सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी बोरव्हा (ता. तेल्हारा, जि. अकोला) नावाचे शंभर उंबऱ्यांचे आदिवासी गाव आहे. गावात प्रवेश केल्यावर स्वच्छ सारवलेली घरं मनाला प्रसन्न करतात, जगण्यासाठी अतिशय मर्यादित साधनं आणि मोजकीच जागा लागते. मात्र मनाच्या श्रीमंतीसाठी मन मोठं लागतं, हे या गावातील लोकांनी इथे गेल्यानंतर काही वेळातच दाखवून दिले.
आपल्या लोकांना माणूस म्हणून जगता यावे, ते मुख्य प्रवाहात यावेत यासाठी धडपडणारी तरुणी नासरी चव्हाण हिची मुलाखत घेण्यासाठी आम्ही या गावात आलो होतो. नासरीचे गाव फिरुन बघितले, नासरीच्या प्रयत्नातून शासनाच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचल्या आहेत. शासनाच्या कृषी विभागाच्या प्रकल्पांतर्गत हे गाव निवडले गेले आहे. कंपोष्ट खत, रसायन विरहित फवारणीचे औषध या गावात गेल्या तीन वर्षांपासून वापरले जात आहे. नासरीबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा होती, त्यामुळे तिला बोलतं केलं. (खरं तर तीच आपल्याला बोलती करणारी आहे.)
माझ्या गावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे दुसऱ्या गावी जाऊन मी शिक्षण पूर्ण केले. माझ्या गावात १२ वी पर्यंत शिक्षण घेतलेली मी एकटीच मुलगी आहे. गावात आदिवासी विकासाच्या सरकारी योजनांच्या निमित्ताने अनेक वेळा अधिकारी येत-जात राहतात. पण या योजना मात्र आमच्यापर्यंत कधीच पोहोचत नव्हत्या. मी शिक्षण घेत असताना वडिलांसोबत योजनांची माहिती घेण्याचा प्रयत्न करीत असे. त्यातूनच मला ही समज आली की, आमच्यासाठी असलेल्या योजना गावात आल्या तरच आमचा विकास होईल. पण त्यासाठी आमच्या लोकांना आमच्याच भाषेत हे समजावून सांगून तयार करण्याचे काम मी केले. म्हणून मागील ४ वर्षापासून गावामध्ये शेळी पालनासाठी एकूण २३ कुटुंबांना प्रत्येकी ३ शेळ्या अशा ६९ शेळ्या अनुदानातून मिळाल्या. आता शेळ्यांची संख्या वाढली असून गावकऱ्यांना त्यापासून पैसा मिळत आहे. हे पाहूनच पुढे कृषि समृद्धी प्रकल्पामार्फत (CAIM) ४० कुटुंबांना कुक्कूट पालनासाठी ४०० कोंबड्या गावात उपलब्ध झाल्या. आता त्या कोंबड्यांच्या संख्येत वाढ झाली असून गावकऱ्यांना उत्पन्नाच्या साधनासोबतच रोजगार निर्माण झाला आहे.
माझ्या गावात सर्वच अशिक्षित आदिवासी शेतकरी आहेत. त्यामुळे आम्हाला शेती बद्दलचे ज्ञान नव्हते, आम्ही पारंपरिक शेतीच करत होतो. तालुक्यापासून गाव दूर असल्यामुळे शेतीबाबतची काही माहितीसुद्धा उपलब्ध होत नव्हती, त्यामुळे शेतीत कर्ज फेडण्या इतकेही उत्पन्न येत नव्हते. मात्र मागील ४ वर्षापासून शासकीय कृषि विकास प्रकल्पामार्फत सर्व विकास समितीच्या माध्यमातून मी गावात शेतकऱ्यांची शेती शाळेचे आयोजन करते आहे. त्यांच्यामार्फत बायोडायनॅमिक सेंद्रीय शेती पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे. यातूनच शेतीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या निविष्ठा जसे बायोडायनॅमिक कंपोष्ट कल्चर (एस-९) आम्ही घरीच तयार करायला शिकलो आहोत. आता माझ्या गावात घरोघरी एस-९ कल्चर तयार करण्यात येते. गावात ३० शेतकऱ्यांचे ३० युनिट असून वार्षिक १८०० किलो एस-९ निविष्ठा तयार केली जाते. नासरी घडाघडा बोलत होती तशी आमच्यासमोर त्या प्रक्रियेची क्षणचित्रे उभी राहत होती.
तिने अधिक खोलात जाऊन माहिती द्यायला सुरुवात केली. एस-९ कल्चरचा वापर करुन शेतकऱ्यांना सर्व पिकांना बीज प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण मी दिले आहे व पेरणीच्या दिवशी सर्वांच्या घरी जाऊन पुन्हा एकदा या गोष्टी सांगते. त्यामुळे पूर्वी कधीही बीजप्रक्रिया न केलेल्या शेतात आता बीजप्रक्रिया केल्यामुळे उगवण क्षमतेत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दरवर्षी १८०० एकर क्षेत्रावर बीजप्रक्रिया करण्यात येते. गावातील शेतकरी शेणखत ढिगांचे एस-९ वापरुन ३०-४० दिवसांत बायोडायनॅमिक कंपोष्ट करुन ते वापरतात. त्यामुळे आता आम्ही कोरडवाहू पिकांसाठी रासायनिक खते वापरणे बंद केले आहे. मुळात खर्च कमी आणि उत्पादन जास्त होत असल्यामुळे आदिवासी शेतकरी याकडे आपोआप आकर्षिला जात आहे.
सर्व शेणखत ढीग शेणाने लिपल्यामुळे गावात स्वच्छता आपोआपच होत आहे. यामुळे गाव स्वच्छ व सुंदर झाले आहे. या सोबतच शेतासाठी संपूर्ण कुजलेले बायोडायनॅमिक कंपोष्ट तयार होत आहे. हे खत तयार करण्याच्या सविस्तर पद्धतीबाबत मी अजूनही घरोघरी जाऊन पाठपुरावा व मार्गदर्शन करते. गावात एकूण ६५-७० कंपोष्ट ढीग तयार करण्यात येतात.
पीक फवारणीसाठी एस-९ व ऊर्जा यासोबतच गोमूत्र व झाडपाले वापरुन ७ दिवसांत पीक संरक्षण व टॉनिक करण्याचे मी प्रशिक्षण घेतले व गावातही त्याचा प्रसार करत आहे. त्यामुळे तालुक्याच्या दुकानावरुन विषारी औषधे आणण्याची गरज पडत नाही. पूर्वी बाजारातील किटनाशके फवारणी करताना अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाली. आता मात्र तो धोका नाही व गावातील नदी व नाले यांच्या पाण्यातही विष पसरत नाही. पूर्वी किटकनाशकाचे रिकामे डबे गावात पाणी घेण्यासाठी व धान्य काढण्यासाठी वापरत असत. या विषारी डब्यांमुळे विषबाधा होऊ शकते व आजार होतात हे शेती शाळेमध्ये शिकल्यानंतर मी घरोघरी जाऊन असे डबे न वापरण्याबाबत आग्रह धरला. मकर संक्रांतीला पहिल्या वर्षी मी नवीन प्लॅस्टिक मग/लोट्यांचेच वाण वाटले. आता माझ्या गावात औषधाचे डबे वापरणे मी थांबवले आहे.
आमच्या गावात शेती पूर्णपणे कोरडवाहू आहे. ओलिताची सोय नाही. शेती डोंगरपायथ्याशी असल्यामुळे आमच्या शेतात चढ-उतार आहेत. म्हणून उताराला आडव्या मशागतीचे प्रशिक्षण सर्व विकास समितीच्या रोमण साहेबांच्या मदतीने शेतकऱ्यांना दिले. आता मी सतत पाठपुरावा करत असते. पेरणी अगोदर घरातील महिलांनाही याची माहिती देते. आता माझ्या गावात व परिसरात ४० टक्के शेतावर उताराला आडवी पेरणी करण्यात येते. त्यामुळे आमची पिके पावसाची उघाड पडल्यासही सुकत नाहीत. यामुळे उत्पादन कमी होण्याचा धोका राहिला नाही. मेळघाटामध्ये कुपोषणामुळे बालमृत्यू होतात. माझ्या गावात असे होऊ नये यासाठी मी आदिवासी गर्भवतींना त्यांच्या वेळेनुसार भेटून सकस आहाराची व जीवनावश्यक औषधे नियमित घेण्याची माहिती देते. गावात या प्रयत्नाला यश येत असून बालमृत्यू होत नाहीत.
आदिवासी समाजात शिक्षणाची गोडी नसल्यामुळे मुलं/मुली शाळेत जाण्याचे प्रमाण कमी आहे. अनेक मुले शाळा सोडून घरीच राहतात. शाळेस न जाणाऱ्या अशा मुलामुलींना एकत्र करुन मी माझ्या घरीच दररोज सायंकाळी शाळा घेते व त्यांना माझ्या पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. माझ्या शाळेत २० मुले व १५ मुली दररोज येतात. यापैकी काही मुले येणाऱ्या शैक्षणिक वर्षात पुढच्या वर्गात प्रवेश घेतात. त्यांच्या पालकांनाही आपली मुले शिकावी याचे महत्त्व पटत आहे. यासाठी मी नागपूर येथे जाऊन १० दिवसाचे प्रशिक्षण घेतले आहे.
नासरी बोलत होती आणि आम्ही मंत्रमुग्ध होऊन हे सगळे कानात साठवत होतो. तिची काम करण्याची धडाडी, तिच्यातली ऊर्जा ही केवळ आदिवासी भागामध्येच नाव्हे तर इतर महाराष्ट्रातील मुलींत आली तर राज्यात अनेक नासरी निर्माण होतील. नासरीने आता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बी.ए. साठी प्रवेश घेतला आहे. तिला शिकायचे आहे आणि आपल्या आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे आहे.
लोकमत वृत्तपत्रातर्फे दिला जाणारा पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा पुरस्कार तिला मिळाला आहे. तसेच परदेशातली काही शिष्टमंडळे तिचे काम पाहण्यासाठी तिच्या गावात येऊन गेली आहेत. नासरीच्या कामाचा झपाटा मोठा आहे. गारगोटीला माहीत नसते आपल्या एका ठिणगीत किती ताकद आहे, नासरीचेही तसेच झाले आहे. तिची अंगभूत ताकद खूप मोठी आहे. तिच्या क्षमतेचा विचार करता तिचे क्षितीज अजून विस्तारावे यासाठी आम्ही तिला शुभेच्छा दिल्या आणि तिच्यातील त्या उर्जेला राज्यभर पोहोचविण्याचा विचार करतच आम्ही त्या गावाचा निरोप घेतला.
लेखक:
युवराज पाटील
(जिल्हा माहिती अधिकारी, सातारा)
Share your comments