महाराष्ट्रात खरीप हंगामात सोयाबीन ची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सोयाबीन तसं बघायला गेलं तर खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. राज्यातील मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र लक्षणीय नजरेस पडते. मराठवाड्यात हे एक प्रमुख पीक आहे आणि अनेक शेतकरी सोयाबीन पिकावर अवलंबून आहेत. सोयाबीन पीक हे फक्त खरीप हंगामातच घेतले जाते असाच समज मराठवाड्यातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांचा बनला होता, मात्र हिवाळी हंगामात याची लागवड करून उस्मानाबाद जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी अनेकांना आश्चर्यचकित करून सोडले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनची हिवाळी हंगामात पेरणी करून एक नवीन प्रयोग केला आहे, विशेष म्हणजे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हा नावीन्यपूर्ण प्रयोग फलश्रुतीस देखील आला आहे. हिवाळी हंगामात पेरला गेलेल्या सोयाबीनला आता शेंगा लागल्या असल्याने शेतकऱ्यांच्या प्रयोगाला यश मिळाल्याचे सिद्ध झाले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याला सोयाबीन साठी विशेष ओळखले जाते जिल्ह्यातील कळंब तालुका तर सोयाबीनचे कोठार म्हणून संपूर्ण देशात विख्यात आहे. तालुक्यातील जवळपास ऐंशी टक्के क्षेत्रावर सोयाबीन पेरला जातो. आणि आता तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील या पिकाला हिवाळी हंगामात लागवड करून ही लागवड यशस्वी देखील करून दाखवली आहे. तालुक्याच्या ईटकुर गावाचे रहिवासी असलेले शेतकरी आकाश शिवाजी थोरात तसेच गंभीरवाडी गावाचे सोयाबीन उत्पादक शेतकरी रामराज काळे व भोगजी गावाची रहिवाशी शेतकरी बलभीम अडसूळ या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाचे हिवाळ्याच्या हंगामात यशस्वी उत्पादन घेऊन दाखवले आहे. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की या शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या सोयाबीनचे अजून काढणी झालेली नाही मात्र पिकाला यशस्वीरित्या शेंगा लागल्या असून यातून दर्जेदार उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा आहे.
तालुक्यात हा प्रयोग फक्त या तीन शेतकऱ्यांनी केला असे नाही तालुक्यातील इतरही शेतकऱ्यांनी हा नावीन्यपूर्ण प्रयोग केल्याचे नजरेस पडत आहे. सोयाबीन पिकासाठी 18 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत चे तापमान उत्तम असल्याचे कृषी वैज्ञानिक सांगत असतात. तसेच याची लागवड अशा प्रदेशात केली जाते जिथे 600 ते 1000 मीमी पाऊस पडत असतो. तसेच या पिकाची खरीप हंगामात जून मध्ये लागवड केली जाते.
परंतु असे असले तरी या तीन शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची काढणी करून पुनश्च एकदा हिवाळ्याच्या हंगामात सोयाबीनचा पेरा केला, आणि हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत देखील सोयाबीन पीक यशस्वी रित्या घेतले जाऊ शकते हे इतर शेतकऱ्यांना दाखवून दिले. शेतकऱ्यांनी हिवाळ्यात लागवड केलेल्या सोयाबीनला आता अडीच महिना उलटून गेला आहे आणि आता या सोयाबीनला एका झाडाला सरासरी 80 शेंगा आहेत. त्यामुळे हिवाळ्यात लावल्या गेलेल्या सोयाबीन पासून दर्जेदार उत्पादनाची आशा या शेतकऱ्यांना आहे.
Share your comments