महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड केली जात असून गहू हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. गव्हाची जिरायत व बागायती अशा दोन्ही प्रकारे केली जाते. रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, सूर्यफुल, करडई, गहू, या पिकांच्या पेरणीची लगबग सुरु होत आहे. गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी वेळेवर पेरणी, योग्य वाणांचा वापर, योग्य पेरणीची पद्धत, खतांचा समतोल वापर, योग्य पाणी व्यवस्थापन व पिक संरक्षण या बाबींचा अवलंब करताना लागवड उत्पादणाच्या या सुधारित तंत्राचा अवलंब केल्यास उत्पादनात वाढ होते.
जमीन -
गव्हाची लागवड जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे करता येते. बागायत पिकास चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमिनीची आवश्यकता असते. जिरायती पिकासाठी भारी जमिनीची निवड करावी.
पूर्वमशागत -
गव्हाच्या पिकाकरीता जमीन चांगली भुसभुशीत होण्याकरिता पुरेशी मशागत करावी. खोलवर जमीन नांगरनी करून तीन ते चार वेळा वखराच्या पाळ्या द्याव्यात.
हवामान -
गहू हे थंड हवामानास उत्तम प्रतिसाद देणारे पीक होय. गहू पिकास थंड व कोरडे हवामान मानवते.
पेरणीची वेळ -
जिरायत गव्हची पेरणी ऑक्टोबरच्या दुसर्या पंधरवाड्यात करावी. तसेच बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरच्या पहिला पंधरवाडा होय. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते.
पेरणीचे अंतर -
पेरणीच्या वेळी जमिनीत योग्य ओलावा असणे गरजेचे आहे. बागायत गव्हाची वेळेवर पेरणी दोन ओळीत 22 सें.मी. अंतर ठेवून करावी. जिरायत गव्हाची पेरणी दोन ओळीत 22 सें.मी. अंतर ठेवून करावी. पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूने न करता ती एकेरी करावी.
पाणी व्यवस्थापन -
पाणी एकदाच देणे शक्य असल्यास 40 ते 42 दिवसांनी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी 20 ते 22 दुसरी पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे. गहू पिकास पेरणीनंतर तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी 20 ते 22, दुसरे पाणी 40 ते 42 तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी देणे फायद्याचे ठरते.
रासायणिक खते -
पेरणीसाठी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश प्रती हेक्टरी पेरतांना द्यावे आणि 50 किलो नत्र पेरणीनंतर 21 दिवसांनी द्यावे.
कीड व्यवस्थापन
खोडकिडा -
पीकाची ओंबी तयार होत असतांना या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. ही अळी पीकाचा गाभा पोखरते, या किडींच्या नियंत्रणासाठी 40 ग्रॅम कार्बोरील 50 टक्के दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून पिकावर फवारणी करावी.
रोग व्यवस्थापन
काजळी -
हा रोग बियाण्याद्वारे पसरतो. या रोगामुळे ओंब्यामध्ये दाण्यांची काळी भुकटी तयार होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी व्हिटॅव्हॅक्स किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
तांबेरा -
गहू पिकावरील हा महत्त्वाचा बुरशीजन्य रोग आहे. हा रोग काळा, नारंगी व पिवळा अशा तीन रंगांमध्ये आढळतो. या रोगाच्या काळ्या आणि नारंगी प्रकारामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. या किडींच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब (डायथेन एम-45) हे बुरशीनाशक 1.5 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Share your comments