शेतीमध्ये बियाणे ही मुलभूत बाब असून तो शेतीचा आत्मा आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागात पिकांमध्ये वाणांची विविधता आढळते. सद्या वातावरणातील बदल, पोषण व अन्नसुरक्षा, चांगले जीवनमान या आव्हानांसाठी स्थानिक पिकातील जैववैविधता संवर्धन ही काळाजी गरज आहे. बायफ, पुणे या संस्थेने लोकसहभागातून स्थानिक पिक जातीचे संवर्धन, संरक्षण व पुनर्वापर कार्यक्रम सुरू केला आहे. त्यांनी 350 प्रकारचे भात (धान), नाचणी, ज्वारी, मका, वरई, चवळी, वाल, गहू, कडधान्ये, भाजीपाला पिके इ. यांचे एकूण 550 प्रकारचे स्थानिक वाण संकलित केलेले आहेत. या वाणांची शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड केली आहे. त्यातील चांगले बियाणे निवडून अधिक उत्पादन देणारे शुद्ध वाण विकसित केलेले आहेत.
तसेच शेतकरी गट व बियाणे बँकांची निर्मिती असे उपक्रम चालू आहेत. या संस्थेचे श्री. संजय पाटील या क्षेत्रात गेली 12 वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी शेतकर्यांच्या भेटी व चर्चा, स्थानिक वाणांचे निरीक्षण, शेतकर्यांनी शुद्ध बियाणे निवडण्याची ही सोपी पद्धत म्हणजे अनुवंशशास्त्राचा (ॠशपशींळलळी) व्यवहारातील सुयोग्य उपयोग आहे. दरम्यान मिळालेली माहिती शेतकर्यांच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने देत आहे.
स्थानिक बियाण्यांची वैशिष्ट्ये:
काही जुन्या भात (धान) व अन्य बियाण्यांची चव अतिशय उत्तम आहे. तसेच काही पौष्टिक आहेत. या नैसर्गिक परिस्थितीत दिर्घकाळ टिकून असल्याने बहूतांश वाण काटक आहेत. हे वाण कमी-जास्त पाऊस व अन्य प्रतिकूल परिस्थितीतही तग धरतात. या वाणांमध्ये प्रतिकारक क्षमता चांगली असल्याने रोग-किडीचा कमी प्रादुर्भाव होतो. यातील बहुतांश भात (धान) जातीचे टरफल जाड असल्याने व अन्य कारणामुळे दाण्याचे किडीपासून कमी नुकसान होते. स्थानिक जातींमध्ये जैववैविध्य मोठ्या प्रमाणात आढळते. डोंगराळ भाग, सखल भाग, खाडी किनार्याचा भाग अशा विविध भौगोलिक परिस्थितीमध्ये येणारे वाण आहेत.
तसेच हळवा, निमगारवा, गरवा अशा विविध कालावधीत येणारे वाण आहेत. कोथंबीर साळ तांदळाला सुगंध आहे. बदलत्या हवामानाच्या काळात या बियाण्यांचे जतन व संवर्धन आवश्यक आहे. या वैशिष्ट पूर्ण पिक जातींच्या स्थानिक ज्ञानाचे संकलन, तसेच शुद्ध बियाणांची निर्मिती करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची नितांत आवश्यकता आहे. यामुळे बियाण्यांमध्ये स्वंयपूर्णता येईल. स्थानिक वाणांमध्ये असणारी पोषकता, औषधी गुणधर्म, उत्तम चव, सुगंध यामुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये मागणी वाढत आहे.
कोकणातील स्थानिक भात प्रकार व उपयोग:
- लाल तांदूळ: राता, महाडी, मुरकुचा, काळा बेळा, लाल वालय, सोरटी, कोचरी, लाल मुणगा/मुंडगा, सनाना, दोडक, तांबडी पटणी, सरवट इ.
- पांढरा तांदूळ: कोलम, सफेद बेळा, सफेद वालय, येलकट, शिरटी, भरडे तुरई, डामगा, कोथंबीर साळ, राजवेल, पटणी, घोलम, आंबेमोहोर, सोनफळ, लवेसाळ, घाटे वरंगळ इ.
- उपयोग: स्थानिक भातापासून तांदूळ, उकडा तांदूळ, पोहे, भाकरी, पेज, मोदक, खीर, लाडू, पापड/फेणी, शेवया असे विविध पदार्थ बनविले जातात. या स्थानिक वाणांपासून पशुधनासाठी चांगला चारा उपलब्ध होतो.
भाताच्या पौष्टीक गुणधर्माचा स्थानिकांकडून वापर व पारंपारिक ज्ञान (ITK):
- आयुर्वेदामध्ये लाल दाणे (रक्तशाली) असलेल्या तांदळामध्ये सर्वश्रेष्ठ गुण असल्याचे नमूद केले आहे. लालदाणा असलेल्या तांदुळामध्ये उपयुक्त मुलद्रव्य अधिक प्रमाणात असल्यामुळे औषधी गुणधर्म आहेत. राता, लाल वालय, बेळा, पटणी, लाल मुणगा/मुंडगा, सरवट इ. जातीच्या तांदळाची पेज अतिशय पौष्टीक आहे. त्यामुळे शरीराचा अशक्तपणा जापण्यासाठी वापरली जाते. एक ग्लास पेज एक सलाईन प्रमाणे ऊर्जा देते.
- महाडी हा लाल दाण्याच्या तांदुळ महिलांना बाळंतपणातील थकव्यावर मात करण्यासाठी वापरला जातो. यामध्ये कॅल्शियम व फॉस्फरसचे प्रमाण चांगले असल्याने हाड फ्रॅक्चरनंतर जुळून येण्यासाठी मदत होते असे म्हणतात.
- श्री. परशुराम लांबे ता. खेड (8788053648) यांना सरवट या लाल दाण्याच्या तांदळाचे पेटंट मिळण्यासाठी अर्ज सादर केला आहे. हा तांदूळ महिलांना बाळांतपणातील थकव्यावर मात करण्यासाठी वापरला जातो. मधुमेह झालेल्या व्यक्तींना उपयुक्त आहे. तसेच याचे सेवन एक महिना केल्यास शरिरातील विषारी घटकांचा प्रभाव कमी होतो. अशी श्री. लांबे यांनी माहिती दिली आहे.
- लाल तांदळाची पेज ताप किंवा अन्य आजारातील अशक्तपणा जाण्यासाठी पुर्वापार वापरली जाते. पावस, रत्नागिरी जवळील श्री. हरिश्चंद्र बेहरे (9423049939) हे सेंद्रिय पद्धतीने पारंपारिक भाताची लागवड करतात. कॅन्सर झालेल्या पेशंटला केमोथेरेपी हा औषधोपचार करण्यात येतो. त्यानंतर पेशंटला खूप थकवा येतो. श्री. बेहरे यांच्याकडील तांबडी पटणी व मुणगा या प्रकारचा लाल तांदूळ अनेक व्यक्ति हा थकवा कमी होण्याकरीता पेज करण्यासाठी घेवून जातात. अशी माहिती त्यांनी दिली.
- खाडीजवळील क्षारयुक्त जमिनीत राता हा लाल तांदुळ पिकतो. हा अतिशय पौष्टीक आहे. याची भाकरी मऊ व उत्तम होते. त्याचबरोबर हा तांदुळ अर्धा कच्चा शिजवून शेतावर नांगरणी करणार्या बैलांना उर्जेमध्ये वाढ होण्यासाठी देण्यात येतो. तसेच दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी दुधदुभत्या जनावरांना देण्यात येतो.
- पॉलिश न केलेले तांदूळ अधिक पौष्टीक असतात. या तपकिरी तांदळावर (इीेुप ठळलश) कोंड्याचे आवरण असल्याने त्यास शिजण्यास अधिक वेळ लागतो. सामान्यत: एक वाटी तांदळास दोन ते अडीच वाटी पाणी लागते. तसेच हा तांदुळ शिजविण्यापुर्वी दोन तास भिजत ठेवल्यास नेहमीपेक्षा कमी वेळात शिजतो व मऊ होतो.
पारंपारीक वाणांमध्ये असणारे औषधी गुणधर्म याबद्दल अधिक संशोधन होण्याची गरज आहे.
पारंपारीक बियाण्यांमधील अडचणी व सोप्या उपाययोजना:
अनेक चांगले गुणधर्म असूनही काही अडचणींमुळे जुन्या भाताची लागवड कमी झाली आहे. शुद्ध बियाणे उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे उत्पादन नवीन सुधारीत/संकरीत जातीपेक्षा कमी येते. काही जातीमध्ये फुटवा कमी येतो. तसेच काही जाती उंचीने जास्त असल्याने पिक शेवटच्या टप्प्यात जमीनीवर लोळते व नुकसान होते.
सोप्या उपाययोजना:
बियाणे निवड करताना अधिक फुटवा असणार्या निरोगी रोपांच्या सशक्त लोंबीतील दाणे निवडून शुद्ध बियाणे टप्याटप्याने तयार करावे. तसेच पिक उत्पादन वाढविण्यासाठी व पिक न लोळण्यासाठी वर नुमद केल्याप्रमाणे सेंद्रिय खते वापरावीत.
अधिक उत्पन्नासाठी शुद्ध बियाणे निवड पद्धती (उदा. भात/धान):
टप्पा क्र. 1
भेसळ काढणे: सर्व प्रथम भात (धान) शेतीचे निरीक्षण करून अधिक उंची असणार्या रोपाच्या लोंब्या, बुटक्या रोपाच्या अशक्त लोंब्या, कुसळ असणार्या लोंब्या, किड-रोग असणार्या, तसेच पोकळ लोंब्या काढून टाकाव्यात. अशा प्रकारे भेसळ काढल्यानंतर सर्वधारण एक सारखे पिक दिसेल.
टप्पा क्र. 2
सशक्त लोंब्या निवडणे: यासाठी बांधाजवळील लोंब्या न निवडता सर्व शेतातून निवडाव्या, किडीचा प्रादुर्भाव झालेल्या चुडातील (आव्यातील) लोंब्या निवडु नयेत, खालुन वर निरीक्षण करून अधिक फुटवा असणारा मजबुत चुड निवडावा. काही रोपांना लोंबी (कणीस) येत नाही. त्यामुळे चुडातील रोपांची संख्या व लोंब्यांची संख्या मोजावी. त्यात लोंब्यांचे प्रमाण तसेच दाणे अधिक असणारे चुड निवडावे. दाण्यावर रोगाचा प्रादुर्भाव नसावा. लोंब्या वाकलेल्या असल्यामुळे हातावर घेऊन वजनाचा अंदाज घेता येतो. त्यामुळे वजनदार व सशक्त लोंब्या निवडून कापाव्यात. अशाप्रकारे किडमुक्त व सशक्त लोंब्या मिळतात.
टप्पा क्र. 3
सशक्त बियाणे निवडणे: या कापलेल्या लोंब्याचे पुन्हा सुक्ष्म निरीक्षण करून ज्या तुरळक दाण्यांवर बुरशी किंवा अन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या असल्यास ते दाणे बाजूला काढावे. अशाप्रकारे उरलेले सशक्त दाणे सुकवावे. यानंतर या चांगल्या दाण्यातील एक समान दाणे निवडावेत. यासाठी भिंगाचा वापर सोईस्कर होईल. हे दाणे योग्य रितीने साठवण करून ठेवावेत व पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून वापरावेत.
टप्पा क्र. 4
उत्तम रोप व बियाणे निवड करणे: मागील हंगामामध्ये निवडलेल्या सशक्त बियाण्याचे एक-एक रोप हे ठराविक अंतरावर लावावे. हे पिक तयार झाल्यानंतर किड-रोग ग्रस्त व कमी जास्त उंचीच्या लोंब्या/रोपे बाजुला काढून टाकावीत. फुटव्यांची संख्या पहावी. मूळ मातृरोपाची लोंबी सशक्त असते. त्यामुळे ज्याला उत्तम फुटवे आहेत अशा निरोगी चुडातील मुळ रोपाच्या सशक्त लोंब्या निवडून कापाव्यात. त्या लोंब्यातील रोगग्रस्त तुरळक बी बाजुला काढून एकसमान उत्तम बियाणे निवडावे. हे उत्तम बियाणे सुकवून व साठवुन पुढील हंगामासाठी वापरावे.
टप्पा क्र. 5
सर्वोत्तम शुद्ध बियाणे निवडणे: उत्तम बियाण्याचे एक-एक रोप लावावे व निरोगी मातृरोपाची सशक्त लोंबी निवडण्याच्या वरील पद्धतीनुसार सर्वोत्तम बियाणे निवडावे. अशा पद्धती प्रत्येक हंगामात वापरून सर्वोत्तम शुद्ध बियाणे मिळवता येते. या निवड पद्धतीने आपण भरपूर उत्पन्न देणार्या व रोगप्रतिकारक स्थानिक शुद्ध वाणांची निवड, संवर्धन व लागवड करू शकतो.
शेतकर्याने अशा प्रकारे स्वत:च शुद्ध बियाणे निवडून वापरल्यास बाहेरून बियाणे खरेदी करण्याची गरज राहत नाही. त्यामुळे खर्चातही बचत होते. याच निवड पद्धतीने शेतकरी स्थानिक बियाण्यांप्रमाणेच सुधारीत जातींमधूनही चांगले बियाणे निवडू शकतात. मात्र संकरीत जातीच्या बियाण्यांच्या बाबतीत ही प्रक्रिया उपयुक्त नाही. निवड प्रक्रियेद्वारे आपण धान्य, कडधान्ये व भाजीपाला यांच्या शुद्ध बियाणांची निवड, जतन व संवर्धन करू शकतो. अशाच पद्धतीने निरोगी, काटक, सुदृढ व भरपूर उत्पन्न देणारे पशुधन विकसीत करू शकतो.
बायफ संस्था पुणे व वसुंधरा विज्ञान केंद्र नेरूरपार, कुडाळ, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बियाणे संकलन, निवड प्रकिया, बियाण्यांची बँक इत्यादीबाबत उपक्रम सुरू केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात पालघर-जव्हार, अहमदनगर-अकोले, नंदुरबार-धडगांव, गडचिरोली-एटापल्ली, पुणे-जुन्नर इत्यादी ठिकाणी बायफ च्या माध्यमातून बियाणे संवर्धनाचे काम सुरू आहे. यात वेगवेगळ्या पिकांच्या 650 हून अधिक वाणांचे संवर्धन केले जात आहे. प्रामुख्याने भात, वरई, नाचणी, मका व ज्वारी इ. पिकांचा समावेश आहे.
संशोधक शेतकरी
मेंडल या अनुवंश शास्त्राच्या (Genetics) जनक शास्त्रज्ञाने वाटाण्यावर विविध प्रयोग केले. सुरूवातीच्या दोन वर्षात त्यांनी निवड पद्धतीचा अवलंब करून उंच तसेच बुटके असे विशिष्ट गुणधर्म असणारी शुद्ध रोपे मिळविली. तसेच नंतरच्या काळात इतर प्रयोग केले. ही निवड प्रक्रिया सर्वसाधारण माणसे सुद्धा करू शकत असल्यामुळे काही माणसे उत्तम प्रकारचे बियाणे तयार करीत आहेत.
- चंद्रपुर जिल्ह्याच्या खेड्यातील दादाजी खोब्रागडे यांना एके दिवशी शेतामध्ये एक पिवळ्या रंगाची भरपूर दाणे असलेली भाताची वैशिष्ट्यपूर्ण लोंबी दिसली. त्या रोपाची नीट काळजी घेवून ते बियाणे वेगळे काढले. त्याची दरवर्षी लागवड करून एच. एम. टी. नावाची भरपूर उत्पन्न देणारी तांदळाची जात शोधली. अशाप्रकारे त्यांनी भाताच्या नऊ जाती शोधल्या. प्रतिकूल परिस्थितीमुळे ते प्राथमिक शाळेपर्यंत शिकले. मात्र उत्तम निरिक्षण शक्ती, चिकाटी यांच्या सहाय्याने त्यांनी कृषी क्षेत्रात प्रगती केली.
- राहीबाई पोपेरे यांनी स्थानिक भात, वाल, घेवडा, भाजीपाला पिके, औषधी वनस्पतीचे वाण जतन करून बायफ संस्थेच्या सहकार्याने बियाणे बँक सुरू केली आहे.
- निरीक्षण व निवड करून प्रकाशसिंग रघुवंशी यांनी गहू, तुर, तांदूळ, हरभरा, मूग यांच्या भरपूर उत्पन्न देण्यार्या जाती विकसीत केल्या.
- कर्नाटकमधील लक्ष्मीबाई झुलापी यांना त्यांच्या शेतात वांंग्याचे वेगळे झाड दिसले. त्यापासून त्यांनी भरपूर उत्पन्न देणार्या चविष्ट वांग्याच्या जातीचा शोध लावला.
- धिरजलाल ठुम्मर हे गुजरात मधील शेतकरी आहेत. यांच्या शेतात भुईमुगावर रोग आला आणि प्रचंड नुकसान झाले. ते पिक बघण्यासाठी शेतात गेले. त्यांना थोडी झाडे ही निरोगी दिसून आली. तेव्हा या झाडांमध्ये रोगावर मात करण्याची प्रतिकार शक्ती असल्याचे जाणवले. त्यांनी त्या बियाण्यांपासून इतर झाडे तयार केली व रोगप्रतिकारशक्ती असणारी जात विकसीत केली.
- सर्वसामान्य माणसांमधील अशा संशोधकांना नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन तर्फे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येते.
- मावंजी पवार या जव्हार तालुक्यातील तरूणाने भाताच्या साधना, किर्ती व कमल अशा तीन जाती निवड पद्धतीने विकसीत केल्या. तसेच विविध पिकांचे 45 दुर्मीळ वाणांचे (बियाण्यांचे) संकलन केले आहे.
- जव्हार तालुक्यातील सुनिल कामडी यांनी भाताची अश्विनी नावाची जात विकसीत केली आहे. या दोघांनीही विकसीत केलेल्या जातींचे पस्तीस ते पंचेचाळीस क्विंटल असे भरघोस उत्पन्न मिळते. काही कारणांमुळे उच्च शिक्षण घेता आले नाही. तरी संशोधन कार्य करता येते हे यांनी सिद्ध केले आहे.
आपल्या पुर्वजांनी ही बहुमुल्य पारंपारीक बियाणी शेकडो वर्षे जपली. भावी पिढीसाठी त्यांची लागवड करून पुनरूज्जीवन करणे ही काळाची गरज आहे. स्थानिक पारंपारिक बियाण्यांचे जतन, संवर्धन व पुनर्वापर यासाठी बियाणे निवड पद्धतीचा अवलंब करावा. शेतकर्यांनी या महत्वपूर्ण बाबीचा अंगीकार केल्यास त्यांना निश्चितच फायदा होईल. कृपया ही माहिती इतर शेतकर्यांनाही द्यावी.
लेखक:
श्री. प्रमोद जाधव
(उप-आयुक्त, समाज कल्याण)
श्री. संजय पाटील
(प्रकल्प समन्वयक, बायफ, जव्हार-पालघर)
९९२३९३१८५५
Share your comments