औरंगाबाद: महिलांनी न्युनगंड सोडायला पाहिजे, महिला या सृष्टीच्या निर्मात्या आहेत. शेतीतील मुख्य कामांमध्ये महिलांचा महत्त्वाचा वाटा आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे आज महिला शिक्षण घेवून अनेक क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करत आहेत. आज केवळ पुस्तिकी शिक्षण घेवून भागणार नाही, आपणास कौशल्यावर आधारित शिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती देवयानीताई डोणगांवकर यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्र व महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त दि. 3 जानेवारी आयोजीत महिला शेतकरी मेळाव्या प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर व्यासपीठावर कोल्हापुर येथील स्वंयमसिध्दा संस्थेच्या संचालिका श्रीमती कांचनताई परुळेकर, कृषीभुषण श्री. विजयअण्णा बोराडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, औरंगाबाद जिल्हा कृषि अधिकारी श्री तुकाराम मोटे, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, कार्यक्रम समन्वयक प्रा. दिप्ती पाटंगावकर, सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस.बी.पवार, प्राचार्य डॉ. किरण जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण म्हणाले की, कृषी विद्यापीठ अंर्तगत असलेल्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाने शेतीत काबाडकष्ट करणाऱ्या महिलांसाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान विकसीत केले आहे, या तंत्रज्ञानाचा वापर महिलांनी करावा. आज दैनंदिन पोषण अन्नामध्ये भरड धान्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. या दृष्टीने परभणी कृषी विद्यापीठाने लोह व जस्त यांचे प्रमाण जास्त असणारा देशातील पहिला जैवसंपृक्त ज्वारीचा वाण परभणी शक्ती विकसीत केला आहे. यापासून मुल्यवर्धित पदार्थ तयार करून महिला बचत गटांनी उद्योग सुरु करावेत. शहरातील मॉलमध्ये महिला बचत गटांनी तयार केलेले विविध पदार्थ विक्रीसाठी स्वतंत्र दालन निर्माण करण्याची गरज आहे. औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रामुख्याने महिला शास्त्रज्ञांचा समावेश असून महिला सक्षमीकरणासाठी सदैव प्रयत्नशील असतात.
स्वंयसिध्दा संस्थेच्या संचालिका श्रीमती कांचनताई परुळेकर आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या की, महिलांचे सक्षमीकरण झाल्याशिवाय आपला देश आर्थिक महासत्ता होवू शकत नाही. महिलांच्या सक्षमीकरण करण्यासाठी सातत्याने प्रबोधन, प्रशिक्षण व मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. महिलांनी स्वावलंबी व्हावे, महिला शिकली तर संपुर्ण कुटुंब शिकते. महिलानी उद्योग क्षेत्रामध्ये उतरून कृतीवीर व्हा, बचत गटाच्या माध्यमातून दर्जात्मक विविध पदार्थ तयार करून रास्त किमतीत विक्री करा. नवीन तंत्रज्ञानाची कास धरा. महिलांमध्ये नेतृत्वगुण पेरावे लागतील. महिलांमध्ये राजकीय साक्षरता व अर्थ साक्षरता झाली पाहिजे. मोठे स्वप्न पहा, स्वत:चे मालक स्वत: व्हा, केवळ वाचावीर होवू नका, असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी कृषीभुषण श्री विजयअण्णा बोराडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, औरंगाबाद जिल्हा कृषि अधिकारी श्री. तुकाराम मोटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात विद्यापीठ प्रकाशीत मासिक शेतीभाती महिला विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. अनिता जिंतूरकर यांनी केले तर आभार प्रा. दिप्ती पाटंगावकर यांनी मानले. मेळाव्याच्या तांत्रिक सत्रात शेतकरी महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी सुलभ साधने यावर डॉ. जयश्री झेंड यांनी तर फळे-भाजीपाल्याची साठवणूक व प्रक्रिया यावर डॉ. फरझाना फारुखी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले होते, यात कृषी विज्ञान केंद्र पुरस्कृत महिला उद्योजिकांच्या दालनाचा समावेश होता. मेळाव्यास महिला शेतकरी, शेतकरी बांधव, विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Share your comments