Success Story :- तुर हे डाळवर्गातील एक प्रमुख पिक असून महाराष्ट्रमध्ये खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर तुरीची लागवड केली जाते. बरेच शेतकरी आंतरपीक म्हणून देखील तुर पिकाचा अंतर्भाव करतात. चांगले व्यवस्थापन आणि नियोजन केल्यानंतर तुरीची पीक उत्तम येते व त्याला बाजारभाव देखील बऱ्यापैकी असतो. याच अनुषंगाने जर आपण अभंग शेवाळे व केदार शेवाळे हे शंकरपूर बोरुडी येथील शेतकरी बंधूंचा विचार केला तर ते तब्बल 34 एकर क्षेत्रावर तुरीचे पीक घेतात.
ते प्रामुख्याने दोन वर्षापासून तुरीचे बागायती वाण गोदावरीची लागवड करतात. जवळजवळ पाच वर्षापासून ते तूर शेतीमध्ये असून यावर्षी त्यांनी सलग क्षेत्रावर 22 एकर व आंतरपीक म्हणून बारा एकर असे तुरची पीक घेण्याचे नियोजन केले आहे.
अशा पद्धतीचे असते त्यांचे तुरीचे नियोजन
1- साधारणपणे एप्रिलमध्ये ते शेताची खोल नांगरणी करून जमीन चांगली तापू देतात व जून महिन्यांमध्ये रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत करून तुरीसाठी सऱ्या पाडतात. त्यानंतर पाऊस झाल्यावर टोकन पद्धतीने तुरीची लागवड केली जाते.
2- लागवडी करता ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाच फुटावर सरी पाडतात व त्यावर तुरीची लागवड करतात. तुरीच्या सुधारित वानांचा लागवडीसाठी वापर करायला सुरुवात केल्यानंतर ते आठ फूट बाय दीड फूट अंतरावर लागवड करतात.
3- या पिकाला खतांचे व्यवस्थापन करताना ते लागवड केल्यानंतर 25 दिवसांनी डीपीच्या दोन बॅग, एमओपीचे एक बॅग, दहा किलो फेरस सल्फेट, दहा किलो जिंक सल्फेट आणि दहा किलो सल्फर असा एक पायाभूत डोस देतात.
4- तुर पिकाचे सगळ्यात नुकसान करणाऱ्या किडी म्हणजे शेंगा पोखरणारी तसेच फुलोरावस्थेमध्ये येणारी घाटेअळी, पिसारी पतंग हे होय. या किडीच्या नियंत्रणासाठी ते प्रत्येक वर्षाला सात ते आठ फवारण्या घेतात. यातील एक किंवा दोन फवारण्या पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासू नये यासाठी करतात तर तीन ते चार फवारण्या कीड व रोग नियंत्रणासाठी घेतात.
5- किडनियंत्रणाकरिता ते प्रामुख्याने जैविक घटकांचा देखील वापर करण्यावर भर देतात. यामध्ये ट्रायकोकार्डचा वापर ते करतात. तसेच पहिल्यांदा 25 ते 30 दिवस झाल्यानंतर ठिबकने ट्रायकोडर्मा प्रती एक दोन लिटर देतात व त्यानंतर 60 दिवसांनी व 90 दिवसांनी ठिबकने तीन वेळा ट्रायकोडर्मा दिले जाते.
यापुढे नियोजन ते कसे करतात?
या कालावधीमध्ये तूर हे कायिक वाढ अवस्थेमध्ये असून या महिन्यांमध्ये ते प्रामुख्याने तणनियंत्रणाकरिता कोळपणी करण्यावर भर देतात व सोबत निंदनी व पिकाला मातीची भर हे महत्त्वाची कामे केले जाणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले. मर रोगापासून तूरीचे नुकसान होऊ नये याकरिता ते सुरुवातीपासूनच ट्रायकोडर्माचा वापर करण्यावर भर देतात. या सगळ्या नियोजनाचा परिपाक म्हणजे त्यांनी मागच्या वर्षी 14 क्विंटल उत्पादन प्रती एकर अशा पद्धतीने घेतले होते.
Share your comments