शेतीला शाश्वती नसल्याने आज कालचा तरुणवर्ग शेती करण्यास तयार होत नाही किंवा वळताना दिसत नाही. मात्र अशातच एक उच्चशिक्षित तरुण आपल्या शिक्षणाचा वापर करून शेतीतून लाखो रुपयांची उलाढाल करत आहे. त्यामुळे त्याला निश्चितच एक तरुण यशस्वी शेतकरी म्हणून ओळखले जाते. जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील एक छोटस गाव संगमपूर. संगमपुर मध्ये गणेश लहाने यांची दहा एकर शेती आहे. त्यात गणेश यांनी कपाशी, मका आणि कांदा शेती यशस्वी केली आहे. त्यातून हा तरुण शेतकरी वर्षाकाठी १५ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवत आहे.
गणेश यांचे MA पर्यंत शिक्षण पूर्ण झालेले आहे. परंतु नोकरीच्या मागे न जाता त्यांनी शेती करणं पसंद केलं असून त्यांना त्याचा फायदा देखील झाला आहे. यात त्यांना त्यांचे आई वडील आणि बायकोची मोठी साथ लाभली. या प्रगतशील शेतकऱ्याची बायको गीता यांचे शिक्षणही बीएड पर्यंत झालेले असून गणेशला शेती करण्यास त्या मदत करतात. या सर्वांच्या जोरावर त्यांनी कपाशी मका आणि कांदा ही शेती यशस्वी करून दाखवली आहे. शेतीसोबतच गणेश ग्रामपंचायत मध्ये लिपिक म्हणूनही काम करतात.
गणेश यांच्या घरी त्यांच्या आजोबांपासूनच शेती व्यवसाय केला जातो. पण पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देवून गणेश यांनी शेतीत नवनवीन प्रयोग सुरू केले. जसे की सेंद्रीय खताचा वापर, पाणी व्यवस्थापन आणि जमिनीची मशागत तन व्यवस्थापन, ठिबक सिंचन.
कपाशीतून चांगले उत्पन्न -
गणेश यांच्याकडे दहा एकर जमीन असून त्यातील सहा एकर वर ते दरवर्षी कपाशीचे पीक घेतात. त्यातून त्यांना जवळपास ११ ते १२ लाख रुपयांचे उत्पन्न निघते. दरवर्षी वापरत असलेले किटकनाशक, बुरशीनाशक कपाशीच्या अवस्थेनुसार वापरले असून एकरी १ टेलर शेणखत या शेताला टाकले आहे. या कपाशी करीता गणेश यांना एकरी १२-१५ हजार खर्च आलेला आहे. ज्यात बियाणे, मशागत, लागवड, खते, औषध फवारणी, आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर सोयाबीन मका, कांदा, मिरची या पिकांचे ही उत्पादन ते घेत असतात. गणेश सांगतात की माझ्या जमिनीचा सामू उत्तम असल्याकारणाने पाऊस थोडा कमी जास्त असला तरी माझी जमीन तग धरू शकते आणि त्यामुळे उत्पादन चांगले येते.
गणेश सांगतात की, माझे वडील शेतकरी असल्याने मलाही शेतीची आवड लागली आणि त्यामुळे मला चांगला नोकरीच्या संधी येवूनही मी शेती करण्याचा पर्याय निवडला. मागील दहा वर्षांपासून एक प्रगतशील शेतकरी म्हणून मी शेती करत आहे. आता मी माझ्या अनुभवाच्या जोरावर शेती करून चांगले उत्पन्न मिळवत आहे. कोरोना काळात मोठे नुकसान झाले कांदा कपाशी, मका हे हाताशी आलेलं पीक तसंच सोडून द्यावं लागलं. त्यामुळे कांदा तसाच सडून गेला आणि कपाशीला नंतर चांगला भाव मिळाला नाही त्यामुळे खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. तरीही मी खचून न जाता परत जिद्दीने काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील वर्षी सोयाबीनचे पीक घेऊन एकरी ४० ते ४५ क्विंटल उत्पादन मला मिळाले. तसेच सोयाबीन नंतर थोडा चांगला पाऊस पडल्याने मी लगेच मक्याचे पीक घेऊन त्यातही एकरी ५० ते ६० क्विंटल उत्पादन मिळवले.
शेतीत शेणखताचा वापर -
गाई, बैल आणि म्हशींचा शेणापासून मी खत तयार करतो. त्याचबरोबर गांडूळ खतही तयार करतो. पिकांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी या खतांचा फायदा होतो. त्याचबरोबर रासायनिक खतांची योग्य फवारणी आम्ही वेळोवेळी करत असतो. त्यामुळे पिकांवर पडणाऱ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच शेतामध्ये रासायनिक खतांसोबत सेंद्रिय खताचाही जास्त वापर केला जातो. त्यामुळे शेतातील जमिनीचे आरोग्य चांगले राहते आणि पीक चांगल्या प्रकारे येते.
शेतीला जोडधंदा म्हणून पाण्याचाही व्यवसाय -
शेतीला जोडधंदा म्हणून पाण्याचाही व्यवसाय गणेश करतात. त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने गावातील ५० ते ६० घरांना पाणी पुरवतात. मागच्या सात वर्षांपासून एक प्रायव्हेट योजना तयार केली आहे. एक घर एक नळ अशी ही योजना असून ते या योजनेद्वारे घरांना पाणी पुरवतात. त्यासाठी त्यांनी विहिरीपासून त्या घरापर्यंत पाईपलाईनची व्यवस्था केलेली आहे. दरवर्षी गावातील त्या कुटुंबीयांकडून ते फक्त तीन हजार रुपये पाण्याचा दर घेतात. गणेश सांगतात की आपल्या शिक्षणाचा वापर फक्त नोकरीसाठी न करता तरुणांनी शेतीकडे वळले पाहिजे आणि शेतीला आधुनिकतेची जोड देऊन एक यशस्वी शेतकरी बनले पाहिजे आणि त्यातून आपली प्रगती साधली पाहिजे.
Share your comments