शेवगा ही उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्य असलेली वनस्पती आहे. यात पाने, देठ आणि बिया यांचे प्रमाण जास्त असते. ते विटामिन ए, जीवनसत्त्वे बी आणि सी, खनिजे (विशेषत: लोह) आणि गंधकयुक्त अमीनो अॅसिड मेथिओनिन आणि सिस्टीनचे चांगले स्रोत आहेत. शेवगा हे संबंधित पाने, शेंगा आणि बियाण्यातील पौष्टिक मूल्यांसाठी प्रसिद्ध आहे. शेवग्यामध्ये उपलब्ध पौष्टिक पदार्थांच्या जास्तीत जास्त वापरासाठी, विविध भागांमधून मूल्यवर्धित पदार्थ तयार केली जातात.
मूल्यवर्धित पदार्थ :-
1) रस :-
- रस तयार करण्यासाठी ताजे पाने स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यामध्ये पाणी टाकून हे मिश्रण मिक्सरमधून चांगले बारीक करून घ्यावे.
- तयार मिश्रण गाळून त्याचा रस काढावा. या रसाचे सेवन करण्यापूर्वी त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून एक चमचा मध टाकावे. त्यामुळे त्याचा कडूपणा कमी होतो.
- मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी, शेवग्याच्या कोंबांना (४० दिवसांपेक्षा जास्त जुन्या नसलेल्या) ह्यामर मिलच्या सहाय्याने बारीक करून थोडेसे पाणी (प्रती १० किलो सामग्रीसाठी एक लिटर) वापरले जाते. नंतर ते गाळून पाण्याने पातळ केले जाते आणि चवीनुसार साखर टाकली जाते.
2) पावडर :-
- कापणीनंतर पाने काढून, सावलीत धुऊन वाळवल्या जाते (सूर्यप्रकाशात व्हिटॅमिन ए नष्ट होऊ शकतो). वाळलेल्या पानापासून ग्राइंडरमध्ये पावडर बनवल्या जाते.
- पौष्टिक पदार्थ म्हणून, २ किंवा ३ चमचा पावडर सूप किंवा सॉसमध्ये वापरला जाऊ शकतो. पावडर प्रकाश आणि आर्द्रतेपासून संरक्षित असल्यास १८० दिवसापर्यंत (६ महिने) साठवता येते.
3) तेल :-
- तेल हे बियाण्याचे मुख्य घटक आहे आणि ते बियाणे वजनाच्या ३६.७ टक्के असते. सोल्व्हेंट एक्सट्रक्शन (एन - हेक्सेन) आणी कोल्ड प्रेसद्वारे तेल काढले जाऊ शकते.
- शेवग्याच्या तेलामध्ये कॉस्मेटिक मूल्य प्रचंड आहे आणि ते मॉइस्चरायझेर आणि त्वचा कंडिशनर म्हणून शरीर आणि केसांची निगा राखण्यासाठी वापरले जाऊ शकते.
- हे स्वंयंपाकाचे तेल म्हणून देखील उपयुक्त आहे.
- भारतीय आयुर्वेद असा दावा करतो की शेवग्याच्या तेलामध्ये अँटीट्यूमर, अँटीपायरेटिक, एंटी-इंफ्लेमेटरी, कोलेस्टेरॉल कमी करणे, अँटीऑक्सिडंट, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल क्रिया आहेत आणि स्वदेशी प्रणालीमध्ये वेगवेगळ्या आजारांच्या उपचारांसाठी कार्यरत आहेत.
4) टॅब्लेट आणि कॅप्सूल :-
- शेवग्याच्या पावडर पासून गोळ्या आणि कॅप्सूल बनवता येतात. हे एक पूरक म्हणून थेट सेवन करण्यासाठी वापरले जाते.
5) शेवग्याच्या पानाचा डिकाशीन चहा :-
- सुरवातीला शेवग्याची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत व सावलीमध्ये वाळवून घ्यावीत. वाळवलेली पाने चहा पुडप्रमाणे बारीक करून घ्यावीत.
- एका पातेल्यात पाणी गरम करून त्यामध्ये शेवग्याच्या पानाची पावडर मिसळावी व साखर टाकून तयार झालेला शेवग्याच्या पानाचा चहा काचेच्या गासमध्ये ओतून त्यामध्ये ४ ते ५ वेळ लिंबू रस मिसळून घ्यावे. तयार झालेल्या चहा अतिशय गुणकारी असून चवीला पण चांगला लागतो.
लेखक :-
ज्ञानेश्वर सुरेश रावनकार
(पी.एच.डी. भाजीपाला शास्त्र)
उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
शुभम विजय खंडेझोड
(एम.एस.सी भाजीपाला शास्त्र) उद्यानविद्या विभाग,
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव.
इ. मेल. shubhamkhandezod4@gmail.com
Share your comments