Akshaya Tritiya 2022: संपूर्ण राज्यात शेतीत काम करण्यासाठी शेतकरी बांधव सालगडीची नियुक्ती करत असतात. पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात विदर्भात कोकणात तसेच खानदेश मध्ये देखील शेती काम करण्यासाठी तसेच शेतीचे जागल राखण्यासाठी सालगड्याची नियुक्ती केली जाते. सालगडी अर्थात असा शेतमजूर जो वर्षानुवर्षे एकाच शेत मालकाकडे काम करत असतो.
या शेतमजुराला ज्या पद्धतीने कंपनीमध्ये कामगार वर्गाला वर्षाचे पॅकेज ठरवले जाते अगदी त्याच पद्धतीने वर्षाचे पॅकेज दिले जाते. भिन्नभिन्न प्रदेशात भिन्नभिन्न सालगड्याचे पॅकेज असते. मराठवाड्यात तसेच पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी बांधवांना सालगडी नेमायचा असल्यास ते गुढीपाडवा या नववर्षाच्या मुहूर्तावर त्याची नेमणूक करत असतात मात्र खानदेश मध्ये सालगडी नेमण्याची ही परंपरा वर्षानुवर्ष अक्षय तृतीयाच्या पावन मुहूर्तावर साधली जाते.
हेही वाचा
Farmers Income : भारतीय शेतकरी शेतीतुन किती कमवतो? नाही माहिती; मग वाचा याविषयी सविस्तर
Pm Kisan : ई-केवायसी केली नाही तरी मिळणार का पीएम किसान योजनेचा 11वा हफ्ता; काय सांगितलं सरकारने
विशेष म्हणजे खानदेशात सालगडी नेमताना त्याची कुवत तपासली जाते यासाठी त्याला परीक्षा द्यावी लागते. खानदेश मधील नंदुरबार जिल्ह्यातील माळवाडी परिसरात एक कठीण परीक्षा सालगड्यास द्यावी लागते. या माळवाडी परिसरात अक्षय तृतीयेच्या दिवशी सालगडी नेमला जातो. या दिवशी शेतमालक साल गड्याची कुवत व काम करण्याची जिद्द पाहून त्याला वर्षाचे काय ते पॅकेज ठरवत असतो. याशिवाय सालगड्यास एक कठीण परीक्षा देखील पार करावी लागते.
या परिसरात सालगडी नेमताना एक कठीण परीक्षा घेतली जाते. या माळवाडीमध्ये सालगडी नेमताना चौकात असलेली दोन मोठी दगडाची पूजा केली जाते आणि हे दगड सालगडी म्हणुन इच्छुक असलेल्या तरुणांना उचलावे लागतात. जो हे दगड उचलतो त्याची सालगडी म्हणून नियुक्ती केली जाते. सध्या सालगडीसाठी 60 हजार रुपयांपासून ते 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत वार्षिक पॅकेज ठरवले जातं आहे. यासोबत वर्षाकाठी त्या सालगड्यास कपड्याचे दोन जोड आणि दोन पोती धान्य देखील दिले जात आहे.
खानदेशमध्ये ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अबाधित आहे विशेष म्हणजे सालगड्यास देखील दिलेली जबाबदारी टाळून चालता येत नाही कारण की गावातील प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थित सालगडीची नेमणूक ही केले जात असते. निश्चितच खानदेश मध्ये वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा मोठी रंजक आणि महाराष्ट्राची विविधता दाखवणारी आहे.
Share your comments