1. बातम्या

23 जानेवारीपासून मुंबईत महालक्ष्मी सरस प्रदर्शन

मुंबई: ग्रामीण भागातील बचतगटांच्या तसेच ग्रामीण कारागिरांच्या उत्पादनांच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे येत्या बुधवारपासून (23 जानेवारी) 4 फेब्रुवारीपर्यंत मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. यंदा प्रदर्शनात राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागातील बचतगट सहभागी झाले असून 511 स्टॉलच्या माध्यमातून ते उत्पादनांची विक्री करणार आहेत. याशिवाय खाद्यपदार्थांचे 70 स्टॉल असून त्यातून मुंबईकरांना वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घेता येणार आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
ग्रामीण भागातील बचतगटांच्या तसेच ग्रामीण कारागिरांच्या उत्पादनांच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे येत्या बुधवारपासून (23 जानेवारी) 4 फेब्रुवारीपर्यंत मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. यंदा प्रदर्शनात राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागातील बचतगट सहभागी झाले असून 511 स्टॉलच्या माध्यमातून ते उत्पादनांची विक्री करणार आहेत. याशिवाय खाद्यपदार्थांचे 70 स्टॉल असून त्यातून मुंबईकरांना वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घेता येणार आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

वांद्रे कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदान क्रमांक 1, 4, 5 व 6 येथे हे प्रदर्शन होणार आहे. बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. मुंबईकरांनी प्रदर्शनास भेट देऊन ग्रामीण महिला बचतगट आणि कारागिरांना प्रोत्साहन द्यावे, तसेच त्यांच्या नानाविध अशा कलाकुसरीउत्पादनांची खरेदी करावी, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. मंत्रालयात यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यावेळी उपस्थित होत्या.

महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला बचतगटांना त्यांनी तयार केलेल्या वस्तू, उत्पादने, साहित्य, नाविन्यपूर्ण कला व खाद्यपदार्थ शहरी नागरिकांपर्यंत पोहोचविता येतात. मागील दीड दशकात या प्रदर्शनातून सुमारे 7 हजार 500 बचतगटांनी मुंबईकरांना सेवा दिली आहे. प्रदर्शनात पहिल्यावर्षी 50 लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती. ती मागील वर्षी जवळपास 10 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली, अशी माहितीही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.

दररोज अंदाजे 20 हजार ग्राहक प्रदर्शनास भेट देतात. जळगावचे भरीत, खानदेशचे मांडे, कोकणातील मच्छी, तांदळाची भाकरी, कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सासोलापुरी चटणी, राज्यातील विविध भागातील मसाले, हातसडीचा तांदुळ आदी खाद्य पदार्थांबरोबरच कोल्हापुरी चप्पल, सोलापुरी चादरी, वारली चित्रकला,हस्तकला, हातमागाच्या वस्तू, कलाकुसरीच्या वस्तू आदी विविध उत्पादने प्रदर्शनात यंदाही उपलब्ध होणार आहेत. दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. 23 जानेवारी रोजी शशांक कल्याणकर, 25 जानेवारी रोजी हरिहरन, 27 जानेवारी रोजी अशोक हांडे, 28 जानेवारी रोजी साधना सरगम, 29 जानेवारी रोजी अनुप जलोटा तर 2 फेब्रुवारी रोजी उदित नारायण यांच्या कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.

ग्रामीण भागात आता यलो रिव्होल्यूशन

राज्यात ज्याप्रमाणे सहकारी दूध संस्थांमार्फत शेतकऱ्यांचे दूध संकलन करुन त्याला शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाते त्याच धर्तीवर ग्रामीण भागात कुक्कुटपालन करणाऱ्या महिला बचतगटांकडून उत्पादित होणाऱ्या अंड्यांचे संकलन करुन त्यांना आता शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाणार आहे. हरित क्रांती, धवल क्रांतीसारखी ही पिवळी क्रांती (यलो रिव्होल्यूशन) असेल. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकेल. पहिल्या टप्प्यात पालघर आणि धुळे जिल्ह्यात यासंदर्भातील पथदर्शी प्रकल्प (Pilot Project) सुरु करण्यात येत आहे, अशी घोषणाही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केली.

बचतगटांची उत्पादने अमेझॉननंतर आता ई-सरसवर

महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील बचतगटांची उत्पादने अॅमेझॉन या संकेतस्थळावर उपलब्ध करुन त्यांना ई-कॉमर्सच्या परिघात आणण्यात आले आहे. आता उमेद अभियानाच्या माध्यमातून ई-सरसचे ऑनलाईन व्यासपीठ बचतगटांच्या उत्पादनांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे, अशी माहितीही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली. राज्यातील ग्रामीण महिला बचतगटांची उत्पादने ई-सरसच्या माध्यमातून देश-विदेशातील ग्राहकांपर्यंत पोहोचतील. यातून ग्रामीण महिलांच्या अर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. 

English Summary: From 23 January Mahalaxmi Saras Exhibition in Mumbai Published on: 22 January 2019, 08:33 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters