आवळा हे फळ औषधी गुणधर्माने व त्यातील जीवनसत्व 'क' च्या मात्रेमुळे जगभर ज्ञात आहे. औषधी गुणधर्मांबरोबरच त्याचे आहार मुल्यही चांगले आहे. आवळा फळाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य गरात 700 मि.ग्रॅ.पर्यंत क जीवनसत्व व इतर खनिजद्रव्ये आणि तंतुमय पदार्थही भरपूर प्रमाणात असतात. आवळयावर प्रक्रिया करून आवळा मुरंबा, आवळा लोणचे, आवळाप्राश, आवळा स्क्वॅश, आवळा सुपारी, आवळा कॅन्डी, आवळा जॅम आदी चवदार पदार्थांची निर्मिती करता येते. या फळामध्ये तुरटपणा जास्त असल्यामुळे ताजी फळे तशीच खाणे अवघड जाते. या करीता आवळा प्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यावर प्रक्रिया करणारे लघु व मध्यम उद्योगाची श्रुंखला ग्रामीण भागात उभी करून शेतकर्यांना चांगला मोबदला मिळू शकतो.
आवळयापासून तयार होणारे काही महत्वाचे पदार्थ खालील प्रमाणे.
आवळा कॅन्डी: आवळा कॅन्डी तयार करतांना मोठया आकाराची पक्व फळे निवडून प्रथम पाण्याने धुवून घ्यावीत त्यानंतर उकळत्या पाण्यात त्यांना टाकावे. या प्रक्रियेला ब्लंचींग असे म्हणतात. फळे काढून ती थंड होऊ दयावी व सुरीच्या सहाय्याने त्याच्या फोडी करून बी बाजूला करावीत. आवळा मोजून त्यानंतर त्यात 1:0.7 असे साखरेचे प्रमाण घेवून झाकण बंद पातेल्यात ठेवून 24 तासांकरीता ठेवावे व दररोज त्यामध्ये साखर टाकून त्याचा 72 अंश ब्रिक्स वाढवावा व त्यानंतर कॅन्डी काढून वाळवावी. कॅन्डी पॉलीथीन बॅगमध्ये भरून विक्रीसाठी पाठवावी. |
|
आवळा मुरंबा: याकरिता प्रथम मोठया आकाराची पक्व फळांची निवड करून ती स्वच्छ पाण्याने घ्ाुवून फळांना 100 सेल्सिअस तापमानाच्या गरम पाण्याची प्रक्रिया 15 मिनिटे द्यावी. त्यानंतर फळे 2.5 पेक्टिक एन्झार्इमच्या द्रावणात 4 तासांपर्यंत बुडवून ठेवावीत. हया द्रावणातून फळे बाहेर काढून ती परत पाण्याने धुवून 35 अंश ब्रिक्स असलेल्या साखरेच्या पाकात 24 तासांपर्यंत बुडवून ठेवावीत. अशा प्रकारे पाकाचा ब्रिक्स दररोज 10 ब्रिक्स वाढवावा व शेवटी 72 ब्रिक्स आल्यावर मुरब्बा तयार झाला असे समजावे. |
|
आवळा लोणचे: मुरंबा करण्याकरिता वापरता येत नाहीत अशा लहान आवळा फळांचा वापर लोणचे तयार करण्याकरिता होऊ शकतो. आवळा फळे ही अत्यंत तुरट व आंबट असतात. त्याकरिता लोणचे तयार करण्याअगोदर आवळा फळे 0.5 टक्के अॅसेटिक अॅसिड व 1 टक्का हळद असलेल्या 10 टक्के मिठाच्या द्रावणात एक महिण्यापर्यंत ठेवावीत व नंतरच ती फळे लोणचे तयार करण्याकरिता वापरावीत. |
|
आवळा सुपारी: आवळा सुपारी ही मीठ लावून तयार करतात. हयाकरीता पूर्ण वाढलेली पक्व फळे निवडावीत, ही फळे स्वच्छ पाण्यात धुवून ती 3-4 मिनिटे उकळत्या पाण्यात टाकून थंड करावीत. या फळांचे तुकडे करावेत किंवा किसणीच्या सहाय्याने कीस काढावा. हया किसात 40 ग्रॅम मीठ प्रतिकिलो या प्रमाणात घेवून मिसळावे व सुर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रात 60 सेल्सिअस तापमानाला सुपारी वाळवावी. ही वाळवलेली सुपारी वजन करून प्लास्टिक पिशव्यांत भरून विक्रीला पाठवावी. आहारमुल्ये व मुखशुद्धीसाठी ही सुपारी चांगली आहे. |
|
आवळा स्क्वॅश: आवळा रसाचे स्क्वॅश बनविण्यासाठी रसाचे प्रमाण 45 टक्के टी.एस.एस. 50 टक्के व आम्लता 1 टक्का ठेवतात. हे पेय दीर्घकाळ टिकविण्यासाठी त्यामध्ये रासायनिक द्रव्ये वापरतात. आवळा स्क्वॅश बनविण्यासाठी एक ग्लास रस व 3 ग्लास पाणी या प्रमाणात वापर करावा. |
याशिवाय आवळा लाडू, आवळा सुपारी, आवळा पावडर यासारखे इतरही पदार्थ तयार करता येतात. त्याचे सविस्तर प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र, जालना येथे दिले जाते.
श्री. शशिकांत पाटील
विषय विशेषज्ञ (अन्नतंत्र)
कृषी विज्ञान केंद्र, जालना
7350013157
Share your comments