शिवानी ठोंबरे, प्रतिभा ठोंबरे, सुनील कुमार
महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कांदा पिकवला जातो, त्यात नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. त्यासोबतच पुणे, सोलापूर, जळगाव यांसारख्या इतर जिल्ह्यांमध्येही कांदा मोठ्या प्रमात पिकतो. महाराष्ट्राच्या विविध भागात कांदा पिकवला जातो आणि तो वर्षभर बाजारात उपलब्ध असतो. शेतकऱ्यांना अनेकदा कांदा जास्त काळ साठवून ठेवण्यात त्रास होतो, कारण तो खराब होऊ शकतो किंवा बर्याचदा कानड्याचे वजनही कमी होते. काही भागात साठवणुकीच्या पुरेशा सोयी नाहीत. या समस्या सोडवण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कांद्यावर प्रक्रिया उद्योग सुरू करावा.
कांद्याचे विविध उत्पादनांमध्ये रूपांतर केल्यास शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. सध्या, भारतात उगवलेल्या अन्नपदार्थावर फार कमी प्रमाणात प्रक्रिया केली जाते. बहुतेक ते खराब होते कारण ते योग्यरित्या संग्रहित किंवा प्रक्रिया केली जात नाही. कांद्यामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे ते जास्त काळ टिकत नाहीत. कांदा जास्त काळ टिकण्यासाठी, ते निर्जलीकरण केले जाऊ शकते आणि चिप्स, पावडर, पेस्ट, रस आणि लोणचे यासारखे उत्पादने आपण तयार करू शकतो. या उत्पादनांना निर्यातीसाठी चांगली मागणी आहे.
संतुलित आहाराचा एक महत्त्वाचा घटक म्हणून, कांदा हा सल्फरचा एक मौल्यवान स्रोत आहे. उन्हाळ्यात उष्णतेचा सामना करण्यासाठी कच्च्या कांद्याचे सेवन करण्याची शिफारस केली जाते. कांदे शिजवल्याने त्यांची चव वाढू शकते, परंतु खरे आरोग्य फायदे ते कच्च्या स्वरूपात खाल्ल्याने मिळतात. कच्च्या कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, जे एकंदर आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. कच्च्या कांद्याचा तुमच्या आहारात समावेश करण्याचे असंख्य फायदे आहेत.
कच्चा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
1.हाडांसाठी फायदेशीर : कच्चा कांदा खाणे हाडे आणि दातांसाठी चांगले असते कारण त्यात कॅल्शियम असते. कॅल्शियम तुमची हाडे मजबूत बनवते आणि तुमची हाडे कमकुवत आणि तुटण्याची अधिक शक्यता असलेल्या आजारापासून बचाव करण्यास मदत करू शकते.
2.मधुमेहावर नियंत्रण : कच्च्या कांद्यामध्ये एलिल प्रोपाइल डायसल्फाइड नावाचे एक संयुग असते, जे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. प्रोपिल डायसल्फाइड रक्तातील साखरेचे नियमन करण्यास मदत करते.
3.अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध : कच्च्या कांद्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि फिनॉलिक्ससह अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात, जे मुक्त रॅडिकल्समुळे ऊतींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, अँटिऑक्सिडंट्स कर्करोग आणि हृदयविकार यांसारखे आजार होण्याची शक्यता कमी करू शकतात.
4.रोगप्रतिकारक शक्ती वाढवते : कच्च्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे निरोगी रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असते. व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन उत्तेजित करण्यास मदत करते, जे संक्रमण आणि रोगांविरुद्ध लढतात. कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने सर्दी, फ्लू आणि श्वसनाच्या इतर आजारांचा धोका कमी होतो.
कांद्यावर प्रक्रिया करून तयार होणारे पदार्थ
१.कांद्याच्या निर्जलीकरण चकत्या: यासाठी सुरुवातीला कांद्याचे लहान किंवा गोलाकार काप करून घ्यावेत. नंतर हे काप किंवा चकत्या वेगवेगळ्या उच्च तापमानाच्या सानिध्यात निर्जलीकरण करून घ्यावेत. पुढे ह्या चकत्या हवाबंद डब्यात किंवा पाकिटात भरून पॅक कराव्यात. निर्जलीकरण केलेल्या चकत्याचा उपयोग सूप, सॉस, सलाड सजविण्यासाठी केला जातो.
२.कांद्याची पावडर: यासाठी सुरुवातीला कांद्याचे लहान किंवा गोलाकार काप करून घ्यावेत. हे काप वेगवेगळ्या उच्च तापमानाच्या सानिध्यात निर्जलीकरण करून त्यापासून घ्यावे. नंतर या कापांना मिक्सरमध्ये कुटून किंवा ग्राईन्ड करून कांद्याची पावडर बनविली जाते. पुढे ही पावडर हवाबंद डब्यात किंवा पाकिटात भरून पॅक करावी. निर्जलीकरण केलेल्या पावडरचा उपयोग सूप, सॉस, सलाड सजविण्यासाठी केला जातो.
3. कांद्याचे लोणचे: कांद्याचे लोणचे बनवण्यासाठी प्रथम कांदा सोलून त्याचे चार तुकडे करावेत. कांद्याना भरपूर मीठ आणि लिंबाच्या रसात चांगले गुंडाळा आणि सुमारे ४ तास बाजूला ठेवा. त्यानंतर स्वच्छ काचेच्या भांड्यात तेल, आमचूर पावडर, तिखट, कांदा, बाकीचे मसाले आणि लिंबाचा रस आणि मीठ टाकून उरलेले तेल वरून टाकावे. नंतर जार बंद करावा आणि सुमारे १ महिन्या पर्यन्त हे लोणचे आरामात टिकते.
४.कांदा तेल: अल्कोहोल विरहीत पेय, आईस्क्रीम, चॉकलेट, च्युईंगम, लोणचे इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी कांद्यापासून तयार केलेल्या तेलांचा उपयोग होतो. कांद्याचे तेल पिवळसर तपकिरी रंगाचे असते.
कांदा प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे यंत्र व उपकरणे :
१.पिलिंग मशिन (साल /बाह्य आवरण काढण्याचे यंत्र):
२.चकट्याकरण्यासाठी मशीन
३.ड्रायर मशिन
४.मिक्सिंग मशीन
५.पल्वलाझर
६.अॅटोमॅटिक पाऊच पॅकिंग मशिन
७.लेबलिंग मशिन
कांदा या पिकावर प्रक्रिया केल्यामुळे त्यास खालील फायदे होतील:
1.वरील शेतमालापासून मागणी विचारात घेऊन आपणास हवा असलेला पदार्थ तयार करता येईल.
2.काही अंशी मुळ शेतमालास असलेल्या बाजारभावावर नियंत्रण आणता येईल व किंमत वाढण्यास अथवा किमान स्थिर रहाण्यासाठी सहाय्य होईल.
3.प्रक्रियेच्याव्दारे ज्या भागात शेतमाल मोठ्या प्रमाणावर विकत नाही अशा भागात सदरच्या शेतमाल उपलब्ध येईल.
4.रोजगाराची उपलब्धता होईल परिणामी बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रक्रिया उद्योगाची मदत होईल.
5.पिकावरील प्रकिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामुग्री तयार करणाऱ्या उद्योगांना चालना मिळेल.
थोडक्यात उपरोक्त पिकांच्या मूल्यवृध्दीसाठी प्रक्रिया हे एक उत्कृष्ठ साधन असून त्याव्दारे शेतकऱ्यास खऱ्या अर्थाने फायदा होऊ शकतो.
कांदा चाळ अनुदान योजना
उद्दिष्ट्य:- महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सर्वसाधारणपणे शेतकरी कांदा जमिनीवर पसरून किंवा स्थानि रीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांदा पिकाची साठवणूक करतात. कांदा चाळीच्या उभारणीमुळे कांद्याची प्रत राखली जाते आणि तो कांदा दीर्घकाळ टिकवला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा अधिक नफा मिळू शकतो. त्यामुळेच कांदाचाळ उभारणी कडे शेतकऱ्याचा कल हा वाढत झालेला दिसून येतो.
·कांदा चाळ उभारल्याने शेतकर्याला कांद्याच्या साठवणुकीत नुकसान कमी होईल आणि अधिक नफा मिळवता येईल.
·हंगामानुसार कांद्याची आवक वाढून कांद्याचे भाव कोसळतात तसेच हंगामा व्यतिरिक्त कांद्याचा तुटवडा पडून कांद्याचे भाव अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढतात. अशा समस्येवर अंशतः नियंत्रण मिळवणे.
·कांद्याची साठवणूक करून अधिक नफा मिळवणे
अनुदान:-
कांदा चाळीसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य म्हणून ५, १०, १५, २० व २५ मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५०% व कमाल ३,५००/- रुपये प्रति मेट्रिक टन या क्षमतेनुसार अर्थसहाय्य दिले जाते.
पात्रता:-
·वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी,शेतकऱ्यांचा गट स्वयंसहाय्यता गट,शेतकरी महिला गट,शेतकऱ्यांची उत्पादक संघ,नोंदणीकृत शेती संबंधित संस्था,शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था,सहकारी पणन संघ
·या अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करताना शेतकऱ्याच्या अर्जदार शेतकऱ्याच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे बंधनकारक आहे.
·७/१२ उतारा वर नोंद असणे आवश्यक आहे.
· अर्जदार शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे:-
·सातबारा उतारा,आधार कार्डची छायांकित प्रत,आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकाच्या प्रथम पानाची छायांकित प्रत,वर्ग प्रमाणपत्र (अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी),विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र २)
अर्ज कुठे करायचा:-
·या अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या आणि पात्र अर्जदारांनी या योजनेसाठी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in)या ऑनलाइन संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावे.
·रजिस्ट्रेशन करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावीत.
·पूर्व संमती पत्र आलेल्या शेतकऱ्याला सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र ४ बंध-पत्र तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये सादर करावे लागेल. पूर्वसंमती पत्रासोबत आराखड्यात दिलेल्या तांत्रिक निकषानुसार कांदा चाळीची उभारणी करणे बंधनकारक असणार आहे.
·तुमचा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला सविस्तर प्रस्ताव सादर करावा लागेल.
·कांदाचाळ उभारणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांना लेखी स्वरुपात कळवावे लागेल.
लेखक - शिवानी ठोंबरे, प्रतिभा ठोंबरे, सुनील कुमार
अन्न व पोषण विभाग,सामुदायिक विज्ञान महाविद्यालय व.ना.म.कृ.वी. परभणी
श्री सिद्धगिरी, कृषि विज्ञान केंद्र, कणेरीमठ, कोल्हापूर
Share your comments