अननसापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ

Friday, 10 April 2020 08:44 AM


अननस ही “ब्रोमेलिएसी” कुलातील वनस्पती असून या तिचे शास्त्रीय नाव “अननस कोमोसस” आहे. ही वनस्पती मूळची ब्राझीलची आहे. मलेशिया, फिलीपीइन्स, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि भारतात अननस पिकवितात. भारतात केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम व त्रिपुरा या राज्यांत व्यापारी स्तरावर अननसाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात कोकणामध्ये तुरळक प्रमाणात अननसाची लागवड होते.

लागवड बियांपासून, तसेच झुडपाच्या वेगवेगळ्या भागांपासून (उदा., बुंध्यापासून निघालेली फूटवे, फळांचा शेंडा, इत्यादींपासून) करतात. याची पाने तीन साडेतीन फूट लांब व दोन इंच रुंद असतात. पाने सहसा भुरकट हिरव्या रंगाची असतात. या झाडाचे खोड फारच आखूड असते. फळ लागण्यासारखे झाड झाले म्हणजे त्यांतून एक दांडा वर निघतो व त्या दांड्यावर फार दाट अशी फुले येतात. या प्रत्येक फुलाचे स्वतंत्र फळ न होता ती चिकटून एकच मोठे फळ होते. फळ रसाळ, किरमिजी रंगाचे व चवीला आंबटगोड असते.

अननस (प्रति १०० ग्रॅम) मध्ये उपस्थित पोषक घटक

घटक

प्रमाण (प्रति १०० ग्रॅम)

ऊर्जा

५० किलो कॅलरीज

फायबर

१.४ ग्रॅम

प्रथिने

०.५४ ग्रॅम

कार्बोहायड्रेट

१३.१२ ग्रॅम

साखर

९.८५ ग्रॅम

पोटॅशियम

१०९ मिलीग्रॅम

मॅगनीझ

०.९२७ मिलीग्राम

कॅल्शियम

१३ मिली

फॉस्फोरस

८ मिग्रॅ

व्हिटॅमिन- सी

४७.८ मिलीग्राम

 
औषधी गुणधर्म

 • अननसात ‘क’ जीवनसत्त्व हे भरपूर प्रमाणात असते.
 • अननसामध्ये ८७ टक्के सायट्रिक आम्ल व १३ टक्के मॅलिक आम्ल असते. ही दोन्ही आम्ले शरीरास पोषक असतात. ही आम्ले शरीरात शोषली जाऊन उष्णता व ऊर्जा निर्माण करतात.
 • अननसाच्या गरामधे तंतुमय पदार्थ (फायबर) भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याच्या सेवनाने शरीराची पचनक्रिया व्यवस्थित राहते.
 • अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचे एन्झाइम असते. ते शरीराचा दाह आणि सूज कमी करते आणि घेतलेल्या अन्नाचे पचन करण्यास मदत करते.
 • अननसामध्ये मँगनिजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अननस खाणार्‍याच्या हाडांची मजबुती वाढते.
 • अननसमध्ये बिटा केरोटीनचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे शरीराची झीज होण्याचा वेग कमी होतो. अननस खाल्ल्याने शरीरातील चयापचय क्रिया वेगवान होतात.
 • पिकलेले अननस मधुर आंबट, मूत्रल, कृमिघ्न, पित्तशामक व उत्तम पाचक असते. यामुळे उष्णतेचे विकार व ऊन लागल्याने होणारे विकार कमी होण्यास मदत होते.
 • अननसाच्या पानांपासून काढलेल्या धाग्यांपासून हातविणीचे कापड तयार करतात. हे कापड रेशमासारखे दिसते. धाग्यांपासून दोराही तयार करतात.

अननसापासून विविध प्रक्रिया पदार्थ

 • अननसाचा जॅम
  सर्वप्रथम अननसाची साले काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावा. नंतर एका पातेल्यात १ किलो साखर आणि १ किलो अननसाचा गर शिजवण्यास ठेवा. सर्व घटकपदार्थ एकत्र मिसळून ठराविक घटटपणा (६८.५ डिग्री ब्रिक्‍स) येईपर्यत शिजवावे. शिजवताना मिश्रण पळीने हलवावे व २ ग्रॅम सायट्रिक आम्ल टाकावे. तसेच मिश्रण सारखे ढवळत राहावे. गरम गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरणीत भरावे व नंतर पॅरिफिन वॅक्सने सील करावे.

 • अननसाचा स्क्वॅश
  अननस गरापासून स्क्वॅश बनविण्यासाठी गराचे प्रमाण ४५ टक्के, टी.एस.एस. ५० टक्के व आम्लता १ टक्के ठेवावे. एका मोठ्या पातेल्यात १ लिटर पाणी वजन करून घ्यावे. त्यामध्ये २० ग्रॅम सायट्रिक आम्ल व १.७५० ग्रॅम साखर टाकून पूर्ण विरघळून घ्यावे. हे द्रावण पातळ मलमल कापडातून दुसऱ्या पातेल्यात गळून घ्यावे. त्यात १ किलो अननसाचा गर टाकून एकजीव करावा. हे द्रावण थोडे गरम करून घ्यावे. थंड झाल्यावर एका ग्लास मध्ये थोडा स्क्वॅश घेऊन त्यात २ ग्रॅम पोटाशियम मेटाबायसल्फाईट टाकून चांगले विरघळून घ्यावे. निर्जंतुकीकरण करून घेतेलेल्या स्वच्छ बाटलीत भरून ठेवावे व हवाबंद कराव्यात. याचा वापर करताना एका पेल्यासाठी तीन पेले पाणी या प्रमाणात मिसळून ते सरबतासारखे वापरावे.

 • अननसाचा मुरंब्बा
  पूर्णपणे पिकलेला अननस घेऊन त्याची साल काढून घ्यावी. मोठे कापं करून मधील दांडा काढून घ्यावा. त्या पूर्ण कापांचे वजन करून घ्यावे, तेवढीच साखर असे प्रमाण असावे. पातेल्यात पाणी घेऊन त्यात साखर व २ ग्रॅम सायट्रिक आम्ल घालून तीन तारी पाक तयार करावा. त्यात अननसाचे काप वेलची पूड टाकून पाकातल्या फोडी मंद आचेवर शिजताना पाकाला मधासारखा दाटपणा आल्यावर मुरंब्बा झाला अस समजावे. गार झाल्यावर बरणीत भरून ठेवावे.

लेखक:
श्री. शैलेंद्र कटके, प्रा. हेमंत देशपांडे, प्रा. डॉ. अरविंद सावते
अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
9970996282

pineapple अननस ब्रोमेलिएसी bromeliaceae ananas comosus
English Summary: Different Processed products from Pineapple

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.