांची पावडर, धने पावडर, हळद पावडर, जिरे पावडर, जायफळ पावडर, साधे आले लसूण वाटण या पदार्थाची निर्मितीतुन उत्त्पन्न वाढवता येऊ शकते.
एवढेच नव्हे तर काही मिठाई, नाष्ट्याचे पदार्थ बनवायला अवघड आणि खूप वेळ खाणारे असतात त्यात, जिलेबी, रसमलाई, गुलाब जामून, कूकी केक, किंवा नाष्ट्यासाठी इडली, ढोकळा, प्रोटीन केक असे अनेक पदार्थ त्वरित बनतच नाहीत. आणि बाहेरून आणलेले खिश्याला परवडत असले तरी शारीरिक दृष्ट्या त्या महिलांना करूच वाटत नाहीत. म्हणून असे खूप प्रकारातले मिठाईचे आणि नाष्ट्यातले पदार्थ सुद्धा एक जोड लघुउद्द्योग म्हणून शेतकऱ्याने जरूर करायला हरकत नाही.
सूप हा सुद्धा एक पौष्टिक पदार्थ अनेक आरोग्याप्रती सजग लोक रोजच्या आहारात घेतात. मार्केटमध्ये उपलब्ध असलेले सूप मध्ये पिष्टमय पदार्थ असतात, पण या रेडी टू कुक सूप्स मध्ये जर वाळवलेल्या भाज्या आणि काही कडधान्याने मूल्यवर्धित करून पौष्टिक पदार्थ रेडी तो कुक सूप्स चे पॅकेट सुद्धा मोठी बाजारपेठ काबीज करू शकतो.
रोजच्या रोज असे अनेक पदार्थ आहेत जे बनवायला खूप वेळ आणि कष्ट लागतात म्हणून सुद्धा लोक किंवा महिला कंटाळा करतात. या बाबींना विचारात घेऊन जर शेतकऱ्याने असलेल्या उत्पादनाचा वापर इन्स्टंट फूड बनवण्यावर भर दिला तर शेतीतुन अधिक फायदा नक्की मिळेल.
प्रा. एस. बी. पालवे
(के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)
८२७५४५२२०३
Share your comments