जळगाव: हवामानाचे वैविध्य आणि पाण्याची कमतरता अशा विपरीत परिस्थितीतही भारतातील कृषी क्षेत्राने जैन इरिगेशनच्या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली आहे. हे लॅटीन अमेरिकन देशांसाठी अतिशय महत्वाचे आहे. कृषी क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी लॅटीन अमेरिकेच्या सहा देशांतील राजदुत व तीन देशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका चमूने जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ला भेट देऊन कंपनीच्या पाणी, शेती प्रक्रिया उद्योग व कारखाने शेती संदर्भातील विकसित तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.
जैन इरिगेशन मधील विकसित ठिबक आणि सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी अल साल्वाडोर, इक्वाडोर, चीली, बोलिव्हिया, ब्राझील, कोस्टारिका, पनामा, क्युबा आणि मेक्सिको येथील राजदूत आणि वकिलातीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. जळगाव येथील जैन इरिगेशनचे तंत्रज्ञान हे जगातील कृषी क्षेत्रातील आघाडीचे तंत्रज्ञान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जैन इरिगेशनचे सुक्ष्म सिंचन, एकात्मिक सिंचन प्रणाली, टिश्युकल्चर रोपे व केळी लागवड उत्पादन तंत्रज्ञान लॅटीन अमेरिकेतील केळी उत्पादकता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल.
एल साल्वाडोरचे राजदूत एरिअल ॲन्ड्राड यांनी सांगितले, जैन इरिगेशनचे एकात्मिक सिंचन तंत्रज्ञान अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी उपयोगी ठरले आहे. शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग यामध्ये केला जात आहे. ही पद्धती लॅटीन अमेरिकन देशांसाठी अतिशय उपयुक्त आहे. कारण तेथील देशांत देखील अतिशय कोरडे हवामान असून, पाण्याची देखील कमतरता आहे. ते पुढे म्हणाले, कांदा, केळी, मोसंबी, लिंबूवर्गीय फळे जैन इरिगेशनने भारतात उच्च क्षमतेने विकसित केली आहेत. त्याप्रमाणे लॅटीन अमेरिकन देशांतही जैन इरिगेशनचे तंत्रज्ञान उपयोगी ठरणारे आहे. चिलीचे राजदूत जुआन अंगुलो म्हणाले, उच्च कृषी उत्पादन घेण्यासाठी जैन इरिगेशनचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान चिली सारख्या देशांतील हवामानात अतिशय उपयोगी ठरणारे आहे. जैन इरिगेशनच्या पाण्याच्या संकलनाच्या विविध पद्धती आणि सिंचन तंत्राचा वापर हे चिली येथील कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आहे.
ब्राझिलियन दुतावासाचे कृषी अधिकारी डाल्सी बागोलिन यांनी भारतातील अतिशय उष्ण तापमानात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेल्या केळी पिकाच्या लागवडीबद्दल अनुभव अधोरेखीत केले. ब्राझील मध्ये देखील अतिशय उच्च तापमान असते, तेथे जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानाचा वापर करून केळी, मोसंबी आणि ऊस ह्या पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल.
इक्वाडोरचे राजदूत हेक्टर क्यूवा जॅकोम म्हणाले, भारतातील कृषी सिंचन पद्धतीतील अनुभव हा महत्वाचा आहे कारण भारत आता ठिबक सिंचनात जगात अग्रस्थानी आहे आणि या पद्धती लॅटीन अमेरिकन देशांत वापरल्या जाऊ शकतात. जळगाव सारख्या ठिकाणी वाळवंटासारखे हवामान असते, जिथे तापमान 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते अशा ठिकाणी जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने येथील शेतकरी केळीचे उच्च उत्पादन घेतात ही नाविन्यपूर्ण बाब असल्याचे ते म्हणाले.इक्वाडोर देशाची केळीची उत्पादकता 56 टन प्रति हेक्टर असून जैन केळीची उत्पादकता 90 ते 100 टन प्रति हेक्टर असून केळी पिकाचे शास्त्रोत व्यवस्थापन तेथील उत्पादकता वाढविण्यास मोलाचे ठरेल.
नऊ देशांच्या दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग
या दौऱ्यात बोलिव्हयाचे राजदूत जुआन जोस कॉर्टेज रोजस, पनामाचे रिकार्डो ऑगस्टो बर्ना मेनेसीस, इक्वाडोरचे हेक्टर क्युवा जॅकोम, मेक्सिकोचे कृषी अधिकारी सँटीएगो रु सँचेज, एल सल्वोडोरचे राजदूत एरिअल ॲन्ड्रेड, क्यूबाचे प्रथम सचिव जुआन कार्लोस सँचेज, चिलीचे राजदूत जुआन अंगुलो, ब्राझीलचे कृषी अधिकारी डाल्सी बागोलीन, कोस्टारिकाचे राजदूत एडुआर्डो सल्गाडो रेटाना आणि लॅटीन अमेरिकेतील लॅटम या दैनिकाचे मुख्य संपादक ॲल्फ्रेडो मोला यांनी जैन इरिगेशनच्या जळगाव येथील विविध प्रकल्पांना भेट दिली. तसेच त्यांनी रावेर परिसरातील शेतकऱ्यांच्या केळी पिकांची पाहणी देखील केली.
वैशिष्ट्ये:
- जैन इरिगेशनचे उच्च तंत्रज्ञान पाहुन लॅटीन अमेरिकेच्या सहा देशांतील राजदूत भारावले.
- रावेर परिसरातील श्रीकांत महाजन, किशोर पाटील व प्रेमानंद महाजन यांची ठिबक सिंचनावर घेतलेली निर्यातक्षम केळी व हेक्टरी 100 टनापेक्षा जास्त उत्पादकता पाहून आश्चर्य व्यक्त केले.
- रावेर परिसरातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधुन जाणुन घेतली ठिबक सिंचनाची उपयोगीता.
- लॅटीन अमेरिका देशांत केळी पिक घेण्यावर अधिक भर असल्याने जैन इरिगेशनचे तंत्रज्ञान तेथे उपयोगी ठरणार असल्याची भावना.
- केळी उत्पादन आणि निर्यातीच्या क्षेत्रात लॅटीन अमेरिकेतील हे देश आघाडीवर आहेत.
- खोडवा पिकाचे व्यवस्थापन लॅटीन अमेरिकेपेक्षा उत्तम असल्याचे मत व्यक्त केले.
- केळीच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व पाण्याचे व्यवस्थापन हे लॅटीन अमेरिकेने आत्मसात करण्याची भावना व्यक्त केली.
वातावरण बदलातही उपयोगी तंत्रज्ञान
वातावरणातील बदलामुळे लॅटीन अमेरिकेमध्ये कृषी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. तेथील प्रमुख पिक केळी असुन बदलणाऱ्या वातावरणात केळीचे वाढीव उत्पादन जैन इरिगेशनच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य असल्याची त्यांना खात्री झाली. लॅटीन अमेरिकेतील वाढत्या तापमानात एकरी 70 ते 80 टन केळी उत्पादीत होते, तर रावेर सारख्या भागात केळीचे उत्पादन एकरी 90 टनापर्यंत होते. जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाल्याने तेच तंत्रज्ञान लॅटीन अमेरिकेतही वापरता येऊ शकते अशी भावना देखील या राजदूतांनी बोलून दाखवली आहे. लॅटीन अमेरिकेतील काही देश जैन इरिगेशनशी विविध प्रकल्पांसाठी करार करायला उत्सुक आहेत.
स्वीट ऑरेंजमुळे प्रक्रिया उद्योगाला चालना
जैन इरिगेशनने विकसित केलेल्या स्वीट ऑरेंजचे (सीडलेस मोसंबी) वाण या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादीत होऊ शकते आणि त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला चालना मिळू शकते. जैन इरिगेशनचे तंत्रज्ञान वापरून लॅटीन अमेरिकन देशांत मोसंबीचे उत्पादन घेता येऊ शकते. त्याचप्रमाणे कॉफीचे देखील उत्पादन घेतले जाऊ शकते. मेक्सिको आणि चिली या देशांत कॉफीला मोठी मागणी असल्याने तेथे कॉफीच्या उत्पादनाची गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच या देशांमध्ये वीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने मात्र पावसाचे प्रमाण कमी अधिक असल्याने सौर उर्जेच्या वापरासाठी मोठा वाव असल्याचे या शिष्टमंडळाचे मत दिसून आले.
Share your comments