1. बातम्या

पिक कापणी प्रयोगात हेक्टरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादनाचा निष्कर्ष

नागपूर: खरीप हंगामामध्ये विविध पिकांच्या उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी कृषी व महसूल विभागातर्फे प्रात्यक्षिक क्षेत्रात पीक कापणी प्रयोग राबविण्यात येतो. वर्धा रोड वरील वारंगा या गावातील शेतात सोयाबीन प्लॉटवर घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगात हेक्टरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादनाचा निष्कर्ष निघाला आहे.

KJ Staff
KJ Staff


नागपूर:
खरीप हंगामामध्ये विविध पिकांच्या उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी कृषी व महसूल विभागातर्फे प्रात्यक्षिक क्षेत्रात पिक प्रयोग राबविण्यात येतो. वर्धा रोड वरील वारंगा या गावातील शेतात सोयाबीन प्लॉटवर घेण्यात आलेल्या पिक कापणी प्रयोगात हेक्टरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादनाचा निष्कर्ष निघाला आहे.

राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोयाबीन उत्पादनासंदर्भातील पीक कापणी प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धा रोड वरील वारंगा या गावातील व्यंकटेश येरलू या शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या 10 बाय 5 मीटर क्षेत्रातील 160 नंबरच्या प्लॉटवर पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. सरळमिसळीत पद्धतीने निवडण्यात आलेल्या सोयाबीनच्या प्लॉटवरील पिकांची कापणी करुन प्रत्यक्ष सोयाबीन उत्पादनाची मोजणी करण्यात आली. या मोजणीमध्ये साधारणत: अर्ध्या गुठ्यांंत 10 किलो सोयाबीनचे उत्पादन प्रात्यक्षिकामध्ये दिसून आले. त्यामुळे या परिसरातील शेतामध्ये हेक्टरी 20 क्विंटल सरासरी अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पिक कापणी प्रात्यक्षिकाची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, उपविभागीय महसूल अधिकारी सूरज वाघमारे तसेच तालुका कृषी अधिकारी योगिराज जुमडे, शेतकरी व्यंकटेश येरलू, वारंग्याचे सरपंच राजेश भोयर तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

राज्यातील विविध पिकांच्या उत्पादनासंदर्भातील प्रत्यक्ष शेतात निवड केलेल्या प्लॉटवर पीक कापणी प्रयोग राबविल्या जातो. यामध्ये कापूस, तूर, भात, सोयाबीन आदी पिकांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकाच्या पीक कापणी प्रयोगासाठी 228 प्लॉटवर पीक कापणी प्रयोग राबविण्यात येत आहे. कृषी, महसूल तसेच शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कापणी अहवालानुसार उत्पादन ठरविण्यात येते. यावर्षी सोयाबीन पिकांच्या कापणी अहवालामध्ये हेक्टरी उत्पादनानुसार जिल्ह्याच्या विविध भागातील अंदाज घेण्यात येत आहे. या प्रात्यक्षिकासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पीक कापणी प्रयोग करावा, असे निर्देशही कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी यावेळी दिले.

पीक कापणी अहवालानुसार संपूर्ण जिल्हानिहाय माहिती कृषी विभागाने तयार केलेल्या ॲपवर टाकण्यात येत असून राज्यातील पिकांच्या उत्पादनाबाबतचा अहवाल तयार करण्यात येतो तसेच पीक कापणी अहवालानुसार मंडळात झालेले उत्पादन, त्याला मिळणारा हेक्टरी हमी भाव तसेच पीक विम्याचा लाभ सुद्धा या नुसार देण्यात येतो.

कापसावरील बोंडअळी नियंत्रणात

कापूस पिकावर प्रारंभी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्या. या उपाययोजना राबवितांना शेतकऱ्यांचाही सकारात्मक सहभाग मिळाल्यामुळे जिल्ह्यात बोंडअळी नियंत्रणात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

वारंगा परिसरातील कापसाच्या पिकांची पाहणी राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन केली तसेच शेतकऱ्यांशी सुद्धा संवाद साधला. शेतकऱ्यांनी बीजी-2 हे कापसाचे वाण घेतल्यामुळे बोंडअळीला सुद्धा प्रतिबंध असून शेतकऱ्यांनी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जानेवारी अथवा फेब्रुवारीपर्यंत कापसाची वेचणी करुन त्यानंतर शेतातील कापूस नष्ट करावा तसेच फरतडचे पीक घेऊ नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी सांगितले. वारंगा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधतांना शेतातील सोयाबीन तसेच कापसाच्या पिकासंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधून येणाऱ्या अडचणीसंदर्भात चर्चा करण्यात आली.

प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी पिक कापणी प्रयोगाबद्दल माहिती दिली. यावेळी वारंगा येथील सरपंच राजेश भोयर, नंदा पोहेकर तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित राहून पीक कापणी प्रयोगाबद्दल उत्सुकतेने माहिती घेतली. 

English Summary: In the crop harvesting experiment Conclusion 20 quintal per hectare of soybean production Published on: 05 October 2018, 10:00 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters