नाशिक: प्रतिकूल परिस्थितीतही सक्षम राहण्यात आणि गोड चवीचे उत्पादन देण्यासाठी कॅलिफोर्नियातील ‘आरा’ वाण जगप्रसिध्द आहेत. यातील काळ्या रंगाचा ‘आरा-32’ हा वाण भारतात नुकताच दाखल झाला आहे. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या प्रक्षेत्रावर मंगळवारी (ता.19) या वाणाचे सीडलींग्स आणण्यात आले. ‘सह्याद्री’ने यापुर्वी आयात केलेल्या ‘आरा-15’चे यशस्वी उत्पादन घेतल्यानंतर ‘आरा 32’ हे पुढचे महत्वाचे पाऊल मानले जात आहे.
राज्यातील द्राक्ष उत्पादकांना मागील अनेक वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत ही शेतीच संकटात सापडली आहे. ‘आरा’ सारखे जागतिक दर्जाचे वाण अशा प्रतिकूल हवामानातही खात्रीचे आणि दर्जेदार उत्पादन देतात हे आतापर्यंत दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘सह्याद्री’ने या वाणांची आयात करुन द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
निर्यातक्षम ‘आरा’ या जागतिक वाणाचे सर्वाधिक अधिकार ‘सह्याद्री’ सारख्या देशातल्या आघाडीच्या शेतकरी उत्पादक कंपनीला मिळाल्याने केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील द्राक्ष उत्पादकांना विशेषत: छोट्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
द्राक्षाच्या सुप्रसिध्द ‘आरा’ या कॅलिफोर्नियातील द्राक्ष वाणांच्या श्रेणीचे भारतातील उत्पादन आणि विक्रीचे सर्वाधिकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या मालकीची असलेल्या आणि शेतकऱ्यांकडून चालवली जात असलेल्या नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला मिळाले आहेत. शेतकऱ्यांसाठी परदेशातून पेटंटड द्राक्ष वाण आयात करणारी ‘सह्याद्री फार्म’ ही देशातील पहिलीच कंपनी ठरली असून देशाच्या फलोत्पादन नव्हे तर कृषिक्षेत्रातील ही अत्यंत महत्वाची आणि अभिमानास्पद घटना आहे.
सहा खंडांमधील 24 देशांत ‘आरा’ जातीची द्राक्षे उत्पादित केली जातात. भारताचा समावेश आता या देशांमध्ये झाला आहे. भारतातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत आपले स्थान अधिक भक्कम करण्यास ‘आरा’ वाणांमुळे फायदा होणार आहे. या पेटंटेड ‘आरा’ टेबल ग्रेप्सच्या (खाण्याची द्राक्षे) व्हाईट, रेड आणि ब्लॅक या तीन प्रकारांत एकाहून एक सरस अशा निर्यातक्षम जाती आहेत.
द्राक्षामधील जागतिक पायाभूत सुविधा आणि जागतिक बाजारपेठेचा फायदा मिळणे ‘सह्याद्री’मुळे शेतकऱ्यांच्या आवाक्यात आले आहे. द्राक्षे उत्पादन आणि विक्रीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. ‘आरा’ वाणांमुळे आगामी काळात राज्याच्या आणि अर्थातच ‘ग्रेप कॅपिटल’ समजल्या जाणाऱ्या नाशिकच्या द्राक्ष उत्पादन क्षेत्रात क्रांतिकारी बदल अपेक्षित आहेत.
सह्याद्रीने या आधी आयात केलेल्या पेटंटेड आरा 15 या वाणांची प्रक्षेत्र चाचणीनंतर शेतकऱ्यांच्या शेतात 40 हेक्टरवर यशस्वी लागवड झाली आहे. 2020 पर्यंत सह्याद्री ‘आरा’चे सर्व वाण निर्यातीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देणार आहे. 2023 पर्यंत लागवडीखालील क्षेत्र 2 हजार हेक्टरपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे.
पुढील 6 महिन्यात ‘आरा’चे सर्व वाण भारतात उपलब्ध होणार
जगभर लोकप्रिय असलेल्या ‘आरा‘ जाती पुढील प्रमाणे आहेत. आता ‘सह्याद्री’च्या माध्यमातून व्हाईट द्राक्षांमध्ये आरा 15, 30, 8 ए-19+4, रेड कलरच्या द्राक्षांमध्ये आरा 13, 19, 28, 29 आणि ब्लॅक कलरच्या द्राक्षांत आरा 27, 32, ए-14 या जाती पुढील 6 महिन्यात भारतात लागवडीसाठी उपलब्ध होणार आहेत.
आरा-32 वाणाची वैशिष्ट्ये:
- निसर्गत: गोड चव असलेले वाण
- साखर-ॲसीडचे उत्तम संतुलन (18 ब्रीक्स)
- संजीवकांची अत्यल्प आवश्यकता त्यामुळे उत्पादनखर्च कमी
- मणी धारणक्षमता चांगली
- मण्याचा आकार 24 ते 26 मि.मी.
- घड संख्या 40 ते 42
- मोठा व टिकाऊ घड
- पावसाला व प्रतिकूल हवामानास प्रतिकारक्षम
- उष्णकटिबंधीय तसेच वाळवंटी प्रदेशातही योग्य
- हेक्टरी 36 टनापर्यंत उत्पादकता
- रंगीत वाण अत्यंत आकर्षक व टिकाऊ रंग
- खाण्यास कुरकुरीत व भरपूर गर, गोड रसाळ चव
- निर्यातीसाठी सर्वोत्तम जात
‘ग्रापा व्हरायटीज लि.’ या जागतिक कंपनीने उत्पादन व मार्केटिंगचे हक्क काही देशांमध्ये ज्युपिटर ग्रुपला प्रदान केले आहेत. ज्युपिटरने भारतातील भागीदार म्हणून सह्याद्रीची निवड केली. ग्रापा व्हरायटीज लि. ही द्राक्षाच्या जाती विकसित करणारी कंपनी आहे. कंपनीने वाइन व टेबल ग्रेप्स (खाण्याची द्राक्षे) अनेक अद्वितीय जाती विकसित केल्या आहेत. इस्त्रायली मूळ असलेल्या कर्नेल कुटुंबाने 1882 मध्ये छोट्या स्वरुपात द्राक्ष जाती विकसित करण्यास सुरवात केली. 1990 मध्ये चौथ्या पिढीतील शाचर कर्नेल यांनी कुटुंबाच्या या व्यवसायाला एका नव्या टप्प्यावर नेले.
1993 मध्ये शाचर यांना कॅलिफोर्नियातील ’जीव्हीसी’ कंपनीने ब्रीडर म्हणून निमंत्रित केले. शाचर आणि जीव्हीसीने जगातील द्राक्षांची गरज ओळखून संशोधन केले व अद्वितीय जाती विकसित केल्या. शाचर यांची अल्पावधीतच जागतिक द्राक्ष ब्रीडींग मधील महारथी अशी ओळख बनली. असंख्य प्रयोग करीत त्यांनी अफलातून द्राक्ष जाती विकसित करुन जागतिक द्राक्षशेतीची सगळी परिमाने बदलून टाकली. त्यानंतर ‘जीव्हीसी’आणि शाचर यांनी मिळून ॲग्रिकल्चर रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट (एआरडी) या स्वतंत्र कंपनीची स्थापना केली.
शाचर या कंपनीचे मुख्य कंपनीचे मुख्य ब्रीडर आणि प्रोजेक्ट मॅनेजर होते. द्राक्ष जातींचे जागतिक पातळीवर व्यावसायिकरण व विस्तार करण्यासाठी संयुक्तपणे ग्रापा व्हरायटीज ही स्वतंत्र कंपनी (प्लॅटफॉर्म) निर्माण करण्यात आली. या माध्यमातून द्राक्षाच्या जाती जगभर पोहचविण्यात आल्या. ग्रापाच्या सर्व व्हरायटींचे स्वामित्वहक्क (पेटंट) सुरक्षित आहेत. या कंपनीचे ‘आरा’ आणि ‘अर्ली स्वीटस’ हे दोन जगप्रसिध्द निर्यातक्षम जागतिक ब्रॅण्ड जगभर लोकप्रिय आहेत.
Share your comments