नारायणगाव: जुन्नर, आंबेगाव, खेड या परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते. यात प्रामुख्याने टोमॅटो, कांदा, बटाटा, कोबी-फ्लॉवर यासारखी पिके घेतली जात असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला शाश्वत बाजारभाव मिळून देण्याकरिता केव्हीकेच्या माध्यमातून शेतमाल निर्यातीतील संधीविषयची कार्यशालेचे आयोजन केले गेले. यामाध्यमातून शेकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या निर्यातदार म्हणून पुढे येऊन शेतमालाला चांगला बाजारभाव मिळू शकतो याकरिता त्यांना प्रोस्ताहन देण्यासाठी 'फळे व भाजीपाला निर्यातीतील संधी' कार्यशाळा आयोजित करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कृषिरत्न अनिलतात्या मेहेर यांनी फळे व भाजीपाला निर्यातीतील संधी विषयावर बोलताना व्यक्त केले.
ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, प्रकल्प संचालक, आत्मा आणि ग्रीन इंनोवेशन सेंटर, नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 'फळे व भाजीपाला निर्यातीतील संधी' विषयीचे एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रवींद्र पारगावकर विदेश व्यापार महानिदेशालायाचे उपमहासंचालक संभाजी चव्हाण, निवृत्त कृषी अधिकारी गोविंद हांडे जीआयसी नारायणगावचे समन्वयक संजीव राठोड, संगीता पाटील, केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, केंद्राचे शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी विकास जाधव, राजेश भोर, अनिल काशीद आदी महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विदेश व्यापार महानिर्देशालायाचे उपमहासंचालक संभाजी चव्हाण म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था ही 'सेवा' क्षेत्रावर अवलंबलेली असुन कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील वाटा दिवसेंदिवस घटत आहे यासाठी शेतकऱ्यांनी शेतीच्या माध्यामतून 'सेवा आणि पुरवठा' क्षेत्राकडे लक्ष केंद्रीत करणे फायदेशीर ठरू शकते. पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय बाजारपेठेच्या तुलनेत पेमेंट गॅरंटीचा धोका कमी असून 'एक्सपोर्ट क्रेडिट रिस्क अथोरिटी' हि संस्था निर्यातदारांना विशेष सहकार्य करते. शेतकऱ्यांनी निर्याती बरोबरच आयातीवर देखील लक्ष देणे फायदेशीर असून भविष्यात मोठ्या संधी चालून येतील असा विश्वास चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
कृषीतज्ञ गोविंद हांडे यांनी भारतातील निर्यातीची आकडेवारी शेतकऱ्यांसमोर मांडली. तसेच फळ व भाजीपाला आणि अन्नधान्याच्या निर्यातीसाठी लागणाऱ्या विविध प्रमाणीकरणाची कागदपत्रे व निर्यातीची माहिती शेतकऱ्यांना यावेळी दिली. तसेच व्हेजनेट, मिटनेट, अनारनेट, हॉर्टनेट, ट्रेसनेट इत्यादी. प्रमाणीकरणा याविषयी हांडे यांनी मार्गदर्शन केले. शेतमाल निर्यातीकरिता शेतकऱ्यांनी अपेडाच्या संकेतस्थळावर जाऊन जास्तीत जास्त प्रमाणात वेजनेट योजेनेत नाव नोंदणी करून सहभागी व्हावे असे आवाहन देखील हांडे यांनी केले. याकरिता कृषी विभाग, अपेडा सारखी संस्था शेतकऱ्यांना मार्गदर्शन करततात. या सर्व सेवाचा लाभ शेतकरी घरबसल्या ऑनलाईन रित्या घेवू शकतो असेही यावेळी हांडे यांनी सांगितले. ग्रीन इनोव्हेशन सेंटरचे समन्वयक संजीव राठोड यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.
यावेळी शेतकऱ्यांना स्वच्छ भारत अभियानाविषयी जनजागृतीविषयी माहिती देण्यात आली. तसेच आंतरराष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थित महिलांना "रक्तक्षय" या पुस्तिकेचे मोफत वाटप केंद्राच्या गृह शास्र विभागाच्या निवेदिता डावखर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिविस्तार विषयतज्ञ राहुल घाडगे यांनी केले, तर आभार प्रभारी प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सागर करंडे, समीर औटी आणि शिवनेरी कृषी पदवीधर संघटना यांनी विशेष सहकार्य केले.
Share your comments