सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र चौथ्या स्थानावर

Saturday, 21 September 2019 08:03 AM


नवी दिल्ली: 
सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र देशात चौथ्या स्थानावर असून राज्याच्या मत्स्य उत्पादनात वाढ झाल्याचे चित्र आहे, वर्ष 2011-12 च्या तुलनेत वर्ष 2017-18 मध्ये ही वाढ 27 हजार टन आहे. केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री गिरीराज सिंह यांनी येथील मीडिया सेंटर मध्ये देशातील मत्स्य क्षेत्राची इत्यंभूत माहिती असणाऱ्या ‘सांख्यिकी पुस्तिका-2018’ चे प्रकाशन केले. या पुस्तिकेत वर्ष 2011-12 ते 2017-18 पर्यंतची देशातील मत्स्य क्षेत्राशी निगडीत विविध बाबींची माहिती देण्यात आली आहे.

सागरी मत्स्य उत्पादनात राज्य चौथ्या स्थानावर

देशात 8 हजार 118 कि.मी. चा समुद्र किनारा असून महाराष्ट्राला 720 कि.मी. चा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राने पहिल्या पाच राज्यांमध्ये स्थान मिळवले आहे. वर्ष 2017-18 मध्ये राज्यात समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादन 4 लाख 75 हजार टन असून महाराष्ट्र देशात चौथ्या स्थानावर आहे. 7 लाख 1 हजार टन उत्पादनासह गुजरात पहिल्या, 6 लाख 5 हजार टन उत्पादनासह आंध्र प्रदेश दुसऱ्या तर 4 लाख 97 हजार टन उत्पादनासह तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे. वर्ष 2017-18 मध्ये देशातील 13 राज्य-केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 36 लाख 88 हजार टन सागरी मत्स्य उत्पादन झाले आहे. 

मत्स्य उत्पादनात 27 हजार टनांची वाढ

राज्यात गोड्या आणि समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात  वाढ झाल्याचे चित्र आहे. वर्ष 2011-12 मध्ये राज्यात गोड्या आणि समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादन 5 लाख 79 हजार टन होते तर वर्ष 2017-18 मध्ये मत्स्य उत्पादनात 27 हजार टनांची वाढ होऊन एकूण उत्पादन 6 लाख 6 हजार टन एवढे झाले आहे. वर्ष 2011-12 पासून प्रत्येक वर्षी राज्याच्या मत्स्य उत्पादनात वाढ झाली आहे.

गेल्या आठ वर्षात राज्याला 128 कोटी वितरीत

वर्ष 2010-11 ते 2017-18 अशा एकूण आठ वर्षात महाराष्ट्राला मत्स्य क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून एकूण 128 कोटी 86 लाख 81 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला. वर्ष 2010-11 मध्ये राज्याला 7 कोटी 17 लाख 63 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला होता. यात वाढ होऊन राज्याला वर्ष 2017-18 मध्ये 22 कोटी 56 लाख 81 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

राज्यात 5 बंदरांच्या विकासासाठी निधी मंजूर

वर्ष 2017-18 मध्ये राज्यातील 5 बंदरांच्या विकासासाठी केंद्राने निधी मंजूर केला आहे. यात अर्नाळा बंदरास 61 कोटी 56 लाख, मिरकरवाडा बंदरास 71 कोटी 80 लाख 88 हजार, ससून डॉक बंदराच्या आधुनिकीकरणासाठी 52 कोटी 17 लाख , कारंजा बंदराच्या सुधारीत विकास आरखडा अमंलबजावणीसाठी 149 कोटी 80 लाख तर आनंदवाडी बंदरास 88 कोटी 44 लाख रूपये मंजूर झाले आहेत.

Marine Fisheries सागरी मत्स्य व्यवसाय
English Summary: Maharashtra ranks fourth in marine fish production

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and  Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.