मराठवाड्यातील शेतकरी बोगस बियाणांमुळे अडचणीत आला आहे. ऐन पेरणीच्या वेळेसच नामांकित बियाण्यांची टंचाई निर्माण का होते, असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहिला आहे. केवळ नफेखोरीसाठी काही व्यावसायिक हा प्रकार करत असल्याचे शेतकर्यांकडून बोलल्या जात आहे. यामुळे शेतकर्यांमध्ये मोठा संताप निर्माण होत आहे. तर उत्कृष्ट दर्जाच्या कंपनीचे बियाणे उपलब्ध करून देण्याची शेतकर्यांची मागणी होत आहेत.
मागील वर्षी चांगला पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. मात्र, यामध्ये किर्तीमान व यशोदा या कंपन्याचे बियाणे हे निकृष्ट दर्जाचे निघून सोयाबीन दुबार पेरणी करूनही उगवले नसल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गाजले होते. त्यामुळे यावर्षी शेतकरी सतर्क झाले असून बियाणाची चौकशी करूनच बियाणे घेत आहेत.तर यावर्षी पावसाचे उशिरा आगमन झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. दोन दिवसापूर्वी पावसाने परिसरात हजेरी लावल्याने बळीराजाने आपला मोर्चा बी- बियाणे खरेदीसाठी वळवला आहे. सोयाबीनचे पीक कमी खर्चात येत असल्याने सोयाबीनचा पेरा वाढला आहे.
अशा परिस्थितीत शेतकरी हे चौकशी करून सोयाबीनचे बियाणे घेत आहेत. यामध्ये अंकुर या सोयाबीन कंपनीच्या बियाण्यास शेतकर्याकडून मोठी मागणी असून या बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून दुकानदार ते मागितल्यानंतर ते बियाणे नसल्याचे सांगत आहेत. त्याऐवजी दुसरेच बियाणे उपलब्ध असल्याचे सांगत आहेत. दरम्यान, सोयाबीनच्या बियाण्यांचा दर शंभर ते सव्वाशे रुपये किलो आहे.
एकरी सुमारे २५ ते ३० किलो बियाणे, हजार ते दीड हजार रुपये किंमतीचे रासायनिक खते, तसेच बैलाच्या सहाय्याने पेरल्यास एकरी तीन हजार रुपये तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरल्यास एकरी दोन हजार रुपये असे सुमारे एकरी पेरणीसाठी आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो. असे असतानाही बोगस बियाणे उगवले नाही, तर शेतकर्यांना दुबार पेरणी करावे लागते.
Share your comments