महाराष्ट्रामध्ये कलिंगड व खरबूज ही दोन पिके घेतली जातात. उन्हाळ्याच्या दिवसांत तयार होणारे, कलिंगड हे फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे. महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे ६६० हेक्टर क्षेत्रावर तर खरबूजाची लागवड २३८ हेक्टर क्षेत्रावर केली जाते. मूळ आफ्रिकेतील असणारे हे फळ भारतात कर्नाटकमध्ये सर्वाधिक प्रमाणात तयार होते.त्याच्या अनेक जाती आपल्याकडे प्रचलित आहेत. महाराष्ट्रात दोन्ही पिके उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात तसेच बागायती पीक म्हणून घेतले जाते. पूर्वी कोणत्याही पिकात आंतरपीक म्हणून किंवा नदीपात्रात, तलावात गाळपेर म्हणून कलिंगडाचे उत्पादन घेतले जात होते. मात्र, अलीकडे बाजारपेठेतील वाढती मागणी आणि मिळणारा भाव लक्षात घेऊन कलिंगडाचे मुख्य पीक म्हणून शेतकरी उत्पादन घेऊ लागले आहेत.
या फळामध्ये चुना, फॉस्फरस ही खनिजे व अ, ब, क जीवनसत्वे असतात. उन्हाळ्यातील दाहकता कमी करणारे असे हे मधुर फळे आहे.उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते, त्या वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो. मधुर, शीतल, तृष्णाशामक आणि उत्साहवर्धक अशा कलिंगडाला शास्त्रीय भाषेत ‘स्रिटलस व्हल्गॅरिस’ असे म्हणतात. कलिंगड हे सर्वसामान्य लोकांना परवडणारे, सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले वेलवर्गीय फळ, याला वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते.
शहरी व ग्रामीण भागांमध्ये कडक उन्हाळ्यात सतत लागणारी तहान शमविण्यासाठी कलिंगडाच्या फोडींचा हमखास उपयोग होताना दिसतो.कच्च्या कलिंगडाची भाजी तसेच लोणच्यासाठी उपयोग केला जातो. कलिंगडाच्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते. कलिंगडाचे फळ मधुर व स्वादिष्ट असते. त्याला एक प्रकारचा सुगंध असतो. कलिंगडापासून भरपूर मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती केली जाते. कलिंगड हे एक असे फळ आहे ज्यात पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. याच कारणामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने केवळ शरीरात पाण्याची मात्रा वाढत नाही तर शरीर खासकरून पोट थंड राहण्यास मदत होते. कलिंगड खाल्ल्याने अनेक आजारांमध्येही फायदा होतो. कलिंगड वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे.
कलिंगडाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये अन्नघटकाचे प्रमाण
- पाणी- ९३%
- शर्करा पदार्थ- ३.३%
- प्रथिने- २.०%
- तंतुमय पदार्थ- ०.२%
- खनिजे - १.३%
- चुना- ०.१%
- स्फुरद- ०.९%
- लोह- ०.८%
- जीवनसत्त्व 'अ'- ११%
- जीवनसत्त्व 'क' - १३%
- जीवनसत्त्व 'ब'- १०%
- जीवनसत्त्व 'ई'- ७%
कलिंगडाचे आरोग्यादायी फायदे
- कलिंगडामध्ये व्हिटामिन क आणि अ आढळते. या व्हिटामिन्समुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे.
- ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास अशा व्यक्तींनी कलिंगड जरूर खावे. कलिंगडामध्ये कमी प्रमाणात सोडियम असते तसेच हे थंड असते.
- किडनी स्टोनचा त्रास असेल अशा व्यक्तींनी जरूर कलिंगड खावे. कारण कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. तसेच किडनी साफ करण्यास कलिंगडाची मदत होते.
- कलिंगडामध्ये टोमॅटोप्रमाणे लायकोपिनचे प्रमाण भरपूर असते. लायकोपिन अॅण्टिऑक्सिटेंट असल्यामुळे कर्करोग दूर ठेवायला उपयुक्त ठरते.
- वजन कमी करण्यासाठी कलिंगडाचा डाएटमध्ये जरूर समावेश करावा. कलिंगडामध्ये कॅलरीज कमी असतात. मात्र अधिक काळापर्यंत पोट भरलेले ठेवण्यास मदत करतात.
- कलिंगड फळ खाण्याचे किंवा ताजा रस पिल्याने आरोग्यासाठी लक्षणीय फायदे होतात. या फळामध्ये सिट्रूलिन हे अमिनो आम्ल मोठ्या प्रमाणात असून, ते रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करते. अतिकष्टामुळे स्नायूंमध्ये आलेला ताण कमी करते.
- कलिंगड खाल्ल्याने त्यामध्ये असणारा चोथा व आद्र्रतेमुळे मलावरोधाची तक्रार कमी होऊन पोट साफ होते.
- व्यायामापूर्वी कलिंगडाच्या रसाचे सेवन केल्यास दाह कमी करते. त्यातील फ्लॅव्हेनॉइड, कॅरोटीनॉइड यासारखे घटक दाह निर्माण करणाऱ्या ट्रीटेरपेनॉइड घटकांशी लढतात.
- कलिंगडाचे बी टणक असल्यामुळे सोलायला कठीण असते. म्हणून थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करावे व त्याचा रस गाळणीतून गाळून घ्यावा व हे गाळलेले पांढरे दूध रश्श्याच्या भाजीत किंवा आमटीत घालावे. या बियांमध्ये प्रथिने, क्षार व शरीरास उपयुक्त असा मेद भरपूर प्रमाणात असतात व त्याचा आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयोग होतो.
- सौंदर्यवर्धनासाठीही कलिंगड उपयुक्त ठरते. कलिंगडाची साल चेहऱ्यावर चोळल्याने चेहऱ्यावरचा तजेला वाढतो. उष्माघातामुळे शरीराची आग होत असेल तर तसेच उष्णतेमुळे डोळ्यांची, तळपायांची आग होत असेल तर कापलेल्या टरबुजाची साल त्या भागावर ठेवावी. थोड्याच वेळात शरीराची आग कमी होते.
कलिंगड फळ खातांनी खालिल काळजी घ्यावी
- कलिंगड हे फळ पिकल्यानंतर माठाखाली ठेवावे. पाण्याने ओले केलेले थंड कापड त्यावर टाकावे. त्यानंतर चार ते पाच तासांनी कलिंगड खावे. फ्रिजमध्ये ठेवून थंड केलेले कलिंगड खाऊ नये. तसेच एकदा कापलेले कलिंगड पुन्हा फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाऊ नये. कारण फळ कापल्यानंतर त्यातील पौष्टिक घटक कमी होतात. म्हणून ते लगेचच खावे. फ्रिजमध्ये कापून ठेवलेले शिळे कलिंगड खाल्ल्यास अनेक वेळा फूड पॉयझनिंग (अन्न विषबाधा) होऊन जुलाब, उलट्या, ताप, सर्दी, खोकला हे आजार होतात.
- अनेक जण कलिंगड खाताना त्यात मीठ टाकून खातात; परंतु कलिंगडामध्ये नसíगकरीत्याच सोडियम क्लोराइड, पोटॅशिअम हे क्षार असतात व मीठ टाकून या क्षारांचे प्रमाण अधिकच वाढते. म्हणून मीठ, साखर यांचा वापर न करता आहे त्या नसíगक स्थितीतील पिकलेले कलिंगड कापून लगेचच खावे.
कलिंगडापासून मूल्यवर्धित पदार्थ
१) रस
- रस तयार करण्यासाठी पूर्णपणे पक्व झालेली कलिंगडाची निरोगी फळे निवडून, स्वच्छ पाण्याने धूवून घ्यावीत. त्यानंतर कलिंगडाचे तुकडे करून त्यापासून गर काढावा. गरातील बिया बाजूला काढाव्यात.
- गर स्क्रू टाईप ज्युस एक्स्ट्रॅक्टर यंत्रामधून काढून घ्यावा. एकजीव झालेला गर हायड्रॅालिक बास्केट प्रेस या यंत्राचा वापर करून रस काढून घ्यावा.
- जास्त काळ साठवून ठेवायचा झाल्यास तो पाश्चराईझ करुन, त्यामध्ये १०० पीपीएम सोडिअम बेंझोएट या परिरक्षकाचा वापर करावा.
- बाटल्या हवाबंद करुन पाश्चराईझ कराव्यात बाटल्या थंड झाल्यावर थंड आणि कोरड्या जागी साठवून करून ठेवाव्यात.
२) सरबत
- रसापासून उत्तम प्रकारचे सरबत तयार करता येते. यासाठी कलिंगडाचा रस १५ टक्के, साखर १० टक्के आणि उरलेले पाणी असे घटक वापरले जातात.
- १०० ग्रॅम कलिंगडाचा रस, १०० ग्रॅम साखर, १० ग्रॅम जिरे पावडर पातेल्यात घेऊन चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यावा. त्यात पाणी घालावे. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
- मिश्रण चांगले ढवळून मलमलच्या कापडातून गाळून घेऊन पाश्चराईझ करुन त्यामध्ये १०० पीपीएम सोडिअम बेंझोएट या परिरक्षकाचा वापर करावा.
- मिश्रण थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा. बाटल्या हवाबंद आणि पाश्चराईझ करून थंड झाल्यावर कोरड्या जागी ठेवाव्यात.
३) सिरप
- सिरप तयार करण्यासाठी रस ३० टक्के, साखर ६० टक्के व सायट्रिक आम्ल १.५ टक्के लागते.
- १ लिटर रस घेवून त्यामध्ये १ कि.ग्रॅ. साखर, ३५ ग्रॅम सायट्रिक आम्ल, ६०० मि.लि. पाणी मिसळावे. मिश्रण मोठ्या व जाड तळ असलेल्या भांड्यामध्ये मध्यम आचेवर १० ते १५ मिनीटे गरम करून त्याला हलवत ठेवने. मिश्रण खालील बाजूला करपणार नाही हे पाहा. आवश्यकतेइतका घट्ट झाल्यानंतर रस चाळणीतून गाळून घ्या.
- ग्लासमध्ये थोडे सिरप घेवून त्यात ०.६ ग्रॅम सोडियम बेन्झोएट विरघळून घ्यावे व ते सिरप मध्ये टाकावे. तयार झालेले कलिंगडाचे सिरप निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या व थंड जागी साठवावा.
४) स्क्वॅश
- स्क्वॅश तयार करण्यासाठी रस २५ टक्के, साखर ४५ टक्के आणि सायट्रिक आम्लाचे प्रमाण १ टक्के असावे. फळे स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर पल्परच्या सहाय्याने कलिंगडाचा रस काढून घ्यावा. एकजीव झालेला गर स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घेऊन ८० ते ८२ अंश तापमानाला २५ ते ३० मिनीटे गरम करावा.
- रसामध्ये १.८ कि.ग्रॅ. साखर, ३५.५ ग्रॅम सायट्रीक अॅसीड, १.५० लिटर पाणी घेऊन रसामध्ये मिसळून ते मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. नंतर हे मिश्रण थोडावेळ गरम करून त्यात ०.६ ग्रॅम सोडियम बेन्झोएट विरघळून घ्यावे.
- तयार झालेला स्क्वॅश निर्जंतूक केलेल्या काचेच्या बाटल्यात भरून हवाबंद करून लेबल लावून थंड किंवा कोरडया जागेवर साठवून ठेवावे. स्क्वॅशपासून सरबत तयार करताना त्यामध्ये दोन ते तीन पट पाणी टाकून थंड करून पिण्यासाठी वापरतात.
५) जॅम
- जॅम बनविण्यासाठी पूर्ण पक्व झालेल्या कलिंगड फळांचा १ किलो गर, साखर ७५० ग्रॅम, सायट्रिक अॅसिड ८ ग्रॅम लागते. सुरुवातीला पक्व कलिंगडाची फळे पाण्याने स्वच्छ धुवून चाकूने कापून बी वेगळे करावे. फळाची साल बाजूला काढून गर व्यवस्थित मिक्सरमध्ये एकजीव करावा. त्यामध्ये ७५० ग्रॅम साखर व ८ ग्रॅम सायट्रिक अॅसिड मिसळून मिश्रण मंद आचेवर गरम करावे.
- मिश्रण गरम करत असतानी मिश्रणाचा टिएसएस ६८.५ टक्के इतका आल्यास जॅम तयार झाला असे समजावे. जॅम थोडा थंड झाल्यावर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरण्यांमध्ये भरावा. बरणीवर थोडे पॅराफिन वॅक्स ओतावे. अशा रितीने उत्तम प्रतीचा टिकाऊ जॅम तयार होतो. बरण्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात. त्यामुळे जॅम चांगला रहातो.
६) जेली
- कलिंगड फळाच्या रसात १:३ या प्रमाणत साखर मिसळून, ०.७ टक्के सायट्रीक अॅसीड (लिंबू भुकटी) व १.५ टक्के पेक्टीन टाकून मिश्रणाचा टिएसएस ६७.५ टक्के येईपर्यंत शिजवावे. या वेळी मिश्रणाचे तापमान साधारणपणे ११० अंश से. असते. जेली गरम असतानाच निर्जतुक बाटल्यांमध्ये भरावी.
- जेली जास्त काळ टिकून राहण्यासाठी त्यात २३० ते २५० मिलीग्रॅम प्रति किलो सोडियम बेंझोएट हे परिरक्षक जेली उकळत असताना मिसळावे.जेली तयार झाल्यानंतर ती निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या काचेच्या बरणीमध्ये हवाबंद करून ती बरणी थंड व कोरड्या जागी ठेवावी. कलिंगड फळांपासून लाल रंगाची, पारदर्शक अशी उत्कृष्ट जेली तयार होते.
७) सॉफ्ट ड्रिंक
- पूर्णपणे पक्व झालेली कलिंगडाची निरोगी फळे निवडून, स्वच्छ पाण्याने धूवून घ्यावीत. त्यानंतर कलिंगडाचे तुकडे करून त्यापासून गर काढावा. गरातील बिया बाजूला काढाव्यात.
- कलिंगडाचा १ किलो गर, ५०० ग्रॅम साखर, ४.५ मि.लि. व्हॅनिला रस आणि १० ग्रॅम मिठ फूड प्रोसेसर मधून बारीक करून घ्या. मिश्रण थोडे हलवल्यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये १० ते १५ मिनीटे थंड करा.
- कलिंगड मिश्रणामध्ये आवश्यक तितक्या तीव्रतेपर्यंत सोडा मिसळा. तयार झालेल्या सॉफ्ट ड्रिंक चा आस्वाद घ्यावा.
८) बार
- कलिंगड फळांचा १ किलो गर मिक्सर मधून बारीक करून घ्या. नंतर कढई गॅस वर ठेवून त्यात कलिंगडचा गर १ किलो व ५०० ग्रॅम साखर एकत्र करून चांगले परतून घ्या. त्यात पेक्टिन ०.५८ टक्के,o.३ टक्के सायट्रिक आम्ल, १० टक्के खाद्यरंग व ३०० पीपीएम पोटॅशियम मेटाबाय सल्फाईट टाकावे.
- मिश्रण चांगले घट्ट झाले की गॅस बंद करा. ताटाला तुपाचा हात फिरवून त्यात हे मिश्रण पसरवा. आणि थंड झाले की त्याच्या वड्या पाडा. हे मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये टाकून पापडी उलथवावी व पुन्हा १० ते १५ तास सुकवावे. नंतर योग्य आकाराचे तुकडे करून आकर्षक पॅकिंग करावे.
९) टॉफी
- पूर्णपणे पक्व झालेली कलिंगडाची निरोगी फळे निवडून, स्वच्छ पाण्याने धूवून घ्यावीत. त्यानंतर कलिंगडाचे तुकडे करून त्यापासून गर काढावा. गरातील बिया बाजूला काढाव्यात.
- टॉफी तयार करण्यासाठी १ किलो पल्प, साखर ४०० ग्रॅम, लिक्विड ग्लुकोज ९० ग्रॅम, दुध पावडर ८० ग्रॅम, सायट्रिक अॅसिड ४ ग्रॅम व वनस्पती तूप १२० ग्रॅम या प्रमाणात वापरावे.गर भांड्यामध्ये घेऊन त्यात वनस्पती तूप मिसळून गर गॅसच्या मंद आचेवर चांगला शिजवून आटवावा.
- घेतलेल्या प्रमाणानुसार साखर, दुध पावडर, सायट्रिक अॅसिड हे घटक टाकून मिश्रण एकजीव करावे मंद आचेवर मिश्रण चांगले ढवळून शेवटी त्यात लिक्विड ग्लुकोज टाकून मिश्रणात ब्रिक्स ७० ते ७२ दरम्यान आल्यावर गॅस बंद करावा.
- मिश्रण तूप लावलेल्या ट्रे मध्ये किंवा प्लेटमध्ये ६ ते ८ तास पसरून ठेवावे. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे आपल्या गरजेनुसार काप करावे व तयार टॉफी बटर पेपर मध्ये पॅक करावी.
१०) कँडी
- कलिंगडाची फळे स्वच्छ पाण्याने धूवून घ्यावीत. त्यानंतर कलिंगडाचे बारीक बारीक तुकडे करून घ्यावेत. बिया बाजूला काढाव्यात. मध्यम गॅसवर कढई ठेवून त्यात ५०० ग्रॅम साखर घालावी.
- साखर विरघळलेली की, त्याच्यामध्ये २५ ग्रॅम लिंबाचा रस घालावा नंतर मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. १० मिनिटे शिजल्यानंतर गॅस बंद करावा.
- एका ट्रेमध्ये एक एक कलिंगडाचे तुकडे ठेऊन ते सुकायला ठेवावे. नंतर सुकलेल्या कँडी वर बारीक केलेली साखर टाकावी आणि कँडी स्वच्छ काचेची भरणीत भरून ठेवावी.
लेखक:
सचिन अर्जुन शेळके
आचार्य पदवी विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग,
सॅम हिगिनबॉटम कृषि, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय प्रयागराज, उत्तरप्रदेश.
8888992522
Share your comments